Pakistan vs Bangladesh Asia Cup 2025 : बांगलादेशचा अवघ्या ११ धावांनी पराभव करून पाकिस्तानने आशिया चषक २०२५ स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. गुरूवारी दुबई येथे झालेल्या सामन्यात अत्यंत सुमार कामगिरी केल्यानंतरही पाकिस्तानला सहज विजय मिळवता आला. बांगलादेशी फलंदाज आणि गोलंदाजांनी केलेल्या असंख्य चुका पाकिस्तानला फायनलमध्ये पोहोचवण्यात कारणीभूत ठरल्या. या सामन्यानंतर बांगलादेशचा कर्णधार जाकेर अली याने त्यांच्या पराभवाची कारणेही सांगितली. दरम्यान- पाकिस्तानचा विजय नेमका कशामुळे झाला? बांगलादेशी खेळाडूंना कोणकोणत्या चुका महागात पडल्या? सामन्याचे चित्र नेमके कुठे पालटले? त्याचाच हा आढावा…
बांगलादेशचा कर्णधार जाकेर अलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय बांगलादेशी गोलंदाजांनी पहिल्या सहा षटकातच काहीसा सार्थ करून दाखवला. फलंदाजीसाठी आलेल्या पाकिस्तानी खेळाडूंना बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगलेच जेरीस आणले होते. भारताविरुद्धच्या सामन्यात आक्रमक फलंदाजी करणाऱ्या साहिबजादा फरहानला वेगवान गोलंदाज तस्कीन अहमदने पहिल्याच षटकात माघारी पाठवले. त्यानंतर फिरकी गोलंदाज मेंहदी हसनने सैम अयूबला भोपळाही फोडू दिला नाही. रिशाद हुसैनने फखर झमानला बाद करून पावर प्लेमध्ये पाकिस्तानची अवस्था २ बाद २९ केली होती. मात्र त्यानंतर ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानच्या तळातील फलंदाजांनी बांगलादेशी गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली.
बांगलादेशी खेळाडूंचे ढिसाळ क्षेत्ररक्षण
बांगलादेशी गोलंदाजाच्या सुरुवातीच्या भेदक माऱ्यामुळे पाकिस्तानला आठ षटकात ५ विकेट्सच्या मोबदल्यात केवळ ४९ धावाच काढता आल्या होत्या. मात्र त्यानंतर फलंदाजीसाठी शाहीन आफ्रिदीने बांगलादेशची धुलाई सुरू केली. त्याने रिषाद हुसैनला ठराविक अंतराने दोन षटकार मारले. आक्रमक फलंदाजी करणाऱ्या शाहीनचे दोन सोपे झेल बांगलादेशच्या क्षेत्ररक्षकांनी सोडले. परिणामी पाकिस्तानच्या धावसंख्येला गती मिळाली. १३ व्या षटकात पाकिस्तानने ६ विकेट्सच्या मोबदल्यात ७१ धावांचा टप्पा ओलांडला होता. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू मोहमद नवाजने खेळपट्टीवर तग धरून बसलेल्या मोहमद हॅरिसची चांगली साथ दिली.ु
कर्णधार जाकीर अलीचे आत्मघातकी निर्णय
या सामन्यात पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण आले असताना बांगलादेशचा कर्णधार जाकीर अलीने काही आत्मघातकी निर्णय घेतले. मोहमद नवाज फलंदाजीसाठी आल्यानंतर त्याने चांगली गोलंदाजी करत असलेल्या रिशाद हुसैनला बाजूला सारून मुस्तफिजूर रहमानच्या हाती चेंडू सोपवला. पाकिस्ताननी फलंदाजांनी त्याच्या गतीचा फायदा घेत धावसंख्या वाढवण्यास सुरुवात केली. त्यातच बांगलादेशच्या ढिसाळ क्षेत्ररक्षणामुळे पाकिस्तानच्या फलंदाजांना आणखीच बळ मिळाले. शेवटच्या ६.३ षटकात पाकिस्तानने तब्बल ६५ धावा चोपल्या. परिणामी बांगलादेशसमोर १३५ धावांचे लक्ष्य उभे राहिले.
बांगलादेशी फलंदाजांचे बेजबाबदार फटके
पाकिस्तानने दिलेल्या १३६ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशी फलंदाजांनी अतिशय बेजबाबर फटके मारले. परिणामी ठराविक अंतराने त्यांना एकपाठोपाठ एक धक्के बसले. सलामीला आलेला बांगलादेशचा फलंदाज परवेज हुसेनने खेळपट्टीचा अंदाज न घेता शाहीन आफ्रिदीविरोधात आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आफ्रिदीने त्याला पहिल्याच षटकात बाद करून बांगलादेशला पहिला झटका दिला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या तौहिद हृदोयने सैफ हुसेनच्या साथीने बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांमध्ये जवळपास २२ धावांची भागीदारीही झाली. पण त्यानेही शाहीन आफ्रिदीला मोठा फटका मारण्याच्या नादात आपली विकेट फेकली. त्यानंतर मेहंदी हसन, नुरुल हुसैनसह बांगलादेशच्या इतर फलंदाजांनीही फलंदाजांनी हातघाईवर येऊन चुकीचे फटके खेळले, ज्यामुळे त्यांना एकामागून एक विकेट्स गमवाव्या लागल्या. अखेर २० षटकात बांगलादेशला केवळ १२४ धावा करता आल्या आणि त्यांचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न धुळीस मिळाले.
फलंदाजीचा क्रम बदलणं आलं अंगलट
या सामन्यात फलंदाजीचा क्रम बदलणे बांगलादेशच्या अंगलट आल्याचे पाहायला मिळाले. आशिया चषक स्पर्धेत बांगलादेशकडून सलामीवीर म्हणून सैफ हुसेन आणि तंजीन हुसैन मैदानात उतरत होते. भारताविरुद्धच्या सामन्यातही हीच जोडी मैदानात आली होती. यावेळी मात्र सैफ हुसेनबरोबर परवेज हुसैन सलामीला आला आणि शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीवर सोपा झेल देऊन झटपट माघारी परतला. मधल्या फळीतील फलंदाजांच्या क्रमवारीत बदलही बांगलादेशच्या पराभवाचे कारण ठरले. आक्रमक फलंदाजी करणारा शमीम हुसैन सहाव्या तर कर्णधार जाकीर हुसैनने सातव्या क्रमांकावर फलंदाजी केली. तोपर्यंत पाकिस्तानने सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती आणि धावगती वाढवण्याचे आव्हानही त्यांच्यासमोर होते. हुसैनने ३० धावा करून बांगलादेशचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
पाकिस्तानी गोलंदाजांचा शिस्तबद्ध भेदक मारा
आशिया चषक स्पर्धेच्या साखळी सामन्यांमध्ये पाकिस्तानची गोलंदाजीमध्ये धार दिसून आली नव्हती. मात्र, बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफसह इतर गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीनशाह आफ्रिदीने पहिल्याच षटकात बांगलादेशचा सलामीवीर परवेज हुसेनला शून्यावर बाद केले. त्यानंतर भारत आणि श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या सैफ हुसैनला हॅरिस रौफने अवघ्या १८ धावांवर माघारी पाठले. पुढच्याच षटकात आफ्रिदीने तौहिद हृदोयला बाद करून बांगलादेशवर दडपण आणले. पाकिस्तानी गोलंदाजांनी बांगलादेशच्या फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरू दिला नाही. त्यांनी ठराविक अंतराने विकेट्स घेतल्या आणि बांगलादेशला पराभवाच्या खाईत ढकलले. आफ्रिदीने आपल्या चार षटकात केवळ १७ धावा देत ३ विकेट्स काढल्या. तर हॅरिस रौफने ३३ धावा खर्च करून ३ फलंदाजांना माघारी पाठवले. फिरकी गोलंदाज सैम अयुबनेही टिच्चून मारा करीत २ विकेट्स मिळवल्या. अखेरीस पाकिस्तानने बांगलादेशवर ११ धावांनी विजय मिळवून फायनलमध्ये प्रवेश केला.
हेही वाचा : भारत-पाकिस्तान कितीवेळा फायनल्समध्ये समोरा-समोर आले? आकडेवारीत पाकिस्तान वरचढ
बांगलादेशच्या कर्णधाराने पराभवाचे खापर कोणावर फोडले?
पाकिस्तानकडून निराशाजनक पराभव सहन करावा लागल्यानंतर कर्णधार जाकेर अलीने याचे खापर फलंदाजांवर फोडले. मागच्या दोन सामन्यात आमच्या फलंदाजांनी अपेक्षित कामगिरी न केल्यामुळे आम्हाला पराभव सहन करावा लागला, अशी खंत त्याने व्यक्त केली. आमचे गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत. पण फलंदाज चालत नसल्यामुळे आम्ही भारताविरोधातही मागचा सामना हरलो. आजच्या सामन्यातही फलंदाजांमुळे आमच्या पदरात निराशा पडली, असेही जाकीर म्हणाला. दरम्यान, फायनलमध्ये पाकिस्तानचा सामना बलाढ्य टीम इंडियाशी होणार आहे. आशिया चषक २०२५ मध्ये दोन्ही संघ तिसऱ्यांदा आमनेसामने येणार असून तब्बल ४१ वर्षांनंतर अंतिम सामन्यात एकमेकांविरोधात खेळणार आहेत.