रायफल म्हणजे जवानांचा कणा. कुठल्याही स्थितीत बचावाचे पहिले साधन म्हणजे रायफल. यापूर्वी इन्सास रायफली जवान वापरत असत. आता एके-२०३ रायफल त्यांची जागा घेणार आहे. या वर्षअखेरीपर्यंत रायफलींचे संपूर्ण देशीकरण होणार आहे. अमेठीमध्ये साडेआठ एकर परिसरात रायफलींचे उत्पादन घेतले जात असून, संरक्षण दलांसाठी ही आस्थापना अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. येत्या काळात तिचे महत्त्व अधिक वाढणार आहे.

ॲसॉल्ट रायफली

देशात दीर्घ काळापासून देशी बनावटीच्या इन्सास रायफली जवान वापरतात. मात्र, या रायफली वापरताना काही अडचणींचा सामना जवानांना करावा लागत असल्याची वृत्त आहे. रशियाच्या कलश्निकॉव्ह रायफलींना तुलनेत पसंती दर्शविली जात होती. मात्र, अधिकृतरीत्या इन्सास रायफलीच वापरल्या जात असत. आता सर्व शक्यता विचारात घेऊन रशियाबरोबरच संयुक्त विद्यमाने एके-२०३ रायफली तयार केल्या जात आहेत. संरक्षण दलांतील जवानांना या रायफली आता दिल्या जातील.

रायफलींचे संपूर्ण देशीकरण

अमेठी येथे इंडो-रशियन रायफल्स प्रा. लि. (आयआरआरपीएल) कंपनी ‘एके-२०३’ या ॲसॉल्ट रायफली तयार करीत असून, या वर्षी डिसेंबर महिन्यापर्यंत या रायफली संपूर्णपणे भारतीय बनावटीच्या तयार होणार आहेत. आतापर्यंत या रायफली तयार करण्यासाठी लागणारे सुटे भाग आणि इतर प्रक्रियेशी संबंधित सर्व बाबी ५० टक्के देशांतर्गत पातळीवरच होत आहेत. संपूर्ण देशी बनावटीच्या दिशेने प्रवास सुरू असून, येत्या सहा महिन्यांत हे उद्दिष्ट गाठण्यात येण्याची शक्यता आहे. ‘आयआरआरपीएल’चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक मेजर जनरल एस. के. शर्मा यांनी ही माहिती दिली. ‘एके-२०३’ ही जवानांसाठी सर्वांत विश्वासार्ह अशी रायफल येत्या काळात असेल, असे शर्मा म्हणाले. या वर्षअखेरपर्यंत लष्कराला ७० हजार रायफली कंपनी पुरविणार असून, त्यातील ४८ हजार रायफली दिलेल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

५,२०० कोटी रुपयांचा करार

रायफली तयार करण्यासाठी ‘आयआरआरपीएल’बरोबर ५,२०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला आहे. त्या अंतर्गत ऑक्टोबर २०३२ पर्यंत भारताच्या सशस्त्र दलांना ६ लाख १ हजार ४२७ एके-२०३ कंपनीला पुरवायच्या आहेत. मात्र, कंपनीमध्ये रायफलींचे उत्पादन वेगाने सुरू असून, दोन वर्षे आधी, डिसेंबर २०३० पर्यंतच सर्व रायफली संरक्षण दलांना देण्यात येणार आहेत. येत्या काही आठवड्यांत सात हजार रायफली संरक्षण दलांना देण्यात येतील. पुढील वर्षापासून दर महिन्याला १२ हजार रायफली तयार होतील.

इन्सास रायफली बदलणार

एके २०३ रायफलींना ‘शेर’ म्हणून संबोधले जाते. सध्या संरक्षण दलांकडे असलेल्या इन्सास रायफलींची जागा एके-२०३ रायफली घेतील. ही रायफल म्हणजे कलश्निकॉव्ह रायफलचे आधुनिक रूप आहे. इन्सास रायफलचे वजन ४.१५ किलोदरम्यान असते. यापेक्षा कमी म्हणजे साधारण ३.८ किलो वजन एके-२०३ रायफलचे आहे. पाकिस्तानबरोबरील नियंत्रण रेषा आणि चीनबरोबरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील जवानांकडेही या रायफल असतील. दहशतवादविरोधी कारवाया, माओवादविरोधी कारवाया समोर ठेवून त्यांना उत्तर देण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व गरजांची पूर्ती या रायफलमध्ये केली आहे.

‘आयआरआरपीएल’ची स्थापना कधी?

भारत आणि रशियामध्ये २०१९ मध्ये झालेल्या करारानुसार या कंपनीची स्थापना करण्यात आली. रशियाची ‘रोसोबॉरॉनएक्स्पोर्ट अँड कन्सर्न कलश्निकॉव्ह’ आणि भारताच्या ‘ॲडव्हान्स्ड् वेपन्स अँड इक्विपमेंट इंडिया लिमिटेड’ (एडब्लूईआयएल) आणि ‘म्युनिशन्स इंडिया लिमिटेड’ (एमआयएल) या कंपन्या संयुक्तपणे या रायफलची निर्मिती करीत आहे. लष्करातील अधिकाऱ्यांचे पथक या निर्मितीचे नेतृत्व करीत आहेत. अमेठीमधील ८.५ एकर क्षेत्रात या रायफलींचे उत्पादन घेतले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्षाला दीड लाख रायफलींचे उत्पादन?

प्रत्येक एके-२०३ रायफल तयार करताना १२० प्रकारच्या प्रक्रियेतून जाते. ५० मुख्य सुटे भाग आणि १८० इतर भाग त्यासाठी लागतात. रायफलींचे आयुष्य १५ हजार गोळ्यांपुरते आहे. रायफल तयार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व भागांपैकी ६० टक्के महत्त्वाचे भाग देशी बनावटीचे करण्यात आले आहेत. भारतामधील विविध उत्पादकांकडून ते मागविले जात असून, अमेठीमध्ये ते एकत्रित केले जात आहेत. संपूर्णपणे देशी बनावटीची रायफल तयार झाल्यानंतर वर्षाला दीड लाख रायफली कंपनी तयार करील.