स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत अंतिम लढतीत रशियाच्या डॅनिल मेदवेदेवला पिछाडीवरून नाट्यमयरीत्या हरवत २१वे ग्रँड स्लॅम अजिंक्यपद पटकावले. फेडेक्स (रॉजर फेडरर), राफेल नदाल (राफा) आणि नोव्हाक जोकोविच (जोको) या पुरुष टेनिसमधील विद्यमान महान त्रिमूर्तीमध्ये महानतम होण्याचा मान तूर्त राफानेच पटकावला आहे. ऑस्ट्रेलियन स्पर्धेपूर्वी तिघेही प्रत्येकी २० ग्रँड स्लॅम अजिंक्यपदांसह संयुक्त अव्वल स्थानी होते. ती कोंडी नदालने फोडली, पण पूर्णपणे अनपेक्षितरीत्या!
२१ अजिंक्यपदांचा लेखाजोखा…
ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा मेलबर्नमधील रॉड लेव्हल एरेना हे नदालचे पसंतीचे कोर्ट नव्हे. त्याचे साम्राज्य पॅरिसच्या मातीच्या कोर्टवर. १३ फ्रेंच, ४ अमेरिकन आणि प्रत्येक २ विम्बल्डन आणि ऑस्ट्रेलियन अजिंक्यपदे त्याने आजवर पटकावली. एखाद्या ग्रँड स्लॅम श्रेणी स्पर्धेत दोन आकडी अजिंक्यपदे (फ्रेंच – १३) पटकावणारा तो एकमेवाद्वितीय. फ्रेंच स्पर्धेत मातीच्या कोर्टवर त्याच्याइतके वर्चस्व इतर कोणालाही कोणत्याच कोर्टवर गाजवता आलेले नाही. नोव्हाक जोकोविचची ऑस्ट्रेलियन स्पर्धेतील ९ अजिंक्यपदे थोडीफार त्या कामगिरीच्या जवळ जाणारी. २००५मध्ये नदालने प्रथम फ्रेंच अजिंक्यपद पटकावले. सलग चार वेळा फ्रेंच स्पर्धेत विजयी ठरल्यानंतर २००८मध्ये त्याने प्रथम विम्बल्डन अजिंक्यपद (फेडररला हरवून!) पटकावले. २००९मध्ये ऑस्ट्रेलियन आणि २०१०मध्ये अमेरिकन अजिंक्यपद प्रथम पटकावले. २००५पासून २००९, २०१५, २०१६ आणि २०२१ वगळता फ्रेंच स्पर्धेने दुुसरा विजेता पाहिलेला नाही! आता पुढील ग्रँड स्लॅम स्पर्धाही फ्रेंच आहे. तेथे जोकोविच खेळण्याची शक्यता अंधूक आहे. अशा वेळी आत्मविश्वास दुणावलेला नदाल २२व्या अजिंक्यपदासाठी प्रयत्न करण्याची शक्यता अधिकच वाढलेली आहे. आंद्रे आगासीप्रमाणे चारही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकून ऑलिम्पिकमध्ये सवर्णपदक जिंकून दाखवणारा तो केवळ दुसराच टेनिसपटू.
आपसांतील कामगिरी; वि. फेडरर, वि. जोकोविच
फेडरर आणि नदाल २००४पासून एकमेकांशी खेळत आहेत. त्यांच्यात आजवर ४० सामने झाले. नदालने २४, तर फेडररने १६ जिंकले. ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्येही नदाल फेडररला सरस ठरलेला दिसतो. नदाल १०वेळा, तर फेडरर ४वेळा विजेता ठरला. ग्रँड स्लॅम अंतिम सामन्यात दोघे ९ वेळा भिडले, त्यात नदाल ६ वेळा तर फेडरर ३ वेळा विजेता ठरला. जोकोविचसमोर त्याची कामगिरी अधिक खडतर ठरली. दोघांमध्ये आजवर ५८ सामने झाले आणि त्याच जोकोविच ३०-२८ असा आघाडीवर आहे. मात्र ग्रँड स्लॅम स्पर्धेत हे समीकरण नदालच्या बाजूने १०-७ असे झुकलेले दिसते.
त्रिमूर्तीची मक्तेदारी!
रॉजर फेडरर, राफेल नदाल आणि नोव्हाक जोकोविच यांनी गेले जवळपास दीड दशक टेनिस जगतावर अधिराज्य गाजवले. २००५ ते २०२२ या काळात ६८ ग्रँड स्लॅम स्पर्धांपैकी ५७ स्पर्धा या तिघांनी जिंकलेल्या आहेत! २०११ ते २०१८ या काळात ३२पैकी २५ अजिंक्यपदे या तिघांच्या नावावर लागली. अँडी मरे, स्टॅनिस्लास वावरिंका, मारिन चिलिच हे अधूनमधून जिंकत राहिले. पण कोणालाही महान त्रिमूर्तीची सद्दी मोडून काढता आली नाही. आता फेडरर वय खूपच वाढल्यामुळे निस्तेज झाल्यासारखा आहे. जोकोविच त्याच्या तऱ्हेवाईकपणामुळे एकदोन ग्रँड स्लॅम स्पर्धांना मुकतोच. नदाललाही दुखापतींचा सामना करावा लागत असल्यामुळे काही स्पर्धांमध्ये तो निष्प्रभ ठरतो. यामुळे अलीकडे इतर मंडळीही जिंकू लागलेली दिसतात.
नदालच्या खेळाचे वैशिष्ट्य काय?
फेडरर आणि जोकोविचच्या तुलनेत नदालला त्याच्या कारकिर्दीत दुखापतींनी अधिक सतावले. परंतु पूर्ण तंदुरुस्त नदाल कोर्टवर उतरल्यावर ताकदीमध्ये आणि ऊर्जेत इतर दोघांना नेहमीच भारी पडत आलेला आहे. फेडररची नजाकत आणि जोकोविचचा वेग नदालकडे नसेल, पण मानसिक कणखरपणा, शारीरिक क्षमता आणि सामन्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत न खचण्याचे सातत्य या जोरावर नदाल फेडरर आणि जोकोविचपेक्षा अधिक ग्रँड स्लॅम अजिंक्यपदे पटकावता झाला.
त्याने सर्वाधिक अजिंक्यपदे मातीच्या कोर्टवर मिळवलेली आहेत, जेथे इतर पृष्ठभागांच्या तुलनेत (हार्डकोर्ट, ग्रासकोर्ट) रॅलीज अधिक काळ चालतात. त्यामुळे कोर्टवर अधिक काळ धावत राहावे लागते. शिवाय बऱ्यातदा बेसलाईनवरून खेळत राहिल्यामुळे मनगट आणि दंडातील ताकद अक्षय ठेवावी लागते. ताकद असूनही बिनतोड सर्विसपेक्षा नदाल दीर्घ रॅलीजना प्राधान्य देतो. डावखुऱ्या नदालच्या फटक्यात इतर कोणत्याही टेनिसपटूपेक्षा अधिक आवर्तने (टॉपस्पिन) आढळून येतात. फटका मारल्यानंतर त्याचा डावा हात खांद्याच्या रेषेच्या वर स्थिरावतो.इतर बहुतेक टेनिसपटूंच्या बाबतीत हा हात विरुद्ध खांद्याच्या रेषेत स्थिरावतो. या वैशिष्ट्यामुळे नदालला इतर टेनिसपटूंच्या तुलनेत चेेंडूवर अधिक उसळी साधता येते.