Toxic algae marine life हवामान बदलाची समस्या दिवसेंदिवस जटिल होत असल्याचे चित्र आहे. तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. या सर्व बदलत्या चित्रामुळे मानवाला मोठ्या नैसर्गिक आपत्तीला तोंड द्यावे लागत आहे. मात्र, या आपत्तीला जबाबदारसुद्धा मानवच आहे. अशीच एक नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती ऑस्ट्रेलियामध्ये उद्भवली आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियातील समुद्रकिनारे हिरव्या रंगात परिवर्तित होत आहेत. या आपत्तीला तेथील सरकारने नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित केले आहे. त्यामागील नेमकं कारण काय? समुद्राचा रंग हिरवा का होतोय? याला नैसर्गिक आपत्ती घोषित करण्याचे कारण काय? त्याविषयी जाणून घेऊयात.

प्रकरण काय?

  • ​दक्षिण ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्याजवळ मोठ्या प्रमाणावर शेवाळ वाढल्याने आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.
  • त्यामुळे समुद्राचा रंग विषारी हिरव्या रंगात बदलत आहे.
  • या संकटाने समुद्रातील हजारो सागरी जीव मृत्युमुखी गेले आहेत आणि स्थानिक उद्योगांचे मोठे नुकसान झाले आहे.
  • ही परिस्थिती इतकी चिंताजनक आहे की, दक्षिण ऑस्ट्रेलिया सरकारने याला नैसर्गिक आपत्ती घोषित केले आहे.
समुद्राचा रंग विषारी हिरव्या रंगात बदलत आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

नैसर्गिक आपत्ती कधी घोषित केली जाते?

“एखाद्या समाजाच्या कार्यामध्ये गंभीर व्यत्यय येणे, ज्यामुळे व्यापक मानवी, भौतिक किंवा पर्यावरणीय हानी होते, जी प्रभावीत समाजाची स्वतःची संसाधने वापरून सामना करण्याच्या क्षमतेपेक्षा जास्त असते,” अशी नैसर्गिक आपत्तीची व्याख्या करता येईल. त्याशिवाय संयुक्त राष्ट्रे आणि जागतिक बँकेनेही आपत्तीची व्याख्या केली आहे. संयुक्त राष्ट्रांनुसार आपत्ती म्हणजे “अचानक किंवा मोठी दुर्दैवी घटना; ज्यामुळे समाजाच्या (किंवा समुदायाच्या) मूलभूत ढाच्यात आणि सामान्य कार्यामध्ये व्यत्यय येतो.”

तर जागतिक बँके (World Bank)नुसार आपत्तीची म्हणजे मर्यादित कालावधीची असाधारण घटना; ज्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होतो. जीवितहानी, मालमत्ता, पायाभूत संरचना, अत्यावश्यक सेवा किंवा उपजीविकेच्या साधनांचे नुकसान होते. आपत्तींचे वर्गीकरण हे आपत्तीची कारणे किंवा समाजावरील त्यांचे परिणाम यांवर अवलंबून असते. नैसर्गिक, मानवनिर्मित, सामाजिक-नैसर्गिक अशा साधारणत: तीन भागांत आपत्तीचे वर्गीकरण केले जाते.

​शैवालवाढ म्हणजे काय?

​शैवालवाढ म्हणजे एखाद्या जलाशयात शैवालांच्या संख्येत वेगाने आणि अनेकदा विषारी वाढ होणे. शैवाल हे सागरी परिसंस्थेचा नैसर्गिक भाग आहेत. हिरवे सागरी शैवाल जगातील समशीतोष्ण आणि उष्ण कटिबंधीय महासागरात किनाऱ्यालगत आधाराला चिकटून वाढते. म्हणून खडकाळ सागरी क्षेत्रात ते आढळते. हिरवे सागरी शैवाल द्राक्षांसारखे, तंतू स्वरूपात आणि पालेभाजीसदृश अशा विविध आकारांत आणि स्वरूपांत आढळते.

हिरवे शैवाल सागरातील मत्स्यवर्गीय प्राण्यांचे आवडीचे खाद्य ठरते. मात्र, असे असले तरीही जास्त प्रमाणात त्यांची वाढ झाल्याने ते धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे ऑक्सिजन कमी होतो, सूर्यप्रकाश अडवला जातो आणि मग त्यातून विषारी पदार्थ बाहेर पडतात. त्यामुळे समुद्रातील पाणी जलचर प्राणी आणि मानवांसाठी हानिकारक ठरते. ऑस्ट्रेलियातील समुद्रात ही शैवालवाढ कूरांग ते यॉर्क द्वीपकल्पापर्यंत पसरली आहे. हा प्रदेश ऑस्ट्रेलियाच्या राजधानी क्षेत्राच्या दुप्पट आकाराचा आहे.

​ऑस्ट्रेलियातील संकट किती गंभीर?

शैवालात अचानक वाढ झाल्यामुळे आतापर्यंत ४०० हून अधिक सागरी जीवांच्या प्रजातींचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. त्यात मोठ्या संख्येने मासे, प्राणी आणि इतर किनारी जीवांचा समावेश आहे. या आपत्तीमुळे समुद्रकिनारे सागरी प्राण्यांच्या कुजलेल्या मृतदेहांनी भरले आहेत. या शैवालवाढीमुळे सामान्यतः स्वच्छ असलेले पाणी विषारी हिरव्या रंगात बदलले आहे.

​ऑस्ट्रेलियामध्ये अचानक शैवालवाढीचे कारण काय?

​तज्ज्ञांनी असे म्हटले आहे की, हे संकट हवामान बदलामुळे निर्माण झाले आहे. हवामान बदलामुळे समुद्राचे तापमान वाढले आहे. शेती आणि शहरी स्रोतांकडून जास्त पोषक घटकांचा प्रवाह (runoff) समुद्रात मिसळला आहे आणि त्यामुळे शैवाल वेगाने वाढण्यासाठी अशा स्वरूपाची परिस्थिती निर्माण केली आहे.

​ऑस्ट्रेलियातील शैवालवाढ नैसर्गिक आपत्ती आहे का?

राज्याच्या पातळीवर ही एक नैसर्गिक आपत्ती आहे. दक्षिण ऑस्ट्रेलियाचे प्रीमियर पीटर मलिनाउस्कस यांनी या शैवालवाढीला ‘नैसर्गिक आपत्ती’ घोषित केले आहे. या संकटाला केंद्र सरकारकडून नैसर्गिक आपत्ती घोषित करण्यात यायला हवे होते, अशी टीकाही त्यांनी केली आहे. ते म्हणाले, “ही एक नैसर्गिक आपत्ती आहे आणि तसे घोषित करणे आवश्यक आहे.”

​केंद्र सरकारने मदत आणि पुनर्वसनासाठी १४ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सची घोषणा केली आहे. त्यात स्वच्छता, संशोधन आणि प्रभावित उद्योगांना मदत करणे, या बाबींचा समावेश आहे. दक्षिण ऑस्ट्रेलिया सरकारनेही तेवढाच निधी दिला आहे. त्यामुळे या समस्येच्या निवारणासाठी २८ दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर्सचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, केंद्रीय पर्यावरण मंत्री मरे वॅट यांनी अद्याप या घटनेला नैसर्गिक आपत्ती म्हणून वर्गीकृत करण्यास नकार दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हवामान बदल अन् तापमानवाढीमुळे समुद्राच्या पातळीतही वाढ

ऊर्जा, उद्योग आणि वाहतूक त्यासह जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून सोडल्या जाणाऱ्या कार्बन डाय-ऑक्साइड, मिथेन आणि इतर उत्सर्जनामुळे ग्लोबल वॉर्मिंग वाढत आहे आणि समुद्राची पातळीही वाढत चालली आहे. ग्लोबल वॉर्मिंगमुळे समुद्र तापत आहे. गेल्या २० वर्षांत समुद्राचे तापमान वाढण्याची गती दुप्पट झाली आहे. नैर्ऋत्य पॅसिफिक समुद्रात जागतिक सरासरीपेक्षा तिप्पट वाढ नोंदवण्यात आली आहे. २०२३ मधील महासागराचे तापमान हे आतापर्यंतचे सर्वांत उष्ण तापमान होते. वाढत्या उष्णतेमुळे बर्फाचा थर आणि पर्वतीय हिमनद्या वितळणे हे समुद्राची पातळी वाढण्याचे प्रमुख कारण आहे.