Indian immigrants in Australia ऑस्ट्रेलियामध्येही स्थलांतरविरोधी रोष वाढत चालला आहे. ऑस्ट्रेलियाच्या खासदारांनी सोमवारी (१ सप्टेंबर) देशभरात सुरु असलेल्या स्थलांतरविरोधी निदर्शनांचा निषेध केला. ‘मार्च फॉर ऑस्ट्रेलिया’ नावाच्या या रॅली सिडनी, मेलबर्न आणि इतर प्रमुख शहरांमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या. या रॅलींमध्ये स्थलांतर समर्थक आणि विरोधक यांच्यात अनेक ठिकाणी संघर्ष झाला. ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन (एबीसी) च्या वृत्तानुसार, सिडनीतील रॅलीमध्ये सुमारे ८,००० लोक सहभागी झाले होते, तर मेलबर्नमध्ये निदर्शकांचा पॅलेस्टाईन समर्थक रॅलीतील लोकांबरोबर संघर्ष झाला.

नियो-नाझी नॅशनल सोशलिस्ट नेटवर्कचा संस्थापक थॉमस सेवेल याने मेलबर्न येथील संसद भवनाच्या पायऱ्यांवरून निदर्शकांना संबोधित केले. नियो-नाझीवाद ही एक आधुनिक राजकीय आणि सामाजिक चळवळ आहे. या कार्यक्रमाच्या प्रचारासाठी वापरल्या गेलेल्या पत्रकांमध्ये मोठ्या प्रमाणात झालेल्या स्थलांतराने आपल्या समुदायांना एकत्र ठेवणाऱ्या बंधनांना तोडले आहे, असा दावा करण्यात आला होता. या आंदोलनात २०२० पासून मोठ्या प्रमाणात स्थलांतर केल्याबद्दल भारतीय स्थलांतरित नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. काय आहे नेमके प्रकरण? स्थलांतरविरोधी रोष वाढण्याचे कारण काय? आंदोलनात भारतीयांनाच लक्ष्य का करण्यात आले? त्याविषयी जाणून घेऊयात…

देशभरात स्थलांतरविरोधी आंदोलने का केली जात आहेत?

  • ‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘बेक फ्रीडम’ नावाच्या एका कार्यकर्त्याने सिडनीतील निदर्शनांची जबाबदारी घेतल्याचे सांगितले जात आहे.
  • तिने ‘द हेराल्ड’ला सांगितले की ती एक स्वातंत्र्य सेनानी आणि देशभक्त आहे. एका लीक झालेल्या ऑडिओमुळे फ्रीडम चर्चेत आली होती, त्यात तिने हे आंदोलन श्वेतवर्णीय ऑस्ट्रेलियन वारसा जपण्यासाठी असल्याचे सांगितले होते.
  • तिने म्हटले “…ऑस्ट्रेलियन वारसा, संस्कृती, जीवनशैलीचे संरक्षण करा. पुढील पाऊल, युरोपियन संस्कृती, वारसा, जीवनशैलीचे संरक्षण करा. श्वेतवर्णीय वारसाचे संरक्षण करा.”
  • एबीसीच्या तपासणीत ह्युगो लेननदेखील या आंदोलनांचे आयोजन करणाऱ्यांपैकी एक असल्याचे उघड झाले आहे.
  • लेननने ‘रेमिग्रेशन’चा दीर्घकाळ प्रचार केला आहे, त्यात श्वेतवर्णीय नसलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या मूळ वंशिक ठिकाणी परत पाठवण्याची मागणी केली जाते.
‘द सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार ‘बेक फ्रीडम’ नावाच्या एका कार्यकर्त्याने सिडनीतील निदर्शनांची जबाबदारी घेतल्याचे सांगितले जात आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

या मोर्चांचा प्रचार करणाऱ्या पत्रकांमध्ये ऑस्ट्रेलियाला स्थलांतराच्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. रेडिओ होस्ट बेन फोर्डहॅमने ऑगस्टमध्ये असा दावा केला होता की दररोज १,५४४ स्थलांतरित ऑस्ट्रेलियामध्ये येत आहेत. “या वेगाने, केवळ तीन वर्षांत १.४ दशलक्ष लोक देशात येतील, जे ॲडलेडच्या लोकसंख्येएवढे आहे,” असे तो म्हणाला.

सरकारच्या आकडेवारीनुसार, २०२३-२०२४ मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये निव्वळ परदेशातील स्थलांतर (Net Overseas Migration – NOM) ४,४६,००० होते. मागील वर्षी हे आकडे ५,३६,००० इतके होते. मात्र, एसबीएस न्यूजने केलेल्या तथ्य तपासणीत असे दिसून आले की या आकडेवारीत परदेशी विद्यार्थी अनेकदा देशात ये-जा करतात, याचाही समावेश आहे आणि त्यामुळे स्थलांतरितांची अचूक संख्या दिसत नाही. एका पत्रकात असाही दावा करण्यात आला होता की, १९२५ पासून आलेल्या एकूण ग्रीक आणि इटालियन लोकांपेक्षा जास्त भारतीय २०२० नंतर ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरित झाले आहेत. प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन लोकसंख्याशास्त्रज्ञ पीटर मॅकडोनल्ड यांनी एसबीएसला सांगितले की युरोपियन लोकांचे स्थलांतर सुरू झाल्यानंतर अनेक वर्षांनी अधिकृत आकडेवारी गोळा करण्यास सुरुवात झाली. त्यामुळे तुलना करणे कठीण आहे. त्यांनी असेही सांगितले की, त्या वेळी त्यांच्या विरोधातही अशीच भाषा वापरली जात होती.

ऑस्ट्रेलियामध्ये स्थलांतरितांच्या संख्येत वाढ झाली आहे का?

गेल्या दशकात, स्थलांतराच्या आकडेवारीत वाढ दिसून येते. जून २०१४ मध्ये निव्वळ परदेशी स्थलांतर (NOM) सुमारे १,८७,००० होते, जून २०२४ मध्ये हा आकडा ४,४५,००० इतका होता. ‘द गार्डियन’मधील एका वृत्तानुसार, २०१६ ते २०२० दरम्यान NOM वार्षिक २,०६,००० ते २,६३,००० च्या दरम्यान होते. परंतु कोविड-१९ मुळे सीमा बंद केल्यामुळे या आकडेवारीत घट झाला. २०२१ आणि २०२२ मध्ये निर्बंध शिथिल झाल्यावर, NOM पुन्हा वाढले. सप्टेंबर २०२२ पर्यंत ते ३,४२,००० आणि डिसेंबर २०२२ पर्यंत ४,३३,००० स्थलांतरीतांची नोंद करण्यात आली.

स्थलांतरविरोधी निदर्शकांनी ‘ओव्हरसीज अरायव्हल्स अँड डिपार्चर्स’ (Overseas Arrivals and Departures – OAD) डेटातील आकडेवारीचाही उल्लेख केला आहे. मात्र, ऑस्ट्रेलियन ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सने एका निवेदनात म्हटले आहे की, “ओएडी डेटाचा वापर स्थलांतर किंवा लोकसंख्या बदलाचे मोजमाप करण्यासाठी करू नये, कारण तो निवासाच्या स्थितीतील बदलांऐवजी प्रवाशांचा हेतू दर्शवतो.” ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर सोशल पॉलिसी रिसर्च येथील लोकसंख्याशास्त्रज्ञ लिझ ऍलन यांनी एसबीएस न्यूजला सांगितले की, सध्याचे निदर्शन मोठ्या प्रमाणात चुकीच्या माहितीवर आधारित आहेत. स्थलांतरित स्थानिक लोकांच्या नोकऱ्या हिसकावून घेतात किंवा त्यांच्यामुळे घरांच्या किमती वाढतात असे दावे केले जात आहेत. विशेषतः, २०२० पासून भाड्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय स्थलांतरितांचा वाटा किती?

सरकारच्या आकडेवारीनुसार, जून २०२३ च्या अखेरीस ८,४५,८०० भारतीय वंशाचे लोक ऑस्ट्रेलियामध्ये राहत होते. ही संख्या दहा वर्षांपूर्वीपेक्षा (३,७८,४८०) दुप्पट आहे. ब्रिटननंतर ऑस्ट्रेलियामधील भारतीय वंशाचे नागरिक दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा स्थलांतरित समुदाय आहे. ऑस्ट्रेलियन सरकारच्या एका अहवालात (“An India Economy Strategy to 2035”) असे म्हटले आहे की, २००६ ते २०१६ या काळात भारतीय स्थलांतरात वाढ नोंदवली गेली.२००० च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतीयांवर हल्ल्यांचीही नोंद झाली होती. आज, भारतात जन्मलेल्या लोकांचा ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येत ३.२ टक्के इतका वाटा आहे. तसेच, त्यांच्याकडे ऑस्ट्रेलियन समाजातील इतरांच्या तुलनेत पदवी किंवा उच्च पदवी असण्याची शक्यता जवळजवळ तिप्पट आहे आणि भारतीयांची संपत्तीही जास्त आहे. २०१६ च्या अधिकृत आकडेवारीनुसार, हिंदी, पंजाबी आणि मल्याळम या ऑस्ट्रेलियात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भारतीय भाषा होत्या.