मागील काही दिवसांपासून देशात बिपरजॉय चक्रीवादळची चर्चा होत आहे. हे चक्रावादळ अगोदर पाकिस्तानच्या दिशेने मार्गक्रमण करत होते. मात्र आता हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत. त्यामुळे गुजरातमधील सुरक्षा आणि बचाव यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुरुवारी (१५ जून) संध्याकाळी हे वादळ गुजरातमधील समुद्र किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर हे वादळ किनाऱ्यावर धडकल्यावर काय परिणाम होणार? जीवित आणि वित्तहानी होण्याची शक्यता आहे का? हे जाणून घेऊ या…

वादळाचा प्रभाव मध्यरात्रीपर्यंत राहणार

हे चक्रीवादळ पाकिस्तानशेजारी आंतरराष्ट्रीय सीमेपासून साधारण ७० किलोमीटर अंतरावर गुजरातच्या जखाऊ बंदर परिसरात गुरुवारी संध्याकाळी आदळण्याची शक्यता आहे. किनाऱ्यावर आल्यानंतर पुढे मध्यरात्रीपर्यंत या वादळाचा प्रभाव राहणार आहे. भारतीय हवामान खात्याने तसा अंदाज वर्तवला आहे.

हेही वाचा >> स्टॅलिन यांचे विश्वासू सहकारी, गैरव्यवहाराच्या आरोपामुळे अडचणीत; ईडीच्या कारवाईनंतर चर्चेत आलेले सेंथिल बालाजी कोण आहेत?

वादळाची तीव्रता कमी होणार

बिपरजॉय वादळ समुद्रकिनाऱ्याकडे येत असताना त्याची उर्जा काही प्रमाणत कमी झाली आहे. अतिशय घातक स्वरुपाचे हे वादळ आता घातक पातळीपर्यंत सौम्य झाले आहे. बुधवारी या वादळाशी संबंधित वारे प्रतितास १२५-१३५ किमी वेगाने वाहात होते. आता मात्र हे वारे १२०-१३० किमी प्रतितास वेगाने वाहात आहे. विशेष म्हणजे हे वादळ किनाऱ्यावर येईपर्यंत त्याची तीव्रता आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

चक्रीवादळमुळे अनेक घरे नष्ट होण्याची शक्यता

बहुतांश वादळांची तीव्रता किनाऱ्यावर धडकल्यानंतर हळूहळू कमी होते. कालांतराने ते चक्रवादळ नाहीसे होते. बिपरजॉय या चक्रीवादळासंदर्भातही असेच होण्याची शक्यता आहे. जमिनीवर आल्यानंतर या वादळाचा प्रभाव तुलनेने लवकर नाहीसा होण्याची शक्यता आहे. शुक्रवारपर्यंत (१६ जून) हे चक्रीवादळ पूर्णपणे नाहीसे होऊ शकते. असे असले तरी हे चक्रीवादळ समुद्रकिनाऱ्यावर धडकल्यानंतर मोठ्या प्रमाणत नुकसान होण्याची शक्यता आहे. त्याची प्रचिती गुजरातच्या किनाऱ्यावरील लोकांना आताच येत आहे. गुजरातच्या किनाऱ्यावर वादळाची स्थिती निर्माण झालेली आहे. तसेच अनेक ठिकाणी पाऊस कोसळतोय. समुद्रातील लाटा ३ ते ६ मीटपर्यंत उंच जाण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे समुद्राच्या किनाऱ्यावर असणारी मातीची घरे नष्ट होण्याची शक्यता आहे. सिमेंटचे पक्के बांधकाम असलेल्या काही घरांचीदेखील मोडतोड होण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र किनाऱ्याच्या भागातील वीजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा >>औरंगजेब प्रकरणावरून महाराष्ट्रात अटकसत्र; कोणत्या कलमाखाली अटक होते आणि का?

गुजरातमध्ये ९४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले

त्यामुळे खबरदारी म्हणून गुजरात सरकारने सर्व सुरक्षा तसेच बचावकार्य करणाऱ्या यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत गुजरातमध्ये किनाऱ्यालगत असलेल्या ८ जिल्ह्यांतून ९४ हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. कूच जिल्ह्यातील २५ हजार ८२२ लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलेले आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एकूण ३० तुकड्या किनाी प्रदेशात तैनात करण्यात आलेल्या आहेत. पाकिस्तानच्या सिंध प्रांतातील साधारण ६७ हजार लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे.