मागच्या १२ आठवड्यांमध्ये मुघलसम्राट औरंगजेबाच्या पोस्ट टाकण्यावरून महाराष्ट्रात पाच लोकांना अटक करण्यात आली आहे. या लोकांवर भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम २९८, २९५अ, ५०५ (२) आणि १५३अ नुसार गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहिती एफआयआरमधून मिळते. अशा प्रकरणांत अटक करण्याच्या तरतुदी काय आहेत, याबद्दल जाणून घेऊ.

कुणाकुणाची अटक झाली

१७ मार्च रोजी मोहम्मद मोमीन या १९ वर्षीय मुलाला कोल्हापूर जिल्ह्यातील सावर्डे गावातून अटक करण्यात आली. व्हॉट्सॲप स्टेटसला औरंगजेबाचा स्टेटस ठेवून हिंदूंच्या भावना भडकविल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला होता. दुसऱ्या दिवशी मोमीन विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आणि त्याच्या कुटुंबीयांना गाव सोडण्यास सांगण्यात आले. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मोमीनला अटक करून त्याच्यावर कलम २९८ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे), कलम ५०५ (सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने करणे, वर्गावर्गामध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुष्टता निर्माण करणारी किंवा वाढविणारी विधाने करणे) या अन्वये गुन्हा दाखल केला.

port at vadhvan, vadhvan,
वाढवण येथील पर्यावरणस्नेही बंदराचा मार्ग मोकळा
Ramdev Baba
“आम्ही जाहीर माफी मागण्यासाठी तयार”, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रामदेव बाबांची प्रतिक्रिया
bombay high court nitesh rane speech examine
मीरा-भाईंदर हिंसाचार प्रकरण : नितेश राणेंसह दोन भाजपा नेत्यांची भाषणं तपासण्याचे कोर्टाचे आदेश
Supreme Court Gyanvapi mosque
ज्ञानवापीच्या तळघरातील पूजेवर बंदी घालण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार; मुस्लीम पक्षकारांची याचिका फेटाळली

त्याच दिवशी कोल्हापूरमधील मिणचे येथील २३ वर्षीय फैझन सौदागर या टेम्पोचालक युवकाच्या विरोधातही एफआयआर दाखल करण्यात आला. औरंगजेब यांनी अशक्य गोष्टी शक्य करून दाखविल्या, अशी भलामण करणारा स्टेटस त्याने व्हॉट्सॲपला ठेवला होता. त्यानंतर भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम २९८, २९५अ आणि ५०५ (२) अन्वये त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. “कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे,”अशी कलम २९५अ ची व्याख्या दिलेली आहे. तर कलम ५०५(२) मध्ये सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने करण्याबाबतच्या विविध गुन्ह्यांची माहिती देण्यात आली आहे.

२१ मार्च रोजी त्याच पोलीस स्थानकात तिसरा गुन्हा दाखल झाला. या वेळी खोची गावातील २१ वर्षीय कुदरत जामदार या युवकाला अटक करण्यात आली. त्यानेही औरंगजेबाच्या बाबतीत स्टेटस ठेवला होता.

हे वाचा >> आता नवी मुंबईतही औरंगजेब स्टेटस प्रकरणी चौकशी सुरु 

नाशिकमध्ये मागच्या आठवड्यात अशाच प्रकारे दोन अटक करण्यात आल्या आहेत. पहिली घटना घोटी तालुक्यात घडली. शोएब मणियार नावाच्या तरुणाने फेसबुकवर पोस्ट टाकल्यामुळे या परिसरात तणाव निर्माण झाला होता. धार्मिक भावना दुखावल्यामुळे त्याच्या अटकेची मागणी करण्यात आली. तर दुसरी घटना सिन्नर तालुक्यात घडली. सलीम काझी या युवकाने औरंगजेबाचा व्हिडीओ त्याच्या स्टेटसला ठेवला होता.

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या जिल्ह्याच्या नामकरणाला केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर या घटना उजेडात आल्या आहेत. औरंगाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामकरण धाराशीव करण्यात आलेले आहे.

कोणत्या तरतुदीखाली या अटक झाल्या?

वरील सर्व अटक कलम २९८ (धार्मिक भावना दुखावण्याच्या उद्देशाने शब्द उच्चारणे), कलम २९५अ (कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे), कलम ५०५ (सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने करणे, वर्गावर्गामध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुष्टता निर्माण करणारी किंवा वाढविणारी विधाने करणे) आणि ५०५ (२) (५०५ कलमाशी निगडित गुन्हे) आणि १५३अ (धर्म, वंश जन्मस्थान, निवास, भाषा इ. कारणांवरून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे)

वरील कलम हे द्वेषपूर्ण भाषण कायदे म्हणूनही ओळखले जाते. तसेच अभिव्यक्तिस्वातंत्र्यांची या कलमामुळे गळचेपी होते, तसेच राजकीय फायद्यासाठी यांचा गैरवापर होत असल्याची टीका नेहमी होत असते. अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचा हेतू काय आहे? याचा तपास करणे गरजेचे असते. अशा प्रकारे हेतू हा द्वेषयुक्त भाषण कायद्याचा महत्त्वाचा घटक आहे.

हे वाचा >> “औरंगजेब याच मातीतला”, देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ वक्तव्यावर प्रकाश आंबेडकरांचं उत्तर, म्हणाले…

कलम १५३ अ: कलम काय सांगते?

भादंवि कायद्याच्या कलम १५३अ नुसार धर्म, वंश जन्मस्थान, निवास, भाषा इ. कारणांवरून निरनिराळ्या गटामध्ये शत्रुत्व वाढवणे आणि एकोपा टिकण्यास बाधक अशा कृती करणे आणि शांतता बिघडवण्यासाठी हेतुपुरस्सर अशी कृती करणे, याला गुन्हा मानण्यात आले आहे. अशा गुन्ह्याला तीन ते चार वर्षांच्या कारावासाची आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. काही वेळा दोन्हीही शिक्षा दिल्या जातात.

१८९८ साली हे कलम पहिल्यांदा वापरण्यात आले. कलम १५३अ हे मुख्य दंड विधान कायद्यात समाविष्ट नव्हते. १९२७ साली रंगीला रसूल प्रकरणात लाहोर उच्च न्यायालयाने मुस्लीम प्रोफेट यांच्या खासगी आयुष्याबाबत आक्षेपार्ह लिखाण करणाऱ्या हिंदू प्रकाशकाची निर्दोष मुक्तता केली. त्यांच्यावर कलम १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच खटल्यात १५३अ सह, कलम ५०५ देखील लागू करण्यात आले होते.

कलम ५०५

‘सार्वजनिक आगळीक होण्यास साधक अशी विधाने करणे’, या गुन्ह्यात तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. दंड किंवा कारावास अशा दोन्ही शिक्षा दिल्या जाऊ शकतात. या कलमाचे उपकलम ५०५ (२) नुसार, जर कोणी अफवा किंवा भयप्रद वृत्त अंतर्भूत असलेले कोणतेही विधान किंवा वृत्त करील, प्रसिद्ध करील किंवा प्रसृत करील आणि धर्म, वंश जन्मस्थान, भाषा, जात किंवा समाज या कारणावरून किंवा इतर कोणत्याही कारणावरून निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषिक किंवा प्रादेशिक गट किंवा जाती किंवा यांच्यामध्ये शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना किंवा दुर्भावना निर्माण करण्याचा किंवा वाढवण्याचा त्यामागे उद्देश असेल अथवा त्यामुळे अशी शत्रुत्वाची किंवा द्वेषाची भावना निर्माण होण्याची शक्यता असेल.

१९६९ मध्ये या कलमात दुरुस्ती करून पोटकलम एक जोडण्यात आला. जातीय तणाव नियंत्रणात आणण्यासाठी या कलमाचा अधिक वापर करण्यात येत होता. तसेच या दुरुस्तीमुळे असे गुन्हे दखलपात्र म्हणून गणले गेले, ज्यामुळे कोणतीही नोटीस न देता आरोपींना अटक करणे शक्य झाले.

कलम २९५ अ

कलम २९५अ हे, “कोणत्याही वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करून धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या उद्देशाने बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने कृती करणे.” राजकीय व्यंगचित्रकार, पुस्तकांवर बंदी आणणे आणि सोशल मीडियावर राजकीय टीका करणे यांसारख्या अनेक मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यासाठी या कलमाचा वापर झाला.

“जो कोणी (भारताच्या नागरिकांपैकी) कोणत्याही वर्गाच्या धार्मिक भावनांवर अत्याचार करण्याच्या बुद्धिपुरस्सर व दुष्ट उद्देशाने (तोंडी किंवा लेखी शब्दांनी, अथवा चिन्हांद्वारे अथवा दृश्य प्रतिरूपणांद्वारे किंवा अन्यथा) या वर्गाच्या धर्माचा किंवा धार्मिक श्रद्धांचा अपमान करील किंवा अपमान करण्याचा प्रयत्न करील त्याला (तीन वर्षांपर्यंत) असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा आर्थिक दंड किंवा दोन्ही शिक्षा होतील.”

कलम २९८

“धार्मिक भावना दुखावण्याच्या बुद्धिपुरस्सर उद्देशाने शब्द उच्चारणे इ.” या गुन्ह्यासाठी कलम २९८ मध्ये शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या कलमानुसार जास्तीत जास्त एक वर्षाची शिक्षा आणि दंडाची किंवा दोन्ही शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

हे कायदे कसे लागू केले जातात?

द्वेषपूर्ण भाषण कायदे सर्वच राजकीय पक्षांच्या सत्ताकाळात वापरण्यात येतात. सार्वजनिक जीवनात असणाऱ्या व्यक्तींवरील टीकेची धार कमी करणे आणि टीकाकारांना अटक करण्यासाठी या कायद्याचा वापर होतो.

आणखी वाचा >> “औरंगजेब क्रूर नव्हता, त्याने मंदिरं… ” ‘ज्ञानवापी’ प्रकरणी काशी मंदिराचा उल्लेख करत मशिद समितीचा दावा

मागच्या वर्षी मे महिन्यात मराठी अभिनेत्री केतकी चितळेला शरद पवारांबद्दल मानहानीकारक मजकूर फेसबुकवर पोस्ट केल्याबाबत अटक करण्यात आली होती. केतकीवर याच कलमांच्या आधारे २२ वेगवेगळ्या ठिकाणी एफआयआर दाखल करण्यात आले होते. मार्च २०२२ मध्ये भाजपाचा युवक पदाधिकारी अरुल प्रसादला तमिळनाडू पोलिसांनी अटक केली होती. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांच्याबाबत बदनामीकारक मजकूर पसरविल्याबाबत याच कलमाखाली अरुलला अटक केली गेली.

या वर्षी फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसचे नेते पवन खेरा यांच्यावर अनेक एफआयआर दाखल करण्यात आले होते. काँग्रेसच्या माध्यम आणि प्रसिद्धी विभागाचे अध्यक्ष असलेल्या पवन खरे यांच्याविरोधात तर विविध राज्यांमध्ये एफआयआर दाखल झाले होते. गुन्हेगारी कारस्थान रचणे, राष्ट्रीय एकात्मतेसाठी प्रतिकूल विधान करणे, धर्मांमधील वैर वाढवणे असेही आरोप लावण्यात आले होते. पण कालांतराने सर्वोच्च न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.

राष्ट्रीय गुन्हे नोंदणी अहवालाच्या आकडेवारीनुसार कलम १५३ अ अंतर्गत गुन्हे सिद्धीचे प्रमाण अतिशय कमी आहे. २०२० साली या कलमांतर्गत १,८०४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. २०१४ साली केवळ ३२३ गुन्हे दाखल झाले होते. याचा अर्थ २०२० ची आकडेवारी ही सहापटींनी अधिक होती. तथापि २०२० साली दाखल झालेल्या गुन्ह्यापैकी केवळ २०.२ टक्के गुन्ह्यांमध्ये शिक्षा दिली गेली.