scorecardresearch

विश्लेषण : राणी एलिझाबेथ कालवश… पुढे काय होणार?

ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला गेला आहे.

britain queen elizabeth II died
राणी एलिझाबेथ कालवश… पुढे काय होणार? (फोटो – रॉयटर्स)

सिद्धार्थ खांडेकर

ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे ८ सप्टेंबर रोजी स्कॉटलंडमधील बालमोरल प्रासादात स्थानिक वेळेनुसार दुपारनंतर निधन झाले. ९६ वर्षीय राणी एलिझाबेथ यांनी ७०हून अधिक वर्षे ब्रिटन, तसेच काही राष्ट्रकुल देश आणि स्वायत्त ब्रिटिश वसाहतींचे राष्ट्रप्रमुखपद सांभाळले. ब्रिटनमधील बहुतांना राणी एलिझाबेथ यांच्याशिवाय राजसिंहासनावर इतर कोणीही व्यक्ती ज्ञात नाही. ब्रिटनच्या राजसिंहासनावर सर्वाधिक काळ राहिलेली व्यक्ती हा विक्रम राणी एलिझाबेथ यांच्या नावावर नोंदवला गेला.

जन्म आणि बालपण…

एलिझाबेथ अलेक्झांड्रा मेरी विंडसर यांचा जन्म २१ एप्रिल १९२६ रोजी लंडनमध्ये झाले. त्यावेळचे ब्रिटनचे राजे जॉर्ज पाचवे किंवा पंचम जॉर्ज यांचे द्वितीय पुत्र अल्बर्ट आणि एलिझाबेथ यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. त्या आणि त्यांच्या कनिष्ठ भगिनी मार्गारेट रोझ यांचे शिक्षण लंडनमध्ये घरातच झाले. लहानपणापासून त्यांच्यात नेतृत्वगुण दिसून आले. इंग्लंडच्या ग्रामीण भागात आयुष्य व्यतीत करावे, घोडे आणि कुत्रे यांच्या सहवासात रमावे अशी त्यांची अपेक्षा होती. परंतु नाट्यमय घडामोडींमुळे त्या राजसिंहासनाकडे ओढल्या गेल्या. १९३६मध्ये पंचम जॉर्ज यांच्या निधनानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र डेव्हिड (आठवे एडवर्ड) हे ब्रिटनचे राजे बनले. परंतु त्यांनी वॉलिस सिम्पसन या अमेरिकन घटस्फोटितेशी विवाह करण्याचे ठरवल्यावर चर्च ऑफ इंग्लंडने त्याला विरोध केला. ब्रिटिश राजा किंवा राणी ही चर्च ऑफ इंग्लंडची प्रमुख असते. या व्यक्तीने घटस्फोटित व्यक्तीशी विवाह करणे त्याकाळी संकेतांना धरून नव्हते. तेव्हा विवाह न करण्याऐवजी राजपद त्यागण्याचा निर्णय आठवे एडवर्ड यांनी घेतला. त्यामुळे त्यांचे कनिष्ठ बंधू अल्बर्ट हे जॉर्ज सहावे या नावाने ब्रिटनचे राजे बनले. त्यामुळे त्यांच्या ज्येष्ठ कन्या या थेट वारस (एयर अपॅरंट) बनल्या. नोव्हेंबर १९४७मध्ये एलिझाबेथ यांचा विवाह फिलिप यांच्याशी झाला.

करोनाचा प्रसार आता थांबला आहे का? करोना अजून किती काळ टिकणार? तज्ज्ञांचे काय म्हणणे आहे?

प्रदीर्घ कारकीर्द…

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एलिझाबेथ यांनी काही काळ युद्धभूमीवर लॉरीचालकाची जबाबदारी सांभाळली होती. त्यांचे वडील जॉर्ज सहावे आणि तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल युद्धकाळातील खंबीर नेतृत्वामुळे जनप्रिय झाले होते. परंतु फुप्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त जॉर्ज १९५२मध्ये मरण पावले. त्यावेळी एलिझाबेथ अवघ्या २६ वर्षांच्या होत्या आणि फिलिप यांच्यासमवेत आफ्रिका दौऱ्यावर होत्या. तरुणपणीच युद्धजर्जर देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. त्यावेळी अत्यंत समरसून ब्रिटनसारख्या घटनात्मक राजेशाहीचा (कॉन्स्टिट्युशनल मॉनर्की) अभ्यास त्यांनी सुरू केला. एकीकडे लोकशाहीची जन्मभूमी म्हणून मिरवायचे आणि दुसरीकडे राजेशाही संस्कृती-परंपरेचा भाग म्हणून धरून ठेवायची हा विरोधाभास ब्रिटनमध्ये शतकानुशतके दिसून आला. नवीन युगातील ब्रिटनमध्येही या विरोधाभासाविषयी प्रश्न उपस्थित केले जात होते. हस्तिदंती प्रासादात राहणाऱ्या राजघराण्याला सर्वसामान्य जनतेच्या समस्या काय समजणार, यांच्यावर कोट्वधी पौंड कशासाठी खर्च करायचे असे मानणारी नवी पिढी ब्रिटनमध्ये उभी राहात होती.

स्कॉटलंड, वेल्स, आयर्लंड या ब्रिटनच्या इतर भागांमध्ये स्वातंत्र्याचे हुंकार उमटू लागले होते. त्यांच्या वेदनांवर फुंकर घालण्याचे, त्यांच्या प्रश्नांना उत्तर देण्याचे काम एलिझाबेथ यांनी प्रामाणिकपणे सुरू केले. ब्रिटिश पार्लमेंटचा, तेथील प्रवाहांचा, परंपरांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला. राजकारण, अर्थकारण, आंतरराष्ट्रीय विषय यांविषयी तज्ज्ञांशी त्या सातत्याने बोलू लागल्या. हे करताना पार्लमेंट आणि राजघराणे यांच्यातील सीमारेषा त्यांनी कधीही ओलांडली नाही. वैयक्तिक आयुष्यातील अनेक संघर्षांचे, दुःखद प्रसंगांचे प्रदर्शन त्यांनी जनतेसमोर मांडले नाही. स्थैर्य, स्थितप्रज्ञता, तटस्थता, संवेदना, जबाबदारी, ब्रिटिश जनतेच्या मातृत्वाची भूमिका त्यांनी ७० वर्षे निभावली. १५ ब्रिटिश पंतप्रधान, १४ अमेरिकी अध्यक्ष, २० ऑलिंपिक पाहून झालेली व्यक्ती असा त्यांचा उल्लेख गमतीने केला जातो. पण या प्रदीर्घतेला प्रेम आणि आस्थेची किनार होती. त्यामुळेच ९६व्या वर्षी, ७० वर्षे राणी म्हणून वावरल्यानंतर त्यांनी अखेरचा श्वास घेतला, त्यावेळी सार्वत्रिक हळहळ आणि दुःख व्यक्त झाले.

बुद्धिबळ जगज्जेत्या कार्लसनने सिनक्वेफिल्ड स्पर्धेतून तडकाफडकी माघार का घेतली?

अंत्यसंस्कार…

राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर दोन आठवड्यांच्या आत त्यांचे अंत्यसंस्कार पार पाडावे लागतील. ‘लंडन ब्रिज फॉलिंग’ अशा सांकेतिक शब्दांनी त्यांच्या निधनाचे वर्तमान बकिंगहॅम पॅलेसच्या वतीने ब्रिटिश सरकारला ८ सप्टेंबर रोजी दुपारनंतर कळवण्यात आले. त्यांचे पार्थिव लंडनमध्ये वेस्टमिन्स्टर हॉल येथे चार दिवस अंत्यदर्शनासाठी ठेवले जाईल. तत्पूर्वी ते बकिंगहॅम पॅलेस येथे आणले जाईल. तेथून वेस्टमिन्स्टर हॉल, विंडसर राजवाडा, सेंट जॉर्ज चॅपेल असा पार्थिवाचा प्रवास होईल. सेंट जॉर्ज चॅपेलच्या तळघरात पार्थिवाला चिरविश्रांती दिली जाईल.

राजे चार्ल्स तिसरे…

राजपुत्र चार्ल्स हे राणीच्या निधनानंतर तत्क्षणी आणि तात्काळ राजे ठरतात. त्यासाठी वेगळ्या सोपस्कारांची गरज नसते. त्यांच्या पत्नी कॅपिला पार्कर बौल्स या राणी बनतील. त्याही घटस्फोटित असल्या, तरी राजविवाहाविषयीचे नियम मध्यंतरी चर्च ऑफ इंग्लंड आणि ब्रिटिश पार्लमेंटने शिथिल केले. त्यामुळे राजे चार्ल्स यांच्यासमोर तशी कोणतीही अडचण नाही. त्यांनी चार्ल्स तिसरे हे नाव धारण केले आहे. यापूर्वीचे दोन्ही चार्ल्स सतराव्या शतकात होऊन गेले. चार्ल्स राजे बनल्यामुळे त्यांचे ज्येष्ठ पुत्र विल्यम थेट वारस बनतील. त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ पुत्र जॉर्ज असा राजेपदाचा क्रम राहील. चार्ल्स यांचा अधिकृत राज्याभिषेक सोहळा मात्र काही महिन्यांनी पार पडेल.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-09-2022 at 11:17 IST

संबंधित बातम्या