What Happened to Buddhism in Pakistan?: कधीकाळी बुद्धाची शिकवण पाकिस्तानच्या भूमीत नांदत होती. परंतु, आज तिथेच उदास शांतता आहे. गांधारभूमी म्हणजे बौद्ध धम्माच्या ज्ञानाचं केंद्रस्थान. प्राचीन तक्षशिला आणि स्वात विद्यापीठातून जगभरातील हजारो विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतलं. तीच भूमी आज सांस्कृतिक विनाशाचं केंद्र ठरली आहे. पाकिस्तानमध्ये बौद्ध धम्माचा इतिहास केवळ विस्मृतीत गेलेला नाही, तर सामाजिक, शासकीय आणि आर्थिक अशा सर्वच पातळींवर उघडपणे पुसला गेला आहे आणि पुसला जात आहे. त्या देशात बुद्धमूर्ती उध्वस्त केल्या गेल्या. या परिस्थितीमुळे मूळ अनुयायांनी कधीच स्थलांतर केलं आहे. तर दुसऱ्या बाजूला स्थानिक सरकार मात्र जगासमोर एक ‘संस्कृतीनिष्ठ’ चेहरा दाखवण्यात मग्न आहे. जिथे कधीकाळी ज्ञानाचा दीप प्रज्वलित झाला होता, तिथे आज अंधार पसरला आहे. हा अंधार फक्त कोण्या एका धर्माच्या नष्ट होण्यामुळे नाही, तर समाजाचा विवेक हरवल्यामुळे आणि समृद्ध इतिहासाच्या पुसण्यामुळे पसरला आहे.

इतिहासात बौद्ध धम्माचे सुवर्णयुग अनुभवलेला गांधार प्रदेश आजच्या पाकिस्तानात आहे. या भूमीत अनेक स्तूप, विहार, बुद्ध मूर्ती आणि गांधार शैलीतील अप्रतिम कला अविष्कार सापडतात. परंतु, जिथे बुद्धाच्या शांतीचा संदेश घुमायचा, तिथे आज बौद्ध धम्माचा पूर्णतः विनाश होत चालला आहे. हे संकट केवळ सामाजिक नाही, तर सरकारी पातळीवर चालणाऱ्या कट्टरवादी धोरणांचं द्योतक आहे.

इतिहासातलं वैभव

गांधार प्रदेशात आजच्या पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा, पंजाब, सिंध आणि बलुचिस्तानचा काही भाग येतो. हे एकेकाळी बौद्ध धम्माच केंद्र होतं. तक्षशिला, स्वात, चारसद्दा आणि मंगोरा ही ठिकाणं बौद्ध धर्माच्या प्रसाराची आणि शिक्षणाची केंद्रं होती. इथे अनेक आंतरराष्ट्रीय भिक्षू शिक्षण घेण्यासाठी आले होते आणि बुद्धाची शिकवण घेऊन जगभर गेले. सम्राट अशोकाने या भागात बौद्ध धम्माचा प्रसार केला. त्यानंतर येथील कुशल मूर्तिकारांनी बौद्ध धम्माशी संबंधित गांधार शैलीतील कलाकृती निर्माण केल्या. ज्या आजही समृद्ध परंपरेची साक्ष देतात. हे स्थळ इतकं समृद्ध आहे की, त्याचा समावेश UNESCO च्या जागतिक वारसास्थळांच्या यादीत करता येऊ शकतो.

शून्य टक्के बौद्ध

बौद्ध धम्माचा समृद्ध इतिहास असणाऱ्या या परिसरात आज एकही बौद्ध धर्मीय सापडणार नाही. पाकिस्तानमधील बौद्ध धर्मीयांची संख्या शून्य टक्क्यांजवळ आली आहे. ही घसरण केवळ जनसंख्याशास्त्रीय बदलामुळे नाही, तर धार्मिक कट्टरतेच्या पार्श्वभूमीवर आहे. छळ, हिंसाचार आणि असुरक्षिततेमुळे अनेक बौद्ध अनुयायांनी हा देश सोडला किंवा आपली ओळख लपवून ठेवली आहे.

राज्यपुरस्कृत कट्टरतावाद आणि हल्ले

पाकिस्तानमधील सरकारचा आश्रय लाभलेल्या अनेक इस्लामी कट्टरवाद्यांनी अल्पसंख्याकांवर सातत्याने हल्ले केले. हिंदू, शीख, ख्रिश्चन यांच्या प्रमाणेच बौद्ध धर्मीयही त्यांच्या रडारवर होते. अनेक बौद्ध स्थळांवर हल्ले झाले, अनेक बौद्धमूर्ती भग्न केल्या गेल्या आणि कलाकृतींना नुकसान पोहोचवण्यात आलं. शेजारील अफगाणिस्तानमध्ये तालिबानने २००१ साली बामियानच्या बुद्ध मूर्ती उध्वस्त केल्या. हाच प्रकार पाकिस्तानमधील काही भागांतही झाला, पण याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचं पुरेसं लक्ष गेलं नाही. स्वात खोऱ्यातील बुद्ध मूर्तींचं अपहरण, विक्री आणि विध्वंस झाल्याच्या घटना सातत्याने समोर आल्या आहेत.

सरकारचं विरोधाभासी धोरणं

पाकिस्तान सरकार एकीकडे ‘धर्मनिरपेक्षतेचा’ मुखवटा घालून विविध धार्मिक पर्यटन उपक्रम राबवते. यात गांधार परिसंवाद, वर्षा वास महोत्सव किंवा बुद्ध भिक्षूंसाठी पर्यटन दौऱ्यांचा समावेश असतो. परंतु, या सगळ्या गोष्टी केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा जपण्यासाठी आहेत. देशांतर्गत परिस्थिती मात्र पूर्णतः वेगळी आहे. गांधार प्रांतात सरकारकडून आयोजित करण्यात येणाऱ्या वर्षा वास या पारंपरिक बौद्ध महोत्सवाच्या वेळी एकही बौद्ध अनुयायी नसतो. या कार्यक्रमाचा हेतू केवळ पर्यटन वाढवणे इतकाच असतो.

सांस्कृतिक वारशाचा ऱ्हास

बौद्ध धर्माशी संबंधित वास्तू, मूर्ती आणि पुरातत्त्वीय अवशेष आज उपेक्षेचा आणि विध्वंसाचा सामना करत आहेत. अनेक ऐतिहासिक स्तूप आणि विहार नकाशावरून नाहीसे झाले आहेत. अशा गोष्टी केवळ स्थानिक दहशतवाद्यांच्याच नव्हे, तर अनेकदा जाणीवपूर्वक केलेल्या सरकारी दुर्लक्षामुळे घडतात. पाकिस्तानातील आर्थिक संकटामुळे पुरातत्त्वीय जतनासाठी निधी मिळत नाही. पुरेशी सुरक्षा यंत्रणा नसल्यामुळे अनेक मौल्यवान वस्तू चोरी जातात किंवा काळ्या बाजारात विकल्या जातात. काही स्थानिक रहिवासी उपजीविकेसाठीच या अवशेषांची तस्करी करतात.

पर्यटन आणि आंतरराष्ट्रीय दबावाचा अभाव

गांधार, तक्षशिला आणि स्वातसारखी बौद्ध इतिहासाची स्थळं पर्यटनासाठी प्रचंड महत्त्वाची आहेत. मात्र, पाकिस्तान सरकारकडून संवर्धन प्रचाराचा अभाव, दहशतवादी धोका, आणि मूलभूत सुविधांची कमतरता यामुळे धार्मिक पर्यटन पुरते कोसळले आहे. परिणामी, स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसतो आणि वारसा जपण्याची प्रेरणा आणखी कमी होते.

बौद्ध समाजासाठी जागतिक पातळीवर समर्थनाची गरज

पाकिस्तानमध्ये उरलेल्या थोडक्या बौद्ध अनुयायांना सुरक्षितता, धार्मिक स्वातंत्र्य आणि सामाजिक सन्मान मिळायला हवा. यासाठी जगातील बौद्ध देशांनी एकत्रित आवाज उठवला पाहिजे. UNESCO आणि संयुक्त राष्ट्रांच्या माध्यमातून पाकिस्तानवर दबाव आणून वारशाच्या ठिकाणांचं संरक्षण सुनिश्चित केलं पाहिजे.

पाकिस्तानमधील बौद्धधम्माचा विनाश हा केवळ एका धर्माचा ऱ्हास नाही. तर तो मानवतेच्या शांतीच्या संदेशाचा, सहिष्णुतेचा आणि सांस्कृतिक वारशाचा विनाश आहे. कधी काळी समृद्ध कला-संस्कृतीने शृंगारलेली गांधार प्रांतातील बौद्ध परंपरा आज आक्रंदत आहे. पाकिस्तानमधील शून्यावर आलेली बौद्ध लोकसंख्या, कट्टरवाद्यांचा दबाव, सरकारी दिशाभूल आणि आर्थिक उदासीनता यामुळे हा वारसा दृष्टीआड गेला आहे.