Canada Rejected Indian Student Visa Applications : उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याची कित्येक भारतीय विद्यार्थ्यांना इच्छा असते. अमेरिका आणि कॅनडा यांसारख्या देशांत दरवर्षी मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी जातात. यादरम्यान कॅनडाने असंख्य भारतीयांचे व्हिसा (पारपत्र) अर्ज नाकारल्याची माहिती समोर आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ऑगस्ट २०२५ मध्ये जवळपास चारपैकी तीन भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज रद्द केल्याचे इमिग्रेशनच्या आकडेवारीतून समोर आले आहे. कॅनडाने इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थ्यांचे पारपत्र अर्ज का नाकारले? नेमकी काय आहेत त्यामागची कारणं? याविषयीचा हा सविस्तर आढावा…

वृत्तसंस्था रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांचे व्हिसा अर्ज नाकारण्याचे प्रमाण तब्बल ७४ टक्के इतके आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये हा दर ३२ टक्क्यांच्या आसपास होता. गेल्या दोन वर्षात जागतिक स्तरावर जवळपास ४० टक्के भारतीय विद्यार्थ्यांचे पारपत्र अर्ज नाकारल्याची माहिती आकडेवारीतून समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे, चिनी विद्यार्थ्यांचे पारपत्र अर्ज नाकारण्याचा दर केवळ २४% इतका आहे. व्हिसा अर्ज वारंवार फेटाळले जात असल्याने अर्जदारांच्या संख्येतही मोठी घट दिसून आली आहे.

अर्जदारांची संख्याही होतेय कमी

  • ऑगस्ट २०२३ मध्ये २० हजार ९०० भारतीय विद्यार्थ्यांनी कॅनडात शिक्षण घेण्याकरिता पारपत्रासाठी अर्ज केले होते.
  • ऑगस्ट २०२५ मध्ये ही संख्या फक्त चार हजार ५१५ इतकी आहे.
  • अर्जांची संख्या घटली असली तरी १,००० हून अधिक विद्यार्थ्यांचे अर्ज मंजूर झालेल्या देशांपैकी भारतीय विद्यार्थ्यांना पारपत्र नाकारण्याचा दर सर्वाधिक आहे.
  • अर्जदारांची संख्या कमी होऊनही नकाराचा दर इतका वाढणे, हे कॅनडात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठे आव्हान ठरले आहे.
  • कॅनडामध्ये शिकण्याचा किंवा राहण्याचा मानस असलेल्या भारतीयांवर याचा मोठा परिणाम होताना दिसून येत आहे.

आणखी वाचा : Prostate Cancer Symptoms : पुरुषांमध्ये झपाट्यानं वाढतंय ‘या’ कॅन्सरचं प्रमाण; लघवीतून दिसतं पहिलं लक्षण; तज्ज्ञांचा इशारा काय?

भारत-कॅनडा संबंध कशामुळे बिघडले?

भारत आणि कॅनडा यांच्यातील संबंध काही महिन्यांपासून ताणले गेले आहेत. त्याच कारणामुळे कॅनडा सरकार भारतीय विद्यार्थ्यांचे पारपत्र अर्ज नाकारत असल्याचे सांगितले जात आहे. २०२३ मध्ये एका कॅनेडियन शीख फुटीरतावादी नेत्याची हत्या झाली होती. या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाचे तत्कालीन पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी केला होता. भारताने त्यांचा हा दावा सातत्याने फेटाळून लावला आहे. परिणामी दोन्ही देशांमधील संबंध काही काळापासून ताणले गेलेले आहेत. दरम्यान, २०२३ मध्ये एक हजार ५५० हून अधिक विद्यार्थ्यांनी कॅनडाचे बनावट पारपत्र तयार केले होते, त्यामध्ये बहुतांश भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश असल्याचा आरोप कॅनडाकडून करण्यात आला. हीच बाब लक्षात घेता देशातील पारपत्राचे नियम अधिकच कठोर करण्यात आल्याचे कॅनडाच्या इमिग्रेशन विभागाने सांगितले आहे.

कॅनडियन अधिकाऱ्यांनी ‘या’ गोष्टीला धरलं जबाबदार

  • गेल्या काही वर्षांपासून कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शैक्षणिक पारपत्रांची संख्या कमी केली आहे.
  • २०२४ च्या पहिल्या तिमाहीत ४४ हजार २९५ भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा मंजूर झाले होते.
  • हा आकडा व्हिसा मंजूर झालेल्या एकूण अर्जांपैकी ३६.५ टक्के इतका होता.
  • यावर्षी २०२५ मध्ये कॅनडाने केवळ ३० हजार ६४० भारतीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिसा दिला आहे.
  • व्हिसासाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर केला जात असल्यामुळे त्यांचे अर्ज नाकारले जात असल्याचे कॅनडियन अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
  • विद्यार्थी आणि त्यांचे सल्लागार दोघेही अर्जासाठी कृत्रिम बुद्धिमतेचा वापर करीत आहेत, त्यामुळेच त्यांच्या अर्जात असंख्य चुका होत आहेत.
  • मात्र, त्याबाबत कुठलीही दक्षता न घेता विद्यार्थी कॅनडाच्या यंत्रणेलाच जबाबदार धरत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

भारतीय दुतावासाचे म्हणणे काय?

या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना भारतीय दूतावासाने एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. “कॅनडात शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना वारंवार पारपत्र नाकारले जाणे हे खूपच गंभीर आहे. आम्ही या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. जगभरातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेणारे अनेक उत्कृष्ट विद्यार्थी भारतातूनच येतात. कॅनेडियन विद्यापीठांना भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रतिभा आणि शैक्षणिक उत्कृष्टतेचा दीर्घकाळ फायदा झाला आहे,” असे दूतावासाने निवेदनात नमूद केले आहे. दरम्यान, कॅनडाच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांनी ऑक्टोबरमध्ये भारत दौऱ्यादरम्यान रॉयटर्सला सांगितले की, कॅनडा भारतीय विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यास कटिबद्ध आहे, परंतु इमिग्रेशन प्रणालीची प्रामाणिकता जपणेही आवश्यक आहे.

हेही वाचा : युद्धविराम होताच पाकिस्तानची मुस्कटदाबी; अफगाणिस्तानच्या ‘त्या’ निर्णयाला भारताचा पाठिंबा, प्रकरण काय?

कॅनडातील भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट

कॅनडातील अनेक विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या संख्येत मोठी घसरण नोंदवली गेली आहे. देशातील सर्वात मोठे अभियांत्रिकी महाविद्यालय असलेल्या युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलूमध्ये पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांची संख्या गेल्या चार वर्षांत सुमारे दोन-तृतीयांशने कमी झाल्याचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ वॉटरलूच्या प्रवेश व्यवस्थापन विभागाचे सहयोगी उपाध्यक्ष इयान वँडरबर्ग यांनी या घटीसाठी कॅनडियन सरकारला कारणीभूत धरले आहे. दरवर्षी लाखो विद्यार्थी कॅनडाचे शैक्षणिक पारपत्र मिळण्यासाठी अर्ज करतात, पण सरकारने त्यासंदर्भातील नियम कठोर केल्यामुळेच त्यांचे अर्ज नाकारले जात असून त्याचा मोठा फटका विद्यापीठांना बसत आहे, असे वँडरबर्ग यांनी म्हटले आहे. युनिव्हर्सिटी ऑफ रेजिना आणि युनिव्हर्सिटी ऑफ सॅस्काचेवान यांसारख्या इतर कॅनेडियन विद्यापीठांमध्येही भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत घट दिसून आली आहे.