China Mysterious Shiyan‑28B Satellite: चीनने ३ जुलै रोजी एक उपग्रह प्रक्षेपित केला आणि त्यानंतर हा उपग्रह अचानक रडारवरून गायब झाला. साधारण सहा दिवसांनंतर हा उपग्रह अखेर कक्षेत फिरताना आढळला आहे, असे वृत्त चीनमधील गिझमोडोने दिले आहे. साधारणपणे प्रक्षेपणानंतर २४ ते ४८ तासांत उपग्रहाचा मागोवा घेणे सुरू होते. मात्र, तो सहा दिवस पूर्णपणे गायब होता.
सहा दिवसांनी मिळाले उत्तर
९ जुलै रोजी यूएस फोर्सच्या स्पेस डोमेन अवेअरनेस युनिटने अखेर ७९४ ७९६ किलोमीटरच्या कक्षेत शियान-२८बी ०१ या उपग्रहाचा मागोवा घेतला आहे. त्याचा कल फक्त ११ अंश असल्याचे आढळून आले, तर प्रक्षेपणाच्यावेळी त्याचा कल ३५ अंश असल्याचे मानले जाते. म्हणजेच उपग्रह वाहून नेणाऱ्या रॉकेटने उड्डाणादरम्यान दिशा बदलली आणि तीन वेळा बर्न करून कल कमी केला, अशी परिस्थिती साधारण नाही.
ही कक्षा असामान्य का आहे?
अंतराळतज्ज्ञ जोनाथन मॅकडॉवेल यांनी नमूद केले की, चीनने यापूर्वी कधीही इतक्या कमी कल असलेल्या कक्षेचा वापर केलेला नाही. ही कक्षा थेट दक्षिण चीन समुद्र आणि हिंद महासागरातून जाते, त्यामुळे चीनचा उद्देश तंत्रज्ञान चाचणीच्या पलीकडे संभाव्य देखरेख किंवा धोरणात्मक उद्दिष्टांपर्यंत असू शकतो असे सूचित होते.
चीनच्या हालचाली का तपासल्या जात आहेत?
शियान मालिकेतील उपग्रहांचा इतिहास गूढ असल्याने चीनच्या हेतूंवर शंका उपस्थित केल्या जात आहेत. चीनचा असा दावा आहे की, हे उपग्रह अंतराळ वातावरणाचा अभ्यास करण्यासाठी आहे, तसंच तज्ज्ञांचा असा अंदाज आहे की, त्यापैकी अनेकांचा लष्करी उपयोग आहे.
विशेष म्हणजे दोन चिनी उपग्रहांनी अलीकडेच ऑर्बिटल रिफ्युएलिंगचा समावेश असलेले एक विशेष डॉकिंग ऑपरेशन राबवविले. हे एक तंत्रज्ञान आहे, जे उपग्रहाचे ऑपरेशनल आयुष्य वाढवू शकते आणि लष्करी देखरेख राखू शकते.
नासाचेदेखील लक्ष
अमेरिकन अंतराळ संस्था नासा या उपग्रहाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. चीनच्या वाढत्या अंतराळ क्षमता आणि गुप्त मोहिमा जागतिक सत्रावर चिंता निर्माण करत आहेत. चीन केवळ चंद्र आणि मंगळावर नमुने पाठवण्याच्या योजना आखत नाही तर ते त्यांच्या गुप्त मोहिमांद्वारे पृथ्वीच्या कक्षेत आपले स्थान मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. ही वाढती शक्ती जागतिक संतुलनावर परिणाम करू शकते, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
चीनने मंगळावरून नमुने मिळवण्याची योजनादेखील जाहीर केली आहे, यामध्ये नासादेखील चीनच्या तुलनेत पिछाडीवर आहे. चीनने तपासणी टाळण्यासाठी अनेकदा कक्षेत गुप्त हालचाली केल्या आहेत. नासा सध्या चीनच्या नवीनतम उपग्रहावर आणि त्याद्वारे ते काय साध्य करायचे आहे यावर लक्ष ठेवून आहे. दरम्यान, चीनने अद्याप या उपग्रहाचा नेमका हेतू आणि कार्यप्रणाली उघड केलेले नाही.
एकंदर शियान-२८बी ०१ हा चीनच्या रहस्यमयी शियान उपग्रह मालिकेतील एक अत्याधुनिक उपकरण आहे. या उपग्रहाच्या कमी कलण्याचा, ट्रॅकिंगमध्ये विलंब होण्याचा आणि गुप्त नियोजनबाबत विचार करता हे एक रणनीतिक प्रयोग असल्याचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे, त्यामुळे भारतासह जगभरातून यावर लक्ष ठेवले जात आहे.
चीन ज्या वेगाने अवकाश क्षेत्रात तांत्रिक झेप घेत आहे, त्यामुळे अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांसमोर एक नवीन धोरणात्मक आव्हान निर्माण झाले आहे. चीनचे अंतराळ तंत्रज्ञानदेखील भारतासाठी धोक्याची घंटा आहे. जरी चीन आपला अंतराळ कार्यक्रम नागरी वापरासाठी आणि लोकांच्या कल्याणासाठी असल्याचा दावा करत असला, तरी ज्या तंत्रज्ञानावर ते काम करत आहे ते सहजपणे लष्करी उद्देशांसाठी वापरले जाऊ शकते.
महत्त्वाचे मुद्दे:
- ३ जुलै रोजी शियान-२८बी ०१ (Xian-28B 01) हा उपग्रह चीनने प्रक्षेपित केला
- प्रक्षेपणानंतर काही तासांतच उपग्रह कक्षेतून गायब झाला होता
- यामुळे जागतिक अंतराळ निरीक्षक व संशोधकांमध्ये संभ्रम निर्माण झाला
- ६ दिवसांनी उपग्रह पुन्हा कक्षेत दिसू लागला
- चीनने याचे उद्दिष्ट वैज्ञानिक प्रयोग व अंतराळ वातावरण निरीक्षण असल्याचे जाहीर केले
- अमेरिका व इतर देश या हालचालींकडे बारीक लक्ष ठेवत आहेत
- यामुळे अंतराळातील शस्त्रीकरणावर नवा चर्चेचा मुद्दा निर्माण झाला आहे
सुमारे ६० उपग्रह असलेले चीनचे बेईडौ नेव्हिगेशन नेटवर्कने आता जागतिक कव्हरेज देण्यास सुरुवात केली आहे आणि ते एक मोठे हेरगिरीचे नेटवर्क ठरले आहे. चिनी वृत्तांनुसार, चिनी सैन्य म्हणजेच पीएलए आता अमेरिकेच्या जीपीएसपेक्षा अधिक अचूक स्थान आणि वेळेचा डेटा मिळवत आहे, तेही प्रामुख्याने आशिया-पॅसिफिकमध्ये. भारतीय सैन्याने गेल्या आठवड्यात असेही म्हटले होते की, मे महिन्यात पाकिस्तानशी झालेल्या संघर्षादरम्यान चीन भारतीय लष्करी तळांबद्दल पाकिस्तानला लाईव्ह फीड देत होता. चीनचे हे उपग्रह नेटवर्क चिनी सैन्याच्या क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि इतर शस्त्रांना अचूकपणे कमांड देऊ शकते. त्यात शॉर्ट मेसेजिंगसारख्या सेवादेखील आहेत, ज्या युद्धादरम्यान संवादाचा पर्यायी मार्ग ठरू शकतात.
चीनने पृथ्वीच्या खालच्या कक्षेत उपग्रह तैनात करण्यास सुरुवात केली आहे आणि साउथ चायना मॉर्निंग पोस्ट (SCMP)च्या अहवालानुसार, चीनचे किमान दोन उपग्रह कमी कक्षेत अजूनही विकासाच्या टप्प्यात आहेत. Qianfan, जे G60 स्टारलिंक म्हणूनही ओळखले जाते, ते शांघाय स्पेसकॉम उपग्रह तंत्रज्ञानाद्वारे विकसित केले जात आहे आणि ते १४ हजार उपग्रहांसमवेत ब्रॉडबँड नेटवर्क आहे. गेल्या वर्षीपासून सुमारे ९० उपग्रह प्रक्षेपित करण्यात आले आहेत आणि चीनने २०३० पर्यंत हा कार्यक्रम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. याव्यतिरिक्त चीन उपग्रह नेटवर्क ग्रुप गुओवांग कार्यक्रम चालवत आहे. या कार्यक्रमाचा उद्देश १३ हजार उपग्रहांसह दोन उप-नक्षत्र तयार करणे असा आहे. हे २०२४ च्या अखेरीस सुरू झाले आणि जूनपर्यंत ३४ उपग्रह निम्न-पृथ्वी कक्षेत प्रक्षेपित करण्यात आले आहेत.