पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने १९६० च्या सिंधू जल करार (आयडब्ल्यूटी) स्थगित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान आता चीनने पाकिस्तानच्या मदतीचा भाग म्हणून पाकिस्तानातील आपल्या धरणाचे कामकाज वेगाने सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनमधील सरकारी मालकीची चायना एनर्जी इंजिनियरिंग कॉर्पोरेशन २०१९ पासून वायव्य पाकिस्तानमधील खैबर पख्तुनख्वा प्रांतातील मोहमंद जलविद्युत प्रकल्पावर काम करीत आहे. हा प्रकल्प पुढील वर्षी पूर्ण होणार होता. मात्र, आता भारत-पाकिस्तान तणावादरम्यान हा प्रकल्प वेगात सुरू करण्याचे काम चीनने हाती घेतले आहे. परंतु, त्यामागील कारण काय? काय आहे मोहमंद धरण प्रकल्प? त्याविषयी जाणून घेऊ…

काम वेगाने सुरू करण्यामागील कारण काय?

साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, धरणावरील काँक्रीट भरणे सुरू झाले आहे. हा पाकिस्तानच्या या राष्ट्रीय प्रमुख प्रकल्पासाठीचा एक महत्त्वाचा बांधकाम टप्पा आणि विकासाचा टप्पा आहे. या प्रकल्पाचे कामकाज अधिकृतपणे सप्टेंबर २०१९ मध्ये सुरू झाले आणि पुढील वर्षी त्याचे काम पूर्ण होणार होते. परंतु, प्रकल्पाला नियोजित कालावधीपेक्षा विलंब झाला. उपपंतप्रधान व परराष्ट्रमंत्री इशाक दार सोमवारी चीनच्या राजदूत वांग यी यांच्याशी चर्चा करण्यासाठी बीजिंगला भेट देणार आहेत. त्यापूर्वी हे पाऊल उचलण्यात आले आहे. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या प्राणघातक दहशतवादी हल्ल्यानंतर १९६० चा सिंधू जल करार स्थगित करण्याच्या भारताच्या घोषणेनंतर चीनने हे पाऊल उचलले.

सिंधू जल करारात काय?

भारतात उगम पावणाऱ्या आणि त्यानंतर पाकिस्तानमध्ये वाहत जाणाऱ्या नद्या व त्यांच्या उपनद्यांच्या पाण्याच्या वाटपासंदर्भातला हा करार आहे. जागतिक बँकेच्या मध्यस्थीने भारत आणि पाकिस्तानमध्ये हा करार १९ सप्टेंबर १९६० ला कराची येथे करण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयुब खान यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. दोन्ही देशांमधून वाहणाऱ्या सहा नद्यांच्या पाण्याच्या वापरावर या कराराद्वारे शिक्कामोर्तब करण्यात आले होते. या करारानुसार बियास, रावी व सतलज या नद्यांच्या पाण्यावर पूर्णपणे भारताचा हक्क असेल. तर सिंधू, चिनाब व झेलम या नद्यांच्या पाण्यावर पाकिस्तानचा हक्क असेल, असे निश्चित करण्यात आले होते. या कराराला पहलगाम हल्ल्यानंतर स्थगिती देण्यात आली.

२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर काही दिवसांनी भारताने सिंधू जल करार तत्काळ स्थगित केला आणि हा निर्णय पाकिस्तानला कळवला. त्या हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारताने उचललेल्या पावलांपैकी हे एक महत्त्वाचे पाऊल होते. अलीकडेच पाकिस्तानने या विषयावर पहिल्यांदाच चर्चा करण्याची तयारी दर्शवली. कराराच्या स्थगितीनंतरच चीन-पाकिस्तान धरण प्रकल्पाने वेग घेतला.

चीन-पाकिस्तानचा मोहमंद धरण प्रकल्प काय आहे?

मोहमंद धरण हे पाकिस्तानच्या वायव्येकडील खैबर पख्तुनख्वा प्रांतात मोहमंद जिल्ह्यातील स्वात नदीच्या पलीकडे बांधण्यात येत आहे. हे मल्टिपल काँक्रीट-फेस केलेले रॉकफिल धरण आहे. या धरणाचे काम पूर्ण झाल्यावर या प्रदेशातील पूरनियंत्रण, सिंचन, पिण्याचे पाणी व वीज यासंबंधीच्या समस्या सुटतील. हे जगातील पाचवे सर्वांत उंच धरण असणार आहे, ज्याची उंची ७०० फूट असेल. धरण एकदा कार्यान्वित झाल्यानंतर ८०० मेगावॉट जलविद्युत निर्माण करील आणि प्रांतीय राजधानी पेशावरला दररोज ३० कोटी गॅलन पाणी पुरवेल, अशी अपेक्षा आहे. धरणातील पाणी हजारो एकर शेतीयोग्य जमिनीचे सिंचन करील आणि खालच्या प्रवाहातील भागांना हंगामी पुरापासून वाचवेल, अशीही माहिती आहे.

पाकिस्तानमध्ये धरण बांधणीची सद्य:स्थिती काय?

फेब्रुवारी २०२५ मध्ये पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृतात असे नमूद करण्यात आले होते की, २०२७ पर्यंत या धरणाचे काम पूर्ण होऊन हे धरण कार्यान्वित होईल. वीज व सिंचन बोगद्यांचे उत्खनन, स्पिलवेचे बांधकाम आणि मुख्य व अपस्ट्रीम कॉफरडॅमचे काम सध्या सुरू आहे. कामकाजाचे अनेक टप्पे निर्धारित वेळापत्रकापेक्षा पुढे असल्याचे वृत्त आहे. परंतु, चीनचा सहभाग आणि अलीकडील भारत-पाकिस्तान यांच्यातील प्रादेशिक तणाव यांमुळे बांधकामाची निर्धारित वेळ बदलण्यात आली आहे. मुख्य म्हणजे पाकिस्तानला चीन अनेक मार्गांनी मदत करीत आहे. पाकिस्तानची पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी डायमर-भाशा धरण विकसित करण्यासही मदत करीत आहे. हे धरण खैबर पख्तुनख्वा आणि गिलगिट-बाल्टिस्तानजवळ असणाऱ्या सिंधू नदीवर चिलास येथे बांधण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चीनने पाकिस्तानला अनेक शस्त्रे पुरवली आहेत. याचा पुरावा म्हणजे पाकिस्तानने चिनी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतीय लष्करी आस्थापना, तसेच नागरी भागात हल्ल्याचे प्रयत्न केले, जे भारताने निष्फळ ठरविले. पाकिस्तानच्या निष्प्रभ केलेल्या लष्करी सामग्रीचे पुरावे भारतीय सैन्य दलाने पत्रकार परिषदेत सादर केले होते. त्यात चिनी पीएल–१५ क्षेपणास्त्रांच्या अवशेषांचादेखील समावेश होता. मुख्य म्हणजे ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये नऊ दहशतवादी तळांवर हल्ले केले. परंतु, या हल्ल्यांचा थांगपत्ता पाकिस्तानात तैनात केलेल्या चीनच्या हवाई संरक्षण प्रणालींना लागला नाही. त्यानंतरच्या हल्ल्यात भारताला अनेक चिनी हवाई संरक्षण रडार प्रणालींना निष्प्रभ करण्यात यश आले.