China hands over third Hangor class submarine to Pakistan: चीनने पाकिस्तानला आठ नवीन प्रगत हँगोर श्रेणीतील पाणबुड्यांपैकी तिसरी पाणबुडी सुपूर्द केली आहे. हिंद महासागरातील आपले वाढते अस्तित्व मजबूत करण्यासाठी इस्लामाबादच्या नौदल क्षमतेत वाढ घडवून आणण्याच्या बीजिंगच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. हँगोर-श्रेणीतील तिसऱ्या पाणबुडीचा जलावतरण सोहळा मध्य चीनच्या हुबेई प्रांतातील वुहान येथे गुरुवारी पार पडला, असे वृत्त चीनच्या ग्लोबल टाइम्सने शनिवारी (१६ ऑगस्ट २०२५) दिले. चीन पाकिस्तानसाठी बांधत असलेल्या आठ पाणबुड्यांपैकी दुसरी पाणबुडी यावर्षी मार्च महिन्यात पाकिस्तानला सुपूर्द करण्यात आली होती.
गेल्या काही वर्षांत चीनने पाकिस्तानला चार आधुनिक युद्धनौका (फ्रिगेट्स) दिल्या आहेत. अरबी समुद्रात चीनचं नौदल हळूहळू त्यांचं अस्तित्व वाढवत आहे. त्याचबरोबर पाकिस्तानातील ग्वादर बंदर आणि हिंद महासागरातील चीनच्या वाढत्या कारवाया लक्षात घेता, पाकिस्तानच्या नौदलाला मजबूत करण्यासाठी या युद्धनौकांचा पुरवठा करण्यात आला आहे. तिसऱ्या पाणबुडीच्या जलावतरण सोहळ्यात पाकिस्तानचे डेप्युटी चीफ ऑफ नेव्हल स्टाफ प्रोजेक्ट-२, व्हाइस अॅडमिरल अब्दुल समद म्हणाले की, हँगोर- श्रेणीतील या पाणबुडीमध्ये असलेली आधुनिक शस्त्रं आणि प्रगत सेन्सर्स प्रादेशिक शक्तीचं संतुलन राखण्यासाठी आणि समुद्रात स्थैर्य टिकवण्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहेत. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हे नमूद करण्यात आलं आहे.
स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट (SIPRI) च्या ताज्या अहवालानुसार, पाकिस्तानला मिळणारं ८०% पेक्षा जास्त लष्करी साहित्य चीनकडून पुरवलं जातं.
गेल्या पाच वर्षांत पाकिस्तानने चीनला काही मोठ्या ऑर्डर्स दिल्या आहेत. त्यात देशाचं पहिलं गुप्तचर जहाज ‘रिझवान’, ६०० पेक्षा जास्त VT-4 रणगाडे, आणि ३६ J-10CE आधुनिक लढाऊ विमाने यांचा समावेश आहे.
२०२२ मध्ये चीनने पाकिस्तानी हवाई दलाला बहुउद्देशीय J-10CE लढाऊ विमाने दिली. आधीपासून असलेल्या पाकिस्तान-चीनच्या संयुक्त निर्मित JF-17 लढाऊ विमानांच्या यादीत या विमानांचा समावेश झाला आहे. अलीकडच्या भारत-पाकिस्तान संघर्षात पाकिस्तानने या विमानांचा वापर केला होता.
चीनचे लष्करी तज्ज्ञ झांग जुनशे यांनी सांगितलं की, हँगोर-श्रेणीतील पाणबुडी ही पाण्याखालचे युद्ध लढण्यासाठी खूप शक्तिशाली आहे. यात प्रगत सेन्सर प्रणाली आहे, शिवाय ती वेगवान आहे. शस्त्रास्त्रांसह लांबचा पल्ला गाठू शकते.
१९७१ चं भारत–पाक युद्ध आणि पहिली हँगोर पाणबुडी
- हँगोर हे नाव पहिल्यांदा १९७१ च्या भारत-पाक युद्धात चर्चेत आलं.
- तेव्हा पाकिस्तान नौदलाकडे फ्रान्सकडून आणलेली Daphne-class submarine (PNS Hangor) होती.
- ९ डिसेंबर १९७१ रोजी या हँगोर पाणबुडीने भारतीय नौदलाची INS Khukri ही युद्धनौकं बुडवली होती.
- हे भारतीय नौदलाचं आजवरचं सर्वात मोठं नुकसान मानलं जातं, कारण त्या हल्ल्यात १८ कर्तव्यदक्ष नौदल अधिकारी व १७६ सैनिक शहीद झाले होते.
- हा हल्ला आजही पाकिस्तान त्यांच्या लष्करी इतिहासातील “गौरवशाली क्षण” म्हणून सांगतो, तर भारतासाठी तो मोठा दुःखद क्षण होता.
INS Khukri
१९७१ च्या भारत–पाक युद्धात भारतीय नौदलाला बसलेला सर्वात मोठा धक्का म्हणजे INS खुक्रीला मिळालेली जलसमाधी. ९ डिसेंबर १९७१ रोजी गुजरातच्या दीव किनाऱ्याजवळ INS खुक्री आणि INS कृपाण या दोन भारतीय नौका गस्त घालत होत्या. याच दरम्यान पाकिस्तानच्या PNS Hangor ने अचानक पाणतीरांचा हल्ला चढवला आणि काही क्षणांतच INS खुक्री समुद्रात बुडाली. या हल्ल्यात युद्धनौकेचे कॅप्टन कमांडर महेन्द्रनाथ मल्ल यांच्यासह अनेक भारतीय नौसैनिक शहीद झाले. युद्धनौका वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे लक्षात आल्यानंतर कमांडर मल्ला यांनी युद्धनौका सोडण्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांसह जलसमाधी घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या अद्वितीय शौर्य आणि बलिदानासाठी त्यांना मरणोत्तर महावीर चक्राने गौरवण्यात आलं. ही घटना भारतीय नौदलाच्या इतिहासातील एक करुण पण तरीही धीरोदात्तपणाचा अध्याय म्हणून सदैव स्मरणात आहे.
नव्या हँगोर-श्रेणीतील पाणबुड्या
- पाकिस्तानने चीनसोबत करार करून नव्या पाणबुड्या मिळवायला सुरुवात केली आणि जुनी हँगोर परंपरा पुढे चालवण्यासाठी त्यांना हँगोर-क्लास असं नाव देण्यात आलं.
- एकूण ८ पाणबुड्या तयार केल्या जात आहेत, त्यापैकी काही चीनमध्ये, तर काही पाकिस्तानातील कराची शिपयार्डमध्ये तयार केल्या जात आहेत.
- या पाणबुड्या पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानयुक्त असून, भारताच्या नौदलाला उत्तर देण्यासाठी पाकिस्तान त्यांचा वापर करणार आहे.
रणनीतिक अर्थ
- पाकिस्तान हँगोर या नावाच्या माध्यमातून भारतावर मानसिक व तांत्रिक दबाव निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहे.
- भारतासाठी हा एक सुरक्षेचा मोठा आव्हानात्मक मुद्दा आहे, कारण या पाणबुड्यांमुळे हिंद महासागरातील सामरिक समीकरणं बदलू शकतात.
चीनकडून पाकिस्तानला मिळालेल्या नव्या हँगोर-श्रेणीतील पाणबुड्या या केवळ लष्करी तंत्रज्ञानाचा भाग नाहीत, तर १९७१ च्या युद्धातील INS खुक्री दुर्घटनेची आठवण करून देणारा मनोयुद्धाचा भाग आहेत. पाकिस्तान आपल्या नौदल शक्तीत वाढ करून हिंद महासागरात वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न करत असताना, भारतासाठी या पाणबुड्या एक गंभीर सुरक्षेचं आव्हान ठरतात. त्यामुळे या घडामोडी केवळ भारत-पाकिस्तानपुरत्याच मर्यादित नसून, हिंद महासागरातील भविष्यातील सामरिक संतुलनावर थेट परिणाम करणाऱ्या ठरत आहेत.