China Bohai Sea Monster तंत्रज्ञान क्षेत्रात चीन अग्रेसर आहे. चीनकडून विकसित करण्यात येणाऱ्या वस्तू, शस्त्रे आणि नवनवीन संशोधने यांची कायम चर्चा होत असते. सध्या सर्वत्र चीनच्या ‘बोहाई सी मॉन्स्टर’ची चर्चा आहे. नावावरून जरी ही चर्चा एखाद्या राक्षसाविषयी सुरू आहे, असे वाटत असले तरी ही चर्चा एका बोटीविषयी आहे. ही बोट साधीसुधी नसून, एक उडणारी बोट आहे. सोशल मीडियावर काही छायाचित्रे समोर आल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. ही छायाचित्रे प्राचीनच्या विंग-इन-ग्राउंड इफेक्ट (WIG) क्राफ्टची असल्याचे समोर आले आहे. त्याला ‘बोहाई सी मॉन्स्टर’ म्हणूनदेखील ओळखले जाते. चीन करीत असलेला हा नवीन प्रयोग जहाज आणि विमान यांच्यातील संयोजन आहे. परंतु, त्यामुळे अनेक धोरणात्मक प्रश्न उपस्थित झाले आहेत. काय आहे चीनचे ‘बोहाई सी मॉन्स्टर’? या सागरी कार्गो लिफ्टरचे महत्त्व काय? युद्धात त्याचा वापर केला जाऊ शकतो का? याविषयी जाणून घेऊयात.
चीनचे ‘बोहाई सी मॉन्स्टर‘
- चीनच्या विंग-इन-ग्राउंड इफेक्ट (WIG) या जहाजाचे फोटो १० दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्याला ‘बोहाई सी मॉन्स्टर’, असेदेखील नाव देण्यात आले होते.
- सर्वप्रथम या जहाजाच्या उपस्थितीचे वृत्त ‘नेव्हल न्यूज’ने दिले होते. एका छायाचित्रात या विमानाचा पुढील भाग म्हणजेच नाक लपवलेले दिसले.
- त्या छायाचित्रात ही उडणारी बोट बोहाई समुद्रावर असल्याचे दिसून आले.
- ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तांनुसार, छायाचित्रांमध्ये प्रत्येक पंखाच्या टोकाला एक फ्लोट बसवलेला दिसला आणि या जहाजाच्या पंखांवरती शेजारी चार इंजिने बसवण्यात आल्याचे दिसले.
- ते इंजिन जेट इंजिन असल्याचे सांगितले जात आहे. लष्करी वेबसाइट ‘द वॉर झोन’ने म्हटले आहे की, ते प्रोपेलर इंजिनदेखील असू शकतात.

ही उडणारी बोट नेमकी काय? त्याचे वैशिष्ट्य काय?
उडणाऱ्या या बोटीला ‘अॅक्रानोप्लान’ म्हणूनही ओळखले जाते. तिला ना बोट म्हणता येईल ना विमान. कारण- ही उडणारी बोट म्हणजे बोट आणि विमान यांच्या मिलाफातून तयार झालेले एक वेगळेच वाहन आहे. शीतयुद्धादरम्यान सोविएत युनियनने सर्वांत प्रसिद्ध WIG विमान विकसित केले होते. त्याला ‘कॅस्पियन सी मॉन्स्टर’ म्हणून ओळखले जाते. सोविएत डिझायनर रोस्टिस्लाव एव्हगेनिविच अलेक्सेयेव्ह यांनी डिझाइन केलेले हे विमान त्या काळातील जगातील सर्वांत मोठे व वजनदार विमान होते. ते विमान ९२ मीटर (३०२ फूट) लांब होते आणि त्याचे टेक-ऑफ वजन ५४४ टन होते.
ॲक्रानोप्लानचे वैशिष्ट्य काय?
ॲक्रानोप्लॅन समुद्रातील लाटांपासून केवळ एक ते पाच मीटर वर उडू शकते. अत्यंत कमी उंचीवरून उडणाऱ्या ॲक्रानोप्लानच्या पंखांखाली उच्च दाब तयार होतो आणि जमिनीवरील कमी अंतरामुळे त्याला गतिरोध कमी होतो. त्यामुळे त्याची वेग व इंधन कार्यक्षमता वाढते. कार्यक्षमता व वेगामुळे अॅक्रानोप्लान एक शक्तिशाली लष्करी वाहन ठरले आहे आणि शीतयुद्धाच्या वेळी नौदलात सोविएत युनियनला याची बरीच मदत झाल्याचे सांगण्यात येते. आजही अॅक्रानोप्लानचा सर्वांत मोठा फायदा म्हणजे ते जहाजांपेक्षा वेगवान आहे. इतर विमानांपेक्षा त्यांची इंधन कार्यक्षमता चांगली आहे आणि रडारपासून स्वतःचा बचाव करण्यास सक्षम आहे.
हेलिकॉप्टरच्या तुलनेत WIG कठीण हवामान आणि समुद्री परिस्थितीचा सामना करण्यास सक्षम असल्याचेदेखील मानले जाते. परंतु, या बोटीचे अनेक फायदे असूनही याचा वापर उड्डाणासाठी केला गेला नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याही देशाच्या नौदलाने याचा वापर केला नाही. याचे कारण सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजचे सध्याचे महासंचालक एअर मार्शल अनिल चोप्रा (निवृत्त) यांनी २०२२ च्या अहवालात स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, WIG किंवा अॅक्रानोप्लानला अनेक मर्यादा आहेत. त्यांनी नमूद केले की, WIG मध्ये वळण क्षमतेच्या बाबतीत मर्यादा आहेत. रडारपासून स्वतःला चकवण्यातही या स्वरूपाच्या बोटी नक्कीच फायदेशीर ठरतील; परंतु या बोटी समुद्राच्या शांत राहण्यावर अवलंबून आहेत आणि त्यामुळेच एखाद्या मोहिमेत त्याचा वापर करणे जोखमीचे आहे.
चीनचे ‘बोहाई सी मॉन्स्टर‘ इतरांपेक्षा वेगळे कसे?
रशिया, अमेरिका, जर्मनी, कॅनडा, जपान या सर्व देशांनी ॲक्रानोप्लानचे छोटे मॉडेल विकसित केले आहे, असा अंदाज केला जात आहे. परंतु, चीनचे विमान जेट पॉवरवर चालणारे असल्याचे मानले जाते. काही संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे की, चिनी WIG च्या बांधकाम गुणवत्तेमुळे ॲक्रानोप्लान हा गेल्या अनेक वर्षांतील सर्वांत महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असल्याचे मानले जात आहे. काही विश्लेषकांचे म्हणणे आहे की, चीन आपल्या ‘बोहाई सी मॉन्स्टर‘चा वापर दक्षिण चीन समुद्र आणि तैवान सामुद्रधुनीमध्ये करू शकतो. ‘साउथ चायना मॉर्निंग पोस्ट’ने प्रकाशित केलेल्या २०२३ च्या वृत्तात सांगण्यात आले आहे की, ॲक्रानोप्लान चार तासांत दक्षिण चीन समुद्रात पोहोचू शकते आणि त्या प्रदेशात व आसपासच्या ठिकाणी प्रवासी किंवा मालवाहतूक करू शकते.
तज्ज्ञांनी असेही नमूद केले आहे की, तैवान सामुद्रधुनीत संघर्ष झाल्यास ‘बोहाई सी मॉन्स्टर‘ हे लँडिंग ऑपरेशन्ससाठी परिपूर्ण असेल. त्याद्वारे सोविएत WIG शत्रूच्या किनाऱ्यांवर थेट सैन्य आणि चिलखती वाहने पोहोचवू शकले. चीनने WIG च्या विकासाबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिली नसली तरी, हा चीनच्या नावीन्यपूर्ण सागरी आणि द्विक्षेत्री वापरावयाच्या तंत्रज्ञानासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. त्यांच्याकडे AG600 आहे. हे जगातील सर्वांत मोठे द्विक्षेत्री उपयुक्त असे विमान आहे, ज्याचे जास्तीत जास्त टेक-ऑफ वजन ६० टन आणि त्याची पेलोड क्षमता १२ टन आहे.
अमेरिकेकडे ॲक्रानोप्लान आहेत का?
अमेरिका ॲक्रानोप्लानवर काम करीत आहे. अमेरिकेच्या संरक्षण विभागाची संशोधन शाखा डिफेन्स अॅडव्हान्स्ड रिसर्च प्रोजेक्ट्स एजन्सी (डार्पा) ‘लिबर्टी लिफ्टर’ नावाचे अॅक्रानोप्लान विकसित करण्यासाठी काम करीत असल्याची माहिती आहे. ‘एरोस्पेस अमेरिके’च्या मते, लिबर्टी लिफ्टर कार्यक्रम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे आणि २०२५ मध्ये त्याचा प्राथमिक आरेखनाचा आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती आहे.