Xinjiang Tibet Railway project: रेल्वेमार्ग केवळ लोकांसाठीच नाही, तर देशाच्या विकासासाठीही महत्त्वाचे आहेत. रेल्वेमार्गांच्या मदतीने देशातील विविध भाग एकमेकांना जोडले जातात. जगात अनेक किचकट आणि तुलनेने धोकादायक असे रेल्वेमार्गही आहेत. त्यापैकी एक रेल्वेमार्ग भारताचा शेजारी देश चीन तयार करत आहे. चीन सध्या अशा एका रेल्वेमार्गावर काम करणार आहे, जो जगभरात वेगळा ठरणार आहे. चीनला तिबेटशी जोडणारा हा मार्ग आहे. चीनमधल्या शिनझियांग शहराला तिबेटमधील शिगात्सेशी जोडणाऱ्या रेल्वेमार्गाच्या या कामाला चीन लवकरच सुरुवात करणार आहे. हा महत्त्वाचा मार्ग अक्साई चीनमधून आणि एलएसीजवळील जी-२१९ राष्ट्रीय महामार्गाजवळून जाणार असल्याची माहिती आहे. हा वादग्रस्त भाग याआधी भारत-चीन तणावाचे कारण ठरलेला आहे. आता या रेल्वे प्रकल्पामुळे भारताची चिंता पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. हा प्रकल्प अनेक वर्षांपासून नियोजित होता आणि हा चीनच्या सर्वांत मोठ्या रेल्वे प्रकल्पांपैकी एक मानला जातो.

चीनचा शिनझियांग-तिबेट रेल्वेमार्ग

चीनचा शिनझियांग-तिबेट रेल्वेमार्ग अक्साई चीनमधून आणि प्रत्यक्ष नियंत्रणरेषेजवळील जी-२१९ राष्ट्रीय महामार्गाच्या जवळून जाण्याची शक्यता आहे. साउथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, हा रेल्वेमार्ग शिनझियांगमधील होतान या शहराला तिबेटमधील शिगात्सेसोबत जोडेल आणि आधीपासून असलेल्या ल्हासा-शिगात्से मार्गाशी पुढे जोडला जाईल. त्यामुळे जवळपास दोन हजार किमी लांबीचा एक रणनीतिक मार्ग तयार होईल. तो चीनच्या वायव्य भागाला नैर्ऋत्य भागाशी जोडेल. रिपोर्टनुसार, पहिला टप्पा शिगात्से ते पाखुक्तसो असा असेल. हा मार्ग रुतोग आणि पांगॉन्ग तलावाच्या बाजूने जाईल. या प्रकल्पाचे उद्दिष्ट २०१५ पर्यंत ल्हासाला केंद्रस्थानी ठेवून पाच हजार किमी लांबीचे पठारी रेल्वे जाळे उभारण्याचे आहे. या मार्गाची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून ४,५०० मीटरपेक्षा जास्त असेल आणि तो कुनलुन, काराकोरम, कैलास व हिमालय पर्वतारांगांमधून जाईल. हिमनद्या आणि कायमस्वरूपी गोठलेली जमीन (पर्माफ्रॉस्ट) यामुळे या मार्गाचे बांधकाम आव्हानात्मक ठरणार आहे. हा मार्ग तिबेटच्या उंच आणि अवघड पर्वतीय प्रदेशांमधून जाईल. हे क्षेत्र मुसळधार बर्फवृष्टी, कमी ऑक्सिजन व अनियमित हवामान यांसारख्या मोठ्या आव्हानांनी वेढलेले आहे. त्यामुळे अभियंत्यांना अशा वातावरणात काम करताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. इतक्या उंचीवर रेल्वे ट्रॅक टाकणे आणि तो सुरक्षित ठेवणे हे एका मोठ्या तांत्रिक आव्हानापेक्षा कमी नाही.

बीजिंगचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प तिबेटला देशाच्या उर्वरित भागाशी जोडण्याच्या योजनेचा एक भाग आहे. चीनकडे आधीच तिबेटला जोडणारे तीन रेल्वेमार्ग आहेत. छिंगहाय-तिबेट मार्ग, ल्हासा-शिगात्से मार्ग व ल्हासा-निंगची मार्ग. ल्हासा-निंगची मार्ग हा तिबेटच्या आग्नेय भागात जातो आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ पोहोचतो. शिनझियांग-तिबेट मार्गाचे नियोजन २००८ मध्ये सुरू झाले. तेव्हा ते सुधारित Medium and long railway network चा भाग बनले. ही योजना चीनच्या राष्ट्रीय विकास आणि सुधार आयोगाने मंजूर केली आहे.

तिबेटच्या ल्हासाला चीनच्या मुख्य मार्गांशी, पूर्वेकडील युनान व चेंगदू, तसेच पश्चिमेकडील शिनझियांगशी जोडणाऱ्या जाळ्यात आता या नव्या मार्गाचा समावेश होणार आहे. मे २०२२ मध्ये होटन-शिगात्से विभागासाठी सर्वेक्षण आणि डिझाइनच्या निविदेची प्रक्रियादेखील सुरू करण्यात आली. एप्रिल २०२५ मध्ये चिनी परिवहन मंत्रालयाने सांगितले की, शिनझियांग-तिबेट रेल्वेमार्ग हा ४५ प्रमुख प्रकल्पांपैकी एक आहे. त्याचे बांधकाम याच वर्षी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

  • अक्साई चीनमधून जाणारा रेल्वेमार्ग
  • होतान आणि शिगात्से यांना जोडणारा रेल्वेमार्ग
  • आधीच्या ल्हासा-शिगात्से मार्गाशीही जोडला जाईल
  • पहिला टप्पा शिगात्से ते पाखुक्तसो असा आहे
  • २०३५ पर्यंत हा प्रकल्प उभारण्याचा चीनचा प्रयत्न आहे
  • समुद्रसपाटीपासून ४५०० मीटर उंचीवर आहे
  • बर्फाळ प्रदेश आणि उंचीच्या प्रदेशात रेल्वेमार्ग उभारणं आव्हानात्मक

‘शांघाय सिक्युरिटीज न्यूज’ने दिलेल्या माहितीप्रमाणे, चीनने होतान (शिनझियांग) आणि ल्हासा (तिबेट) यांना जोडणाऱ्या या रेल्वेमार्गाच्या बांधकाम आणि यंत्रणेवर देखरेख ठेवण्यासाठी एका सरकारी मालकीच्या कंपनीची स्थापना केली आहे. शिनझियांग-तिबेट रेल्वे कंपनीची नोंदणी ९५ अब्ज युआन इतक्या भांडवलासह करण्यात आली असून, ती पूर्णपणे चीन स्टेट रेल्वे ग्रुपच्या मालकीची आहे. या नव्या कंपनीच्या कामकाजात बांधकाम, रेल्वे वाहतूक उपकरणांचे उत्पादन, रिअल इस्टेट विकास आणि इतर यंत्रणांचा समावेश असणार आहे. तसेच ही कंपनी पर्यटन सुविधा विकसित करणार आहे, असे वृत्त ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिले आहे.

भारताला सावधानता का बाळगावी लागेल?

शिनझियांग-तिबेट रेल्वेमार्ग अक्साई चीनमधून जाण्याची शक्यता आहे आणि नेमके हेच भारतासाठी चिंता करण्याचे कारण आहे. या प्रदेशावर दोन्ही देशांकडून दावा केला जात आहे. त्याबाबत चीनचे म्हणणे आहे की, हा प्रदेश शिनझियांगचा भाग आहे; मात्र त्यांचा हा दावा चुकीचा आहे. चीनने १९५० च्या दशकात अक्साई चीन ताब्यात घेतला आणि १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान या भागावरील लष्करी पकड आणखी मजबूत केली. चीनचा हा प्रकल्प भारतीय सीमारेषेजवळून जाईल. त्यामुळे पीपल्स लिबरेशन आर्मीला सीमावर्ती भागात सैन्य आणि रसद पोहोचवण्यास आणखी मदत होईल. त्याव्यतिरिक्त चीनकडून या प्रकल्पाचा विचार बॉर्डर इन्फ्रास्ट्रक्चर स्ट्रॅटेजीचा भाग म्हणून केला जात आहे, जेणेकरून त्यांना भारतावरील दबाव वाढवता येईल.