केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यात गेल्या काही महिन्यांमध्ये करण्यात आलेल्या कारवाया या मोठा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. त्यामध्ये कॅबिनेटमधील काही मंत्र्यांवरील कारवाया किंवा त्यांच्या चौकश्यांचा देखील समावेश आहे. यात अनिल देशमुख, संजय राठोड, अनिल परब, नवाब मलिक अशा काही मंत्र्यांचा समावेश आहे. पण आता ईडीनं थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरापर्यंत धाव घेतली असून थेट उद्धव ठाकरेंचे मेहुणे अर्थात रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीनं आज मोठी कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित एकूण ११ सदनिकांवर ईडीनं टाच आणली आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? सविस्तर समजून घेऊया.

ईडीची मोठी कारवाई!

ईडीनं आज ठाण्यातल्या वर्तक नगर भागातल्या निलांबरी अपार्टमेंटमधल्या एकूण ११ सदनिकांवर जप्तीची कारवाई केली. यानंतर या सगळ्या प्रकरणाचे धागेदोरे समोर येऊ लागले. एकूण ६ कोटी ४५ लाख रुपये किंमतीच्या या सदनिका नेमक्या कुणाच्या मालकीच्या? कुणाच्या पैशांतून खरेदी केल्या? हा पैसा कुठून कसा वळवला गेला? याची माहिती समोर येऊ लागली, तसं हे प्रकरण थेट मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबीयांपर्यंत जाऊन पोहोचलं.

काय आहे प्रकरण?

या सगळ्या प्रकरणाला सुरुवात झाली ती २०१७मध्ये. ६ मार्च २०१७ रोजी ईडीनं पुष्पक ग्रुप ऑफ कंपनीज आणि पुष्पक बुलियनविरोधात आर्थिक गैरव्यवहाराचा गुन्हा दाखल केला होता. कंपनीचे मालक महेश पटेल, चंद्रकांत पटेल आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या एकूण २१ कोटी ४६ लाख रुपये किमतीच्या स्थावर आणि अस्थायी मालमत्तेवर ईडीनं २०१७मध्येच प्रोव्हिजनल स्वरूपात जप्ती आणली होती.

मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्यावर ईडीची मोठी कारवाई, ठाण्यातल्या ‘निलांबरी’ अपार्टमेंटमधील ११ सदनिका जप्त!

पुष्पकचे धागेदोरे श्रीधर पाटणकरांपर्यंत..

दरम्यान, याच प्रकरणाच्या तपासादरम्यान ईडीला अनेक धागेदोरे असे हाती मिळाले, जे श्रीधर पाटणकरांपर्यंत अर्थात रश्मी ठाकरे यांच्या बंधूंपर्यंत जातात. ईडीनं दिलेल्या माहितीनुसार, महेश पटेल आणि पुष्पक ग्रुपनं नंदकिशोर चतुर्वेदी नावाच्या एका व्यक्तीच्या माध्यमातून आणि त्याच्या बनावट कंपन्यांकरवी २०.०२ कोटींची रक्कम हस्तांतरीत केली. हमसफर डीलर्स प्रायव्हेट लिमिटेड ही त्यातलीच एक बनावट कंपनी. या कंपनीकडून विनातारण कर्जरुपाने ३० कोटींची रक्कम श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडकडे हस्तांतरीत करण्यात आली.

साईबाबा प्रा. लि. कंपनी श्रीधर पाटणकरांची!

दरम्यान, ३० कोटींची रक्कम हस्तांतरीत करण्यात आलेली साईबाबा प्रा. लि. कंपनी ही रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांच्या मालकीची असल्याचं समोर आलं. याच कंपनीकडून ठाण्याच्या वर्तकनगर भागामध्ये निलांबरी अपार्टमेंटचं बांधकाम करण्यात आलं आहे. त्यामुळे महेश पटेल यांचा पैसा नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून श्रीधर पाटणकरांच्या साईबाबा प्रा. लि.करवी ‘निलांबरी’ या रीअल इस्टेट प्रकल्पामध्ये लावण्यात आल्याचं ईडीकडून सांगण्यात आलं आहे.

“झोपेतून जागे व्हा”; रश्मी ठाकरेंच्या भावावरील कारवाईवर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया, भाजपावर साधला निशाणा!

निलांबरी अपार्टमेंट आणि ११ सदनिका!

दरम्यान, निलांबरी अपार्टमेंटमधील साईबाबा प्रा. लि.च्या ताब्यात असणाऱ्या एकूण ११ सदनिका आज ईडीनं जप्त केल्या आहेत. या सदनिकांची एकूण किंमत ६ कोटी ४५ लाखांच्या घरात जाते.

चंद्रकांत पटेल यांना २२ सप्टेंबर २०१७ला अटक केली होती. तेव्हा २१ कोटी ४६ लाखांच्या ६ व्यावसायिक जागा आणि ३ निवासी सदनिका देखील जप्त करण्यात आल्या होत्या.

“…म्हणून हा कार्यक्रम हातामध्ये घेतला आहे”; मुख्यमंत्र्यांच्या मेव्हण्यावरील कारवाईनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

श्रीधर पाटणकरांचीही चौकशी होणार?

दरम्यान, या सदनिका थेट श्रीधर पाटणकरांच्याच कंपनीच्या ताब्यात असल्यामुळे या प्रकरणात त्यांची देखील ईडीकडून चौकशी होण्याची शक्यता आहे. या चौकशीमध्ये काळा पैसा कुठून कसा आला आणि तो कसा गुंतवला, याविषयी श्रीधर पाटणकरांकडे विचारणा होण्याची शक्यता आहे.