scorecardresearch

विश्लेषण: नारळ काढण्यासाठी प्रशिक्षणाची गरज? कोकणातील दुर्लक्षित कल्पवृक्षाबाबत ही समस्या का उद्भवते?

रत्नागिरीजवळ भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातर्फे २०१२ पासून ५ दिवसांचे खास प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहेत

विश्लेषण: नारळ काढण्यासाठी प्रशिक्षणाची गरज? कोकणातील दुर्लक्षित कल्पवृक्षाबाबत ही समस्या का उद्भवते?
नारळाच्या झाडाची देखभाल आणि नारळ काढण्यासाठी काही यांत्रिक सामग्री उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य- पीटीआय)

-सतीश कामत  

कोकणात फळपिकांमध्ये आंबा आणि काजूखालोखाल नारळाचा क्रमांक लागतो. अर्थात या दोन पिकांच्या तुलनेत नारळाचे क्षेत्र अतिशय कमी म्हणजे, पाच-सहा हजार हेक्टर आहे. त्यातही रत्नागिरी जिल्ह्याच्या नऊ तालुक्यांपैकी राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या तालुक्यांमध्ये नारळाची जास्त प्रमाणात लागवड झालेली आहे. कारण किनारपट्टीवर किंवा खाडीपट्ट्यामध्ये नारळाचे उत्पन्न चांगले येते. पण यापैकी बहुतांश ठिकाणी ही लागवड व्यापारी पद्धतीने झालेली नाही. अनेक ठिकाणी घराच्या परसदारांमध्ये किंवा घरासमोरच्या मोकळ्या जागेत फार तर आठ-दहा नारळाची झाड लावलेली दिसतात आणि त्याचा मुख्य उद्देश घरगुती वापरासाठी केव्हाही नारळ उपलब्ध व्हावेत, हा असतो. त्यापेक्षा जास्त उत्पादन झाले तर ते नारळ गावामध्ये किंवा जवळच्या बाजारपेठेत स्थानिक व्यापाऱ्यांना विकत दिले जातात. पण त्याहून जास्त प्रमाणामध्ये, व्यापारी तत्त्वावर लागवड करून जिल्ह्याबाहेर अन्यत्र किंवा अन्य राज्यांमध्ये पाठवण्याइतके उत्पादनच येथे होत नाही. पूर्वी गावात मोलमजुरी करणाऱ्या बहुतेकजणांच्या अंगी हे नारळ काढण्याचे कसब होते. त्यामुळे शेतातील अन्य कामांबरोबर हे काम केले जात असे. पण आता अशा छोट्या पातळीवरील कामासाठी वेळ देणारी माणसं मिळणे दुरापास्त झाले आहे. त्यामुळे या कामासाठी खास प्रशिक्षण देऊन मनुष्यबळ निर्माण करणे गरजेचे झाले आहे.

कुशल मनुष्यबळाची वानवा का?

नारळाच्या पारंपरिक जातींव्यतिरिक्त गेल्या काही वर्षांत ‘सिंगापुरी ड्वार्फ’सारख्या कमी उंचीच्या काही जाती शोधून काढण्यात आल्या आहेत. त्यामध्ये झाडावर चढण्याचा त्रास कमी असतो. झाडांची उंची कमी असल्याने त्यावर चढून नारळ काढणे त्या मानाने सोपे जाते. पण बाणवलीसारखी  पारंपरिक जातीची झाडे सुमारे ३०-४० फूट उंच वाढतात आणि अशा झाडांवर चढून नारळ काढणे खरोखरच मोठे जिकिरीचे असते. अर्थात कमी उंचीच्या झाडांवर चढून नारळ काढण्यासाठीही कष्ट आणि कौशल्य या दोन्हीची गरज असते. पण कोकणातील कसबी लोक रोजगाराच्या शोधात मुंबईसारख्या महानगरात मोठ्या प्रमाणात स्थलांतरित झाले आहेत. त्याहीमुळे येथे या कामासाठी असे कुशल गडी मिळणे अतिशय अवघड झाले आहे.

यांत्रिक सामग्री कितपत उपयुक्त?

नारळाच्या झाडाची देखभाल आणि नारळ काढण्यासाठी काही यांत्रिक सामग्री उपलब्ध आहे. पण झाडे कमी असतील तर ती परवडत नाही. यासंदर्भात रत्नागिरी तालुक्यातील मावळंगे येथील नेहा पालेकर या तरुणीची कामगिरी नोंद घेण्यासारखी आहे. याबाबत जास्त शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी ती केरळला गेली आणि तेथील नारळ संशोधन केंद्रामध्ये सहा दिवसांचे प्रशिक्षण घेतले. नारळाच्या झाडावर चढणे, त्याची साफसफाई करणे, त्यावर पडणाऱ्या रोगांची आणि उपाययोजनांची माहिती या प्रशिक्षणात मिळाली. यातून तिने आर्थिक उत्पन्नाचा नवा पर्याय आत्मसात केला. पण केवळ हे काम करून उदरनिर्वाह होण्याइतकी लागवड कोकणात नाही, हाही या समस्येचा एक वेगळा पैलू आहे.

इतर फळपिकांची स्थिती काय आहे?

अर्थात ही समस्या केवळ नारळापुरती मर्यादित नाही. कोकणातले पारंपारिक नगदी पीक मानल्या जाणाऱ्या आंब्याच्या बागांमध्येही हीच परिस्थिती गेल्या काही वर्षांपासून निर्माण झालेली दिसते. या बागांमध्ये साफसफाई किंवा औषधांच्या फवारण्यांपासून आंबे उतरवण्यापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर स्थानिक कुशल, अर्धकुशल माणसं मिळणे अतिशय दुरापास्त झाले आहे. त्यामुळे येथे हंगामाच्या काळात परजिल्ह्यातून किंवा परराज्यातून कंत्राटी पद्धतीने कामगार आणण्याचा पर्याय मोठ्या आंबा बागायतदारांनी स्वीकारला आहे. शिवाय, आंब्याच्या कलमांवर चढणे आणि झेल्यांच्या मदतीने आंबे उतरवणे हे त्या मानाने खूप सोपे असते. काजूच्या झाडावर चढण्यासाठी गडी उपलब्ध नसेल तर ते पिकल्यावर खाली पडले की वेचून गोळा करणेही शक्य असते. शिवाय, बोंडाची गरज नसेल तर जमिनीवर उभे राहून काठीने झोडपूनही बऱ्याच प्रमाणात काढता येतात. पण नारळ उतरवण्यासाठी थेट त्या फळापर्यंत पोहोचावे लागते आणि ते जास्त कष्टाचे व कौशल्याचे आहे. 

प्रशिक्षित मनुष्यबळामुळे काय साधेल?

नारळ काढण्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची उणीव लक्षात घेऊन रत्नागिरीजवळ भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातर्फे २०१२ पासून ५ दिवसांचे खास प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहेत. या वर्गात कमाल २० जणांना प्रवेश दिला जातो. पहिल्या वर्षी यामध्ये एकाही महिलेचा सहभाग नव्हता. पण २०१४पासून प्रत्येक वर्गात ३ ते ५ महिला प्रशिक्षण घेत आल्या आहेत. हे वर्ग तत्कालीन अपरिहार्य कारणांमुळे काही वर्षी होऊ शकले नाहीत. तरीसुद्धा आत्तापर्यंत एकूण १२० जणांनी हे प्रशिक्षण घेतले असून त्यामध्ये २३ महिलांचाही समावेश आहे. राष्ट्रीय नारळ विकास मंडळातर्फे पुरस्कृत हे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना नारळाच्या झाडावर चढण्यासाठी शिडी व इतर साहित्य मोफत दिले जाते. अशाच स्वरूपाचा एक प्रशिक्षण वर्ग पुढील महिन्यात आयोजित करण्यात आला आहे.

अर्थार्जन कितपत शक्य?

या वर्गात प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सर्वचजण नारळ काढण्याचा व्यवसाय करत नसले तरी बहुसंख्य प्रशिक्षणार्थी पूरक अर्थार्जनासाठी याचा उपयोग करतात, असे दिसून आले आहे. एका झाडावरील नारळ काढण्यासाठी १०० रुपये, या दराने दिवसाला हजार-बाराशे रुपये सहज कमावता येतात, असे हा पूरक व्यवसाय करणाऱ्या नेहा पालेकर हिने नमूद केले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-11-2022 at 10:03 IST

संबंधित बातम्या