बोस्टनमधल्या प्रसिद्ध रॉक बँड कोल्डप्ले कॉन्सर्टमध्ये समोर आलेल्या सेलिब्रेटी दांपत्यापैकी एचआर अधिकारी बोस्टन ब्राह्मण असल्याचं स्पष्ट झालं आहे. एन्स्ट्रोनॉमर कंपनीचे सीईओ अँडी बायरन आणि त्यांच्या कंपनीच्या एचआर हेड क्रिस्टिन कॅबोट यांचं अफेअर कोल्डप्ले कॉन्सर्टमुळे उघडकीस आलं होतं. कॉन्सर्टदरम्यान दोघं एकमेकांना मिठी मारून आनंदाने नाचताना दिसत होते. लाईव्ह कॅमेरा आणि स्पॉटलाईटचा फोकस पडल्यानंतर दोघांना एकदम ओशाळं वाटलं आणि त्यांनी लपायचा प्रयत्न केला.
कोल्डप्लेचा गायक ख्रिस मार्टिनने कॉन्सर्टदरम्यान किस कॅमचा वापर केला. याच किस कॅमच्या मदतीने कॅमेऱ्यानं एका जोडप्याला स्पॉट केलं आणि एका मोठ्या पडद्यावर त्यांचा रोमँटिक परफॉर्मन्स दाखवण्यात आला. यावेळी दोघेही अगदी कोझी वातावरणात परफॉर्मन्सचा आनंद घेत होते. पण, स्पॉटलाइट आणि किस कॅमचा फोकस त्यांच्यावर रोखला गेला आहे हे जेव्हा दोघांनी पाहिलं तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. दोघेही लगेच चेहरा लपवण्याचा प्रयत्न करू लागले. हा प्रकार काही तासात जगभर पोहोचला. दोघांनाही प्रचंड टीकेला, ट्रोलिंगला सामोरं जावं लागलं. जोडप्यापैकी कॅबॉट या एचआरच्या अधिकाऱ्यांचं कनेक्शन समोर आलं आहे.
क्रिस्तिन यांचं अँड्यू कबॉट यांच्याशी लग्न झालं आहे. अँड्यू हे प्रायव्हेटिअर रम या प्रसिद्ध मद्यनिर्मिती कंपनीचे मालक आहेत. या जोडप्याला दोन मुलं आहेत. बोस्टन ब्राह्मण या अतिशय वलयांकित प्रस्थ असलेल्या घराण्याचे अँड्यू हे वंशज आहेत. दोन शतकांपेक्षाही जास्त काळ यांचा दबदबा आहे.
बोस्टन ब्राह्मण कोण आहेत?
बोस्टन ब्राह्मण हे प्रदीर्घ इतिहास असलेल्या अमेरिकेतलं तालेवार उमराव घराणं आहे. १६००व्या शतकात अमेरिकेत म्हणजे तेव्हाच्या नव्या इंग्लंडमध्ये येऊन स्थायिक होणाऱ्या धार्मिक सुधारकांचा गट आहे.
१८६०मध्ये लेखक आणि फिजिशिअन ऑलिव्हर वेंडेल होम यांनी ही संकल्पना पहिल्यांदा योजिली. बोस्टनमधल्या या बुद्धिजीवी वर्गाची तुलना त्यांनी भारतातल्या ब्राह्मण समाजाशी केली. परंपरागत गौरवशाली असा मिळालेला वारसा, बुद्धिजीवी स्वभाव आणि योग्य काय अयोग्य काय याचं भान राखत केलेलं वर्तन ही ब्राह्मण समाजाची व्यवच्छेदक लक्षणं होती. तेव्हापासून बोस्टन ब्राह्मण ही संकल्पना लोकप्रिय झाली आणि रुजलीदेखील.
कॅबॉट, लोव्हेल्स, अॅडम्स, पीबॉडी, एलियट्स, विनथॉर्प या मंडळींनी अमेरिकेच्या राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांचा पाया रचण्यात मोलाची भूमिका बजावली. हॉरवर्ड विद्यापीठ असो किंवा समुद्री व्यापार सांभाळणाऱ्या मोठमोठ्या कंपन्या यांच्या स्थापनेत आणि वाटचालीत या घराण्यांचा सिंहाचा वाटा आहे. अमेरिकेसाठी पहिले कायदे तयार करण्यातही या घराण्यांची भूमिका अग्रणी मानली जाते.
गुलामगिरीची जुलमी प्रथा नष्ट व्हावी आणि त्यामुळे खितपत पडलेल्या लोकांचं आयुष्य सुकर व्हावं यासाठी बोस्टन ब्राह्मण मंडळींनी पुढाकार घेतला. अमेरिकेत उभी राहिलेली संग्रहालयं आणि प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधांमध्ये या मंडळींची भूमिका निर्णायक राहिली आहे.
अवाढव्य अशा या उद्योग घराण्यातून या अँग्लो अमेरिकन मंडळींनी प्रचंड पैसा कमावला. खनिज तेल, टायरच्या निर्मितीत महत्त्वाचा घटक असलेल्या कार्बनचं उत्पादन यामध्येही त्यांचा वाटा मोठा होता. केवळ पैसा ही त्यांची ओळख नव्हती तर सांस्कृतिक अधिष्ठान ही त्यांची ताकद होती. प्रसिद्धीपासून दूर राहत आपल्याच समाजात लग्न करण्यावर त्यांचा भर असे.
कालौघात बोस्टन ब्राह्मणांची अमेरिकेवरची पकड सैल झाली असली तरी कबॉट या नावाचा दबदबा बोस्टनमध्ये आजही कायम आहे. कबॉट यांची एकत्रित संपत्ती १५ बिलिअन अमेरिकन डॉलर्स एवढी असल्याचं मानलं जातं. मात्र या प्रवासात काही वादही या घराण्याशी जोडले गेले आहेत. इमिग्रेशन रिस्ट्रिक्शन लीग अर्थात स्थलांतराच्या विरोधात काम करणाऱ्या संघटनेला त्यांनी पाठिंबा दिला होता. दक्षिण आणि पूर्व युरोपातून येणाऱ्या स्थलांतरितांचे लोंढे रोखले जावेत अशी त्यांची भूमिका होती. आयर्लंड, इटली आणि ज्यू स्थलांतरित जसे बोस्टनमध्ये दाखल होऊन इथल्या संस्कृतीची भाग झाले तसं बोस्टन ब्राह्मणांचं महत्त्व कमी होऊ लागलं.
कॉन्सर्टदरम्यान चुंबन घेतानाचा क्षण जगभर व्हायरल झाल्यानंतर लग्न झालेल्या पण अफेअर असणाऱ्या लोकांचं आयुष्य चर्चेत आलं. याबरोबरीने अमेरिकेतल्या धनाढ्य घराण्यातील मंडळींचं वर्तन ऐरणीवर आलं आहे. ताकदवान आणि प्रभावशाली स्वयंभू घराण्यांमध्ये नेमकं काय चालतं याची चर्चा सुरू झाली आहे.