Attack in Colorado, America: झायोनिस्टांचा अंत करा. ते खुनी आहेत, असे म्हणत एका व्यक्तीने कोलोराडोच्या शांततापूर्ण निदर्शनांमध्ये गोंधळ निर्माण केला. अमेरिकेतल्या कोलोराडो या ठिकाणी यहुदी समुदायाच्या एका कार्यक्रमादरम्यान मोठा हल्ला करण्यात आला. या संशयिताने गाझामध्ये बंदिस्त असलेल्या इस्रायली ओलिसांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी जमलेल्या जमावावर मोलोटोव्ह कॉकटेल फेकत हल्ला केला. स्थानिकांचे म्हणणे आहे की, संशयितानं आंदोलकांना पेटवण्याचा प्रयत्न केला. या घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. तसेच संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.
पण नेमके काय घडले? या दुर्घटनेमागे कोण आहे? त्याचे हेतू काय होते? आतापर्यंत अधिकाऱ्यांनी कशी प्रतिक्रिया दिली आहे? ते जाणून घेऊ…
नेमके काय घडले?
रविवारी दुपारी १.२६ च्या सुमारास इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू असताना गाझामध्ये बंदिस्त असलेल्या ओलिसांकडे लक्ष वळवण्यासाठी ‘रन फॉर देअर लाइव्हज’ नावाचा एक स्वयंसेवक गट बोल्डरच्या डाउनटाउनमधील पर्ल स्ट्रीट पेडेस्ट्रियन मॉलमध्ये जमला होता. अँटी-डेफॅमेशन लीग आणि एक ज्यू कार्यकर्त्यांचा गट यांनी एक्सवर पोस्ट करीत सांगितले, “लोकांचा हा गट ७ ऑक्टोबर रोजी हमासने केलेल्या हल्ल्यात पकडलेल्या ओलिसांच्या समर्थनार्थ हा गट तेथे जमला होता.” “हा हल्ला नियमितपणे होणाऱ्या नियोजित साप्ताहिक शांततापूर्ण कार्यक्रमात करण्यात आला” , असे एफबीआय एजंट मार्क मिचालेक यांनी पत्रकारांना सांगितले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहराच्या डाउनटाउन भागातून अनेक आपत्कालीन कॉल आल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. “सुरुवातीला फोन करणाऱ्यांनी असे सांगितले की, एक माणूस शस्त्रधारी होता आणि तो लोकांना अक्षरश: पेटवत होता”, असे बोल्डरचे पोलीस प्रमुख स्टीफन रेडफर्न यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. “घटनास्थळी पोहोचलो तेव्हा अनेक जण जखमी अवस्थेत आढळले. अनेक जण जखमी अवस्थेत आढळले. त्यामध्ये अनेकांच्या शरीरावर भाजल्याच्या आणि इतरही जखमा होत्या”, अशी माहितीही त्यांनी दिली.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, “एका व्यक्तीने त्या गटाजवळ येऊन लोकांवर मोलोटोव्ह कॉकटेल फेकले.” सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, साक्षीदारांनी तपासकर्त्यांना सांगितले की, हल्ल्यादरम्यान संशयिताने “झायोनिस्टचा अंत करा, पॅलेस्टाईन मुक्त करा”, असे म्हटले होते. दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शी मुलीने सांगितले की, हल्ला झाल्यावर काही लोक ९११ ला फोन करा, असे ओरडत होते. दोन महिलांचे पाय भाजले होते. त्यापैकी एका महिलेने वेदना सहन न झाल्याने ओरडत आग विझवण्यासाठी ध्वजसदृश कापडाचा वापर केला होता.
सोशल मीडियावर या भयावहतेचे चित्रण करणारे व्हिडीओ झपाट्याने व्हायरल होऊ लागले. त्यात एक शर्टलेस माणूस हातात पारदर्शक बाटल्या धरून चालत असल्याचे दिसत आहे. तो त्याच्या समोरील गवत जळत असताना चालत आहे. तो जमिनीवर पडलेल्या एका व्यक्तीकडे “झायोनिस्टांचा अंत करा!” आणि “ते खुनी आहेत!” असे ओरडताना दिसत आहे.
बोल्डरमधील घटनेत सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, हे जखमी ६७-८८ वयोगटातील आहेत. बोल्डर पोलीस प्रमुख स्टीफन रेडफर्न यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, एक जण गंभीर जखमी झाला आहे आणि त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
कोलोराडो हल्ल्यातील संशयित नेमका कोण?
या हल्ल्यातील संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे आणि अधिकाऱ्यांनी त्याचे नाव मोहम्मद साबरी सोलिमन, असे असल्याचे सांगितले आहे. त्याला गुन्ह्याच्या ठिकाणाहून अटक करण्यात आली आणि किरकोळ जखमी अवस्थेत स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. अधिकृतपणे कोणतेही आरोप जाहीर करण्यात आले नसले तरी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, हा संशयित या हल्ल्याला जबाबदार आहे.
“४५ वर्षीय सोलिमन हा एखाद्या मोठ्या गटाचा किंवा नेटवर्कचा भाग आहे आणि त्यानं या घटनेत एकट्यानं काम केलं आहे”, असे एफबीआय डेन्व्हरचे विशेष एजंट-इन्चार्ज मार्क मिचालेक यांनी माध्यमांना सांगितले.
सीएनएनच्या एका वृत्तात म्हटले आहे की, २००५ मध्ये सोलिमनला अमेरिकेत प्रवेश करण्यासाठी व्हिसा नाकारण्यात आला होता. संशयिताने कधी आणि कसा अमेरिकेत प्रवेश केला हे स्पष्ट झालेले नाही.
सोलिमन हा इजिप्शियन नागरिक आहे. त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरूनही कोणत्याही विशिष्ट विचारसरणीचा कोणताही संकेत मिळालेला नाही.
व्हाईट हाऊसचे डेप्युटी चीफ ऑफ स्टाफ स्टीफन मिलर म्हणाले की, हल्ल्यातील संशयितानं पर्यटक व्हिसाची बेकायदा मुदतवाढ करून घेतली होती. त्याला बायडेन प्रशासनानं पर्यटन व्हिसा दिला होता आणि नंतर तो बेकायदा व्हिसाची मुदतवाढही त्यानं मिळवली होती”.
एफबीआयचे म्हणणे काय?
एफबीआय प्रमुख काश पटेल यांनी त्या घटनेला दहशतवादी हल्ला, असे म्हटले आहे आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना याबद्दल माहिती देण्यात आली आहे, असे स्पष्ट केले.
हल्ल्याबाबत प्रतिक्रिया
दरम्यान, कोलोराडोचे गव्हर्नर जेरेड पोलीस यांनी बोल्डरमधील या हल्ल्याचा निषेध केला. “जागतिक राजकारण किंवा इस्रायली-पॅलेस्टिनी संघर्ष याबद्दल कोणाचंही मत काहीही असलं तरी या प्रकारची दहशतवादाची कृती, हिंसाचाराची कृती पूर्णपणे अस्वीकार्य आहे. आम्ही त्याचा निषेध करतो. मला माहीत आहे की, संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर कायद्यानं योग्य तो खटला चालवला जाईल”, असे गव्हर्नर पोलीस यांनी म्हटले आहे. त्यांनी पुढे म्हटले की, हा हल्ला अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला होता.
अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी एक्सवर पोस्ट केली आहे, “आम्ही पीडितांसाठी प्रार्थना करू. आपल्या महान देशात दहशतवादाला स्थान नाही.” इस्रायली अधिकाऱ्यांनीही या घटनेवर चिंता व्यक्त केली. संयुक्त राष्ट्रांमधील इस्रायलचे राजदूत डॅनन यांनी एक्सवर पोस्ट करीत सांगितले, “बोल्डर हल्ला हा दहशतवाद होता. यहुदी निदर्शकांवर क्रूरपणे हल्ला करण्यात आला. यहुदींविरुद्धचा दहशतवाद गाझा सीमेवर थांबत नाही, तो आधीच अमेरिकेचे रस्ते जाळत आहे.”
इस्रायलचे परराष्ट्रमंत्री गिदोन सा’अर यांनीही या हल्ल्याचा निषेध केला. “कोलोराडोच्या बोल्डरमध्ये यहुदींना लक्ष्य करून झालेल्या भयंकर यहुदीविरोधी दहशतवादी हल्ल्याने धक्का बसला आहे. मी अमेरिकेतील आमच्या राजदूत व लॉस एंजेलिसमधील आमच्या कॉन्सुल जनरलशी बोललो आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्यांसाठी मी प्रार्थना करतो”, असे ते म्हणाले.
महत्त्वाची बाब म्हणजे गाझामधील सुरू असलेल्या युद्धाशी संबंधित असल्याचा संशय असलेला हा अमेरिकेतील दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीतला दुसरा हाय-प्रोफाइल हल्ला आहे. २१ मे रोजी वॉशिंग्टन डीसीच्या डाउनटाउनमधील कॅपिटल ज्यू म्युझियममध्ये नेटवर्किंग कार्यक्रमासाठी जमलेल्या लोकांवर एका व्यक्तीने गोळीबार केला. इस्रायली दूतावासात काम करणाऱ्या एका तरुण जोडप्याची इलियास रॉड्रिग्ज नावाच्या व्यक्तीने गोळ्या घालून हत्या केली. त्यावेळीही त्याने ‘मुक्त, मुक्त पॅलेस्टाइन’ अशा घोषणा दिल्या होत्या.