मागील काही दिवसांपासून चीनमध्ये करोना संसर्ग वाढला आहे. येथील वाढती रुग्णसंख्या संपूर्ण जगासाठी चिंताजनक बाब असल्याचे म्हटले जात आहे. असे असतानाच चीन सरकारने करोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूंची मोजणी करण्यासाठी काही निकष बदलले आहेत. परिणामी चीनकडून करोनाग्रस्त, करोना संसर्गामुळे मृतांची संख्या याबाबत दिल्या जाणाऱ्या आकडेवारीवर संशय व्यक्त केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर चीनकडून करोना संसर्गासंदर्भात दिली जाणारी आकडेवारी किती खरी आणि किती खोटी हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> विश्लेषण: मंदीच्या काळात तुमचंही आर्थिक गणित बिघडू शकतं; अशा संकटाचा सामना करण्यासाठी कशी कराल तयारी?

निकषांत नेमका काय बदल?

चीनमध्ये सध्या करोनाची नवी लाट आली आहे. एकीकडे करोनाचा संसर्ग वाढत असताना दुसरीकडे चीनने करोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या मोजण्यासाठी जे निकष आहेत, त्यात बदल केला आहे. चीनमधील प्रमुख वैद्यकीय तज्ज्ञाच्या मते करोनाचा संसर्ग झाल्यानंतर ज्या रुग्णांचा न्यूमोनिया आणि श्वसनसंस्था बंद पडल्यामुळे मृत्यू झाला, त्यांचाच मृत्यू करोना संसर्गामुळे झाला, असे गृहित धरण्यात येणार आहे. पेकिंग युनिव्हर्सिटी फर्स्ट हॉस्पिटलमधील संसर्गजन्य रोग विभागाचे प्रमुख वांग गुइक्वियांग यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे करोनाच्या संसर्गामुळे एखाद्या रुग्णांच्या शरीरात इतर ठिकाणी त्रास वाढला तसेच प्रकृती खालावल्यामुळे मृत्यू झाला तर त्या रुग्णाचा मृत्यू करोना संसर्गामुळे झाला, असे गृहित धरण्यात येणार नाही. दरम्यान, चीनमधील या नव्या निकषांमुळे जागतिक पातळीवर इतर लोकांना करोना विषाणूपासून कसा बचाव करावा, हे समजणे कठीण होणार आहे, असा दावा परदेशी आरोग्य तज्ज्ञांकडून केला जात आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण: गर्भाशय मुखाचा कर्करोग किती गंभीर? लस किती परिणामकारक?

चीनने निकषांत बदल का केला?

चीमधील रुग्णालयांच्या नियमांची माहिती असलेल्या तज्ज्ञांनी रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय माध्यम संस्थेला या बदललेल्या निकषांबद्दल अधिक माहिती दिली आहे. यापूर्वी चीनमध्ये असे निकष नव्हते. मात्र करोनाची चाचणी नकारात्मक आल्यानंतर एक किंवा दोन दिवसांनंतर रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याचा करोनामुळे मृत्यू झाला नाही असे गृहित धरले जात होते. तर सध्याच्या ओमिक्रॉन प्रकारामुळे जीवणेघी लक्षणे दिसत नाहीत. याच कारणामुळे सध्या निकषांत बदल केलेला आहे, असे वांग गुइक्वियांग यांनी सांगितले.

हेही वाचा >>> विश्लेषण: आजपासून भारतात उपलब्ध होणार iNCOVACC नेजल व्हॅक्सिन; जाणून घ्या कोणाला घेता येणार ही लस, कुठे करावी नोंदणी

बदललेल्या निकषांमुळे काय होणार?

करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोजण्यासाठी जगभरात वेगवेगळे निकष आहेत. मागील तीन वर्षांत या निकषांत बदल होत आले आहेत. मात्र चीनच्या या विशिष्ट दृष्टीकोनाचा जागतिक पातळीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. चीनच्या सध्याच्या निकषामुळे करोना संसर्गाचे इतर जीवघेणे आणि महत्त्वाचे निकष गृहित धरले जाणार नाहीत. रक्तामध्ये गाठी होणे, हृदयविकाराचा झटका, सेपसिस, मूत्रपिंड निकामी होणे आदी लक्षणं गृहित धरली जाणार नाहीत. यातील काही लक्षणांमुळे रुग्णांचा घरी मृत्यू होऊ शकतो. या लक्षणांबद्दल कल्पना नसलेल्यांचाही यामध्ये मृत्यू होऊ शकतो. न्यूयॉर्कमधील माऊंट सिनाई साऊथ नासाऊ हॉस्पिटलमधील डॉ. अरॉन ग्लॅट यांनी चीनच्या बदललेल्या निकषांवर प्रतिक्रिया दिली आहे. चीनने करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या मोजण्यासाठी बदललेल्या निकषांमुळे सर्व मृतांची मोजणी होणार नाही. शरीरातील काही लक्षणांकडे दुर्लक्ष करणे हेच मुळात चुकीचे आहे, असे अरॉन ग्लॅट म्हणाले आहेत.

हेही वाचा >>> विश्लेषण: ‘बिकिनी किलर’ चार्ल्स शोभराजची सुटका का झाली? फ्रान्सचा नागरिक असलेल्या शोभराजचा भारताशी संबंध काय?

चीनकडून दिल्या जाणाऱ्या आकडेवारीवप विश्वास ठेवावा का?

चीनकडून करोना रुग्णांची तसेच करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या लपवण्यात येते, असा आरोप जगभरातून केला जातो. राजकीय हेतू ठेवून चीनकडून तसे केले जात असल्याचा आरोप होत आला आहे. २०१९ च्या शेवटी चीनमध्ये वुहान येथे करोना संसर्गाचा उद्रेक झाला. या सुरुवातीच्या उद्रेकात साधारण ३६ हजार लोकांचा मृत्यू झाला असे जून २०२० मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासात सांगण्यात आले. चीनने अधिकृतपणे जाहीर केलेल्या आकडेवारीच्या तुलनेत ही संख्या १० पटीने जास्त आहे. २०२२ मधील एप्रिल महिन्यात लॅन्सेटने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. लॅन्सेटने २०२०-२१ साली एकूण ७४ देशातील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णसंख्येचा अभ्यास केला होता. लॅन्सेटने प्रसिद्ध केलेल्या या अहवालात २०२०-२१ साली चीनमध्ये मृत्यू झालेल्यांची संख्या १७९०० ने जास्त होती. त्यामुळे चीनकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या आकडेवारी जगभरात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona outbreak in china is corona death toll published by china is accurate prd
First published on: 24-12-2022 at 21:27 IST