Air India plane crash: अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडिया विमानाच्या अपघातात जवळपास २७४ जणांचा बळी गेला. त्यानंतर हा अपघात नेमका कसा घडला, विमानात बिघाड होता की कंपनीने काही माहिती लपवली अशा सर्व बाजूंनी या अपघाताबाबत चौकशी सध्या सुरू आहे. एअर इंडियाचे मालकी हक्क सध्या टाटा समूहाकडे आहेत. तसंच सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियाचे कमर्शिअल आणि मेंटेनन्स पार्टनर आहेत. यावरून माजी नागरी उड्डाण मंत्री प्रफुल्ल पटेल यांनी सिंगापूर एअरलाइन्सबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. १२ जूनला झालेल्या या अपघाताबाबत सिंगापूर एअरलाइन्सचे मौन का आहे असा प्रश्न पटेल यांनी विचारला आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याबाबत प्रश्न विचारले असता एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी सिंगापूर एअरलाइन्सची पाठराखण केली आहे.
टाटा समूह आणि एअर इंडियाचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी टाइम्स नाऊला दिलेल्या एका विशेष मुलाखतीत सिंगापूर एअरलाइन्स आणि एअर इंडिया विमानाच्या अपघातानंतर झालेल्या टीकेवर भाष्य केले आहे. “सिंगापूर एअरलाइन्स एक उत्तम भागीदार आहेत. आम्ही जबाबदारी घेतल्यापासून त्यांनी आम्हाला अनेक प्रकारे मदत केली आहे. काही सुरक्षा प्रक्रियेच्याबाबतही त्यांनी आम्हाला मदत केली आहे.”
सिंगापूर एअरलाइन्सची एअर इंडियामध्ये २५.१ टक्के एवढी भागीदारी आहे. १२ जून रोजी या अपघातानंतर एअर इंडिया, बोईंग विमानं याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. मात्र, सिंगापूर एअरलाइन्स कमर्शिअल भागीदार असताना त्याबाबत काहीच बोलले गेले नाही. दरम्यान, या विमान अपघातामागे तुर्कीयेच्या एअरलाइन्स मेंटेनन्स सेंटर टेक्निकचा हात असल्याचा अंदाज एन. चंद्रशेखरन यांनी फेटाळून लावला आहे. ते म्हणाले की, “एअर इंडियाच्या ताफ्यात ३३ बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमानं आहेत आणि तुर्की कंपनी त्यापैकी एकही विमानाचं मेंटेनन्स करत नाही”, असे स्पष्टीकरण त्यांनी याबाबत दिले आहे.
अपघातानंतर चौकशीबाबत चंद्रशेखरन यांना विचारले असता ते म्हणाले, “आमचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर विमान चांगल्या स्थितीत होते. देखभालीची कोणतीही समस्या नव्हती. मी स्वत: रेकॉर्ड तपासले. विमान, इंजिन पायलट, सर्व काही ठीक होते. हा अपघात इतका वेदनादायक आहे की त्याबाबत ऐकल्यावर माझं ह्रदय पिळवटून जातं. टाटा समूह पीडितांच्या कायम सोबत आहे.”
महत्त्वाचे मुद्दे:
- विमानात कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता
- दोन्ही इंजिन सुस्थितीत होते
- टाटा ग्रुप पीडितांच्या पाठीशी उभा आहे
- अपघाताचा प्राथमिक तपास अहवाल ३० दिवसांत येईल
- तुर्कीयेच्या कंपनीचा काहीही संबंध नाही
- सिंगापूर एअरलाइन्सने कायम मदत केली आहे- एन. चंद्रशेखरन
बोईंग आणि जीईकडून मागितली उत्तरे
चंद्रशेखरन यांनी बोईंग आणि जीई एरोस्पेस (इंजिन बनवणारी कंपनी) यांना त्यांच्या इतर विमानांबाबत विचारणा केली आहे. इतर विमानांमध्ये काही दोष आहे का याची सखोल चौकशी करण्यास आणि त्यात काही बिघाड असल्यास ते स्पष्टपणे सांगण्यास सांगितले आहे.
मुलाखतीत एन. चंद्रशेखरन म्हणाले की, “विमानात कोणतीही समस्या नव्हती. विमानाचे उजवे इंजिन मार्च २०२५ मध्ये बदलण्यात आले होते. डाव्या इंजिनची सर्व्हिसिंग २०२३ मध्येच कऱण्यात आली होती. तसंच पुढची सर्व्हिसिंग डिसेंबर २०२५ मध्ये करण्यात येणार होती. विमानाच्या दोन्ही इंजिनांचा रेकॉर्ड व्यवस्थित होता. शिवाय ड्रीमलायनर विमानांचा रेकॉर्डही चांगला आहे.” चंद्रशेखरन यांनी सांगितले की, दोन्ही वैमानिकांनाही दीर्घ विमान उड्डाणाचा अनुभव होता. कॅप्टन सबरवाल यांना ११,५०० तास तर फर्स्ट कॅप्टन कुंदर यांना ३,४०० तासांचा अनुभव होता. दोघेही उत्तम कर्मचारी होते.
३० दिवसांत अहवाल
अपघात नेमका कशामुळे झाला हे जाणून घेण्यासाठी सर्वच वाट पाहत आहेत. त्याबाबत चंद्रशेखरन यांनी म्हटले की, “उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. या अपघाताचा प्रारंभिक तपास अहवाल ३० दिवसांत येईल. त्यानंतर पुढे जी काही पावलं उचलली जातील ती त्या आधारावरच असतील. विमान अपघात तपास ब्युरोने चौकशी सुरू केली आहे. डीजीसीएने एक उच्चस्तरीय समितीदेखील स्थापन केली आहे. अपघाताचा प्राथमिक अहवाल येण्यासाठी आणखी एक महिना लागू शकतो.”
हा अपघात अत्यंत वेदनादायक
“हा अपघात खूपच वेदनादायक होता. टाटा आणि एअर इंडिया पीडितांना मदत करतच आहेत. हा अपघात एवढा मोठा होता की त्याचे दु:ख आणि त्याच्या खुणा मनात वर्षानुवर्षे राहतील. या अपघातात बचावलेल्या एकमेव व्यक्तीलाही भेटलो आहे”, असे एन. चंद्रशेखरन यांनी मुलाखतीत म्हटले आहे.
सध्या एअर इंडिया विमानाच्या या अपघाताची चौकशी सुरू आहे. अमेरिका, भारत तसंच इतर देशांमधील संस्थाही या चौकशीच्या प्रक्रियेत सामील आहेत. तसंच विमानातील ब्लॅक बॉक्सही सापडला असून याबाबतचा अहवाल काही दिवसांनंतरच कळेल असे सांगितले जात आहे