CRPF jawan arrested for spying in Pakistan राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केंद्रीय राखीव पोलीस दलातील (सीआरपीएफ) सहायक उपनिरीक्षकाला अटक केली आहे. या जवानावर पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांबरोबर संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोप आहे. मोती राम जाट असे या जवानाचे नाव असून, तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करीत असल्याचे सांगितले जात आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ पासून तो पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित महत्त्वाची माहिती पुरवीत होता. पटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयाने या जवानाला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणा हेरगिरीविरुद्धच्या कारवाया वाढवत असल्याचे चित्र आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर दोन आठवड्यांत पंजाब, हरियाणा व उत्तर प्रदेशमध्ये छापे टाकण्यात आले आहेत आणि १५ हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला सीआरपीएफ जवान कोण आहे? त्याने पाकिस्तानला कोणत्या प्रकारची माहिती पुरवली? हेरगिरी कारवायांविरुद्ध सुरक्षा यंत्रणा कोणती पावले उचलत आहेत? त्याविषयी जाणून घेऊ…

मोती राम जाट कोण आहे?

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२३ पासून हा जवान पैशाच्या मोबदल्यात राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांना पुरवीत होता. याच आरोपाखाली एनआयएने मोती राम जाटला अटक केली. सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज१८’ला माहिती दिली की, मोती राम जाटची बदली होण्यापूर्वी तो सीआरपीएफच्या ११६ व्या बटालियनमध्ये सहायक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत होता. दिल्लीत एनआयएने त्याला अटक केली. एनआयएने म्हटले आहे की, मोती राम जाटला पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून वेगवेगळ्या मार्गांनी पैसे मिळत होते. सध्या या संदर्भात त्याची चौकशी सुरू आहे. पटियाला हाऊस येथील विशेष न्यायालयाने त्याला ६ जूनपर्यंत एनआयए कोठडीत पाठविले आहे. त्याच दिवशी सीआरपीएफकडून त्याला बडतर्फ करण्यात आले.

प्राप्त माहितीनुसार, जाटने सोशल मीडियाद्वारे पाकिस्तानी हँडलर्सशी संपर्क साधला. तपासकर्त्यांना असे आढळून आले की, एका पाकिस्तानी हँडलरने त्याच्या पत्नीच्या बँक खात्यात अनेक लाख रुपये ट्रान्स्फर केले. सीआरपीएफने त्याची अंतर्गत चौकशी सुरू केली. चार दिवसांच्या चौकशीनंतर जाटला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आणि २१ मे रोजी एनआयएकडे सोपविण्यात आले. सुरक्षा यंत्रणेने त्याच्यावर सुरक्षा दलांच्या हालचाली आणि महत्त्वाच्या प्रतिष्ठानांच्या ठिकाणांबद्दलची गुप्त माहिती पाकिस्तानी हँडलर्सना दिल्याचा आरोप केला आहे. त्याच्याविरोधात विविध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे सीआरपीएफ हे देशातील सर्वांत मोठे निमलष्करी दल आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादविरोधी आणि सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी सीआरपीएफ जबाबदार आहे. २०२३ मध्ये जाटला ‘हनी ट्रॅप’ करण्यात आल्याचा दावा केला जात आहे. पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी एक महिला असल्याचे भासवून सोशल मीडियावर त्याच्याशी संपर्क साधला आणि नंतर हवी ती माहिती मिळवली, असे वृत्त ‘द हिंदू’ने दिले आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले, “तपासादरम्यान असे आढळून आले की, सहायक उपनिरीक्षकाच्या खात्यात परदेशी खात्यातून दरमहा ३,००० रुपये जमा होत होते.”

पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी त्याचा संबंध होता का?

एनआयए अधिकारी आता मोती राम जाटची चौकशी करीत आहेत. ते पहलगाम हल्ल्याशी त्याचा काही संबंध आहे का, याचा शोध घेत असल्याची माहिती आहे. मुख्य म्हणजे बदली होण्यापूर्वी तो पहलगाममध्ये तैनात होता. त्याच्या बदलीनंतर सहा दिवसांनी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर गोळीबार केला, ज्यात २६ जणांचा मृत्यू झाला.
या हल्ल्यानंतर भारताने ७ मे रोजी पहाटे ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या कारवाईत पाकिस्तानमधील लष्कर-ए-तैयबा, जैश-ए-मोहम्मद (जेईएम) व हिजबुल मुजाहिदीनशी संबंधित दहशतवादाशी तळांना लक्ष्य केले गेले. सूत्रांनी ‘द प्रिंट’ला सांगितले की, सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मोती राम जाटची संशयास्पद सोशल मीडिया हाळचालींबाबत चौकशी केली होती.

हेरगिरी करणाऱ्यांवर कारवाई

पोलिसांनी या महिन्यात पंजाब, हरियाणा, गुजरात व उत्तर प्रदेशमध्ये हेरगिरी करणाऱ्या किमान १९ जणांना अटक केली आहे. या सर्वांवर संरक्षणाशी संबंधित संवेदनशील माहिती लीक करणे, गुप्तचर माहिती गोळा करण्यासाठी बेकायदा मार्गांचा वापर करणे, पाकिस्तानी नागरिकांशी संपर्क राखणे यांसारखे आरोप आहेत. सुरुवातीच्या तपासात असे आढळून आले की, उत्तर भारतात पाकिस्तानसमर्थित गुप्तहेर नेटवर्क कार्यरत आहे. अटक केलेल्यांमध्ये हरियाणाची रहिवासी ज्योती मल्होत्रा ​​आणि पंजाबची ३१ वर्षीय गुजाला यांचा समावेश आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघीही नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या एहसान-उर-रहीम नावाच्या पाकिस्तानी अधिकाऱ्याच्या संपर्कात होत्या. तो दानिश म्हणूनही ओळखला जात होता. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने केलेल्या कारवाईत दानिशला हद्दपार केले होते. ज्योतीची पोलिस कोठडी संपल्यानंतर सोमवारी तिला न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले. सुरक्षा यंत्रणांच्या मते, ती तीन पाकिस्तानी गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती.