Mumbai Kabutarkhana Controversy: सध्या मुंबईतल्या कबुतरांनी धुमाकूळ घातला आहे. दादरसारख्या ठिकाणी कबुतर जिंकणार की दादरकर असा संघर्ष निर्माण झाला आहे. त्यामुळेच भारतीय समाजात या कबुतर पालनाचे प्रस्थ कधी वाढले हे जाणून घेणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.

भारतात कबुतर हा पक्षी अगदी प्राचीन कालखंडापासून अस्तित्त्वात आहे. भारतीय राजसत्तेने कबुतरांचा वापर संदेशवहनासाठी मोठ्या प्रमाणात केला. परंतु, कबुतरांना खरे महत्त्व आले ते मुघल कालखंडात. या कालखंडाने कबुतर हा पक्षी केवळ संदेशवाहक किंवा आहाराचा स्रोत नाही, तर मनोरंजन, सौंदर्य आणि क्रीडा यासाठीही महत्त्वाचा आहे, हे दर्शवून दिले. मुघल काळात कबुतरपालन ही एक प्रतिष्ठेची कला मानली जात होती.

प्राचीन कालखंडपासून कबुतरपालन आणि त्यांना प्रशिक्षण देणं हा लोकप्रिय छंद होता. याला मुघलही अपवाद नव्हते. मुघल दरबारात कबुतरपालन केलं जात होतं. त्यासाठी दूरवरच्या देशांमधून कबुतर आणली गेली. या संदर्भातील एक महत्त्वाचा संदर्भ आपल्याला अबुल फजल (१५९०) लिखित ‘आइन-ए-अकबरी’ (Ain-i-Akbari) मध्ये सापडतो. बाबर हा मूळचा मध्य आशियातील फरगण्याचा. उझबेक या मंगोल गटाने हाकलून दिल्याने त्याने भारताच्या भूमीत पाय ठेवला. अकबरनामा या ग्रंथाचे तीन खंड आहेत. पहिला खंड अकबराच्या पूर्वजांविषयी माहिती देतो, दुसरा खंड त्याच्या कारकीर्दीतील घटना तसेच कबुतरांच्या पालनाविषयी आणि तिसरा खंड प्रशासन, राजघराणे, सेना, महसूल, भूगोल, प्रथा, भारतातील परंपरा, पिकांचे आकडे, किंमती व वेतन यांसारख्या बाबींवर प्रकाश टाकतो.

अकबराच्या काळात फरगण्याहून (Fergana) कबुतर आणली गेली. शिवाय त्या कबुतरांबरोबर कुशल कबुतर-पालक हबीबही होते (अकबरनामा, राज्यकाळाच्या ३१व्या वर्षातील घटना). आइन-ए-अकबरीतील दुसऱ्या खंडात अकबर मोकळा वेळ कसा घालवत होता, याविषयी माहिती दिली आहे. विरंगुळ्यांच्या या काळात कबुतरं उडवणे (‘इश्कबाजी’), वेगवेगळ्या रंगांच्या कबुतरांची पैदास करणे इत्यादी गोष्टींचा समावेश होता. अकबरच्या दरबारात एकूण २०,००० हून अधिक कबुतरे होती, त्यापैकी ५०० अकबरची खास कबुतर होती.

अकबर छावणीबरोबर कबुतरही बरोबर घेवून जात असे. कबुतरांना स्थलांतर करता येतील अशी घरटी तयार करण्यात आली होती. कबुतरांच्या या घरट्यांच स्थलांतर करण्यासाठी विशिष्ट माणसांचीही सोय करण्यात आली होती. कबुतरांना वेगवेगळ्या कसरती करण्यासाठी प्रशिक्षण दिले जात होते. सर्वसामान्य लोकांसाठी हा केवळ एक विरंगुळा असे. परंतु, अबुल फजलने म्हटले आहे की, अकबरासाठी हा एक विरंगुळा नव्हता, तर ते सांसारिक विचारांत गुरफटलेल्या लोकांना शिस्त लावण्यासाठी आणि मैत्री व सौहार्द निर्माण करण्याचे साधन होते.

कबुतरांचा वापर संदेशवहनासाठीही महत्त्वाचा होता आणि यासाठी काही विशिष्ट जातींना प्रशिक्षण दिले जात होते. अबुल फजल यांनी ‘रत’ कबुतराचा उल्लेख एक उत्कृष्ट संदेशवाहक म्हणून केला आहे. अगदी अलीकडे, २००२ सालापर्यंत, ओडिशा पोलिसांच्या पिजन सर्व्हिसमध्येही कबुतरे वापरली जात होती (इंडिपेंडंट, २१ मार्च २००२). शिवाय, त्याने ‘लोटन’ कबुतराचा उल्लेख ‘रोलर’ असा केला आहे आणि ‘फॅनटेल’ कबुतराचा उल्लेख त्याच्या फुलासारख्या शेपटीमुळे हंगामी फुल (जेकोबिन) म्हणून केला आहे. ‘जेकोबिन’ ही इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाची आवडती जात होती. ‘ट्रम्पेटर’ कबुतर ही देखील मुघलांच्या दरबारात होती. १८६५ साली रशियाने तुर्कस्तानातील बुखारा काबीज केल्यावर ट्रम्पेटर कबुतरं रशियन ट्रम्पेटर म्हणून प्रसिद्ध झाली.

टम्बलर कबुतरांच्या शरीराचा रंग, वैशिष्ट्ये आणि आकाशात उडण्वयाचे खेळ यांचा मुघल दरबारी लोक आनंद घेत असत. अकबराच्या कारकीर्दीपासून आजपर्यंत टम्बलर कबुतरांचा साधारण ४७२ वर्षांचा प्राचीन इतिहास आहे. टम्बलर कबुतरे त्यांच्या हवेत उलट्या पलट्या (तंबलिंग) मारण्याच्या क्षमतेसाठी निवडली जात असत. वेंडेल लेवी (१९४१) यांच्या The Pigeon या पुस्तकात, १५९० सालाच्या आधी भारतातील अशा कोलांटउडी मारणाऱ्या कबुतरांचा उल्लेख आहे. चार्ल्स डार्विन यांनी त्यांच्या The Origin of Species या पुस्तकात ‘शॉर्ट-फेस्ड टम्बलर’ या त्यांच्या काळातील लोकप्रिय जातीचा उल्लेख केला आहे. लेवींच्या पुस्तकात अबुल-फजल यांनी वर्णन केलेल्या ‘लोटन’ कबुतरांचा उल्लेख आहे.

कबुतरांचे खाद्य

मुघल काळात १०० उडत्या कबुतरांसाठी चार शेर धान्य दिले जात असे, तर इतर कबुतरांसाठी पाच शेर धान्य दिले जाई. जर ती जोडीने ठेवली असतील, तर ७.५ शेर धान्य लागत असे. उडत्या कबुतरांना फक्त बाजरी दिली जात असे, परंतु इतर कबुतरांना सात प्रकारचे मिश्र खाद्य दिले जात असे. यात तांदूळ, हरभरा, मूग, बाजरी, करार, लाहदरह व ज्वारी यांचा समावेश होता. कबुतरांच्या संगोपनासाठी १५ नोकर नियुक्त केलेले होते. त्यांना दरबाराच्या लष्करी विभागातून पगार मिळत असे. हा पगार दरमहा २ रुपयांपासून ४८ रुपयांपर्यंत असे (अकबरनामा, खंड २).

कबुतरांचे पुस्तक

सय्यद मुहम्मद मुसवी (वालिह) यांच्या ‘कबूतरनामा’ या ग्रंथात १६३ द्विपदींची एक कविता असून त्यानंतर कबुतरांचे विविध प्रकार, त्यांचे रंग व वैशिष्ट्ये आणि कबुतरं उडवण्याची कला याविषयीचे एक लघु गद्य विवेचन दिलेले आहे. हा ग्रंथ एका मियाँ खू्बान यांना मैत्रीच्या भावनेतून अर्पण करण्यात आला होता. त्यांनी कबुतरं उडवण्याच्या कलेवर माहितीपूर्ण ग्रंथ लिहून मागितला होता. मुहम्मद मुसवी वालिह यांचा जन्म खुरासान येथे झाला. ते हैदराबादला स्थलांतरित झाले आणि नंतर आर्कोट (तामिळनाडू) येथे गेले. ११८४ हिजरी (इ.स. १७७०/७१) मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी ‘नज्म अल-हुदा’ नावाची सूफी मसनवी (काव्यकथा) आणि कोंबड्यांच्या झुंजीवर एक कविता अशा अनेक रचना केल्या आहेत.

A durbar scene with the newly crowned Emperor Aurangzeb in his golden throne.

डार्विनचा आणि मुघल कबुतरांचा संबंध

चार्ल्स डार्विन (१८०९–१८८२) हा स्वतः एक उत्साही कबुतर-पालक होता. डार्विनने केंट प्रांतातील डाऊन गावातील आपल्या घरात कबुतरांची पैदास करण्यास सुरुवात केली होती. संशोधनाच्या काळात त्याचा पत्रव्यवहार मद्रास सिव्हिल सर्व्हिसमध्ये कार्यरत असलेल्या निसर्ग अभ्यासक आणि मानववंशशास्त्रज्ञ सर वॉल्टर इलियट (१८०३–१८८७) यांच्याशी झाला. डार्विनला अबुल फजल यांच्या कबुतरांवरील प्रकरणाची माहिती होती (Darwin and Elliot’s correspondence 1856-59) “मला समजले की, या संदर्भातील मजकूर ‘आइन-ए-अकबरी’ या फारसी ग्रंथात आहे (मी हे बरोबर लिहिले आहे की नाही, मला ठाऊक नाही), पण या ग्रंथाचे भाषांतर उपलब्ध असल्याने मी ते इंडिया हाऊस येथे पाहू शकतो.” इलियट यांनी १८५६ साली डार्विनला भारत आणि बर्मामधील विविध पक्ष्यांची कातडी पाठवली आणि सय्यद मुहम्मद मुसवी यांचा ग्रंथ इंग्रजीत अनुवाद करूनही पाठवला. डार्विनने या ग्रंथाचा आपल्या The Variation of Animals and Plants under Domestication (लंडन: जॉन मरे, १८६८; खंड १, पृ. १४१ आणि १५५) मध्ये दोनदा उल्लेख केला आहे.

ही माहिती जेम्स सी. लायल याने आपल्या Fancy Pigeons: Containing Full Directions for their Breeding and Management, with Descriptions of Every Known Variety (तिसरे सुधारित संस्करण, लंडन: गिल, १८८७) या पुस्तकात दिली आहे. लायल याने इलियटच्या भाषांतराबाबत विचारण्यासाठी डार्विनला पत्र लिहिले (पृ. १०४) होते. डार्विनने त्याला दिलेल्या उत्तरात, “आपल्या वाचनालयात ते सापडत नाही आणि ते सैल पानांच्या स्वरूपात असल्याने ते हरवले असावे अशी भीती व्यक्त केली होती. त्यानंतर लायल यांनी सर वॉल्टर इलियटकडे मूळ फारसी ग्रंथाबद्दल विचारणा केली होती. परंतु, इलियटकडूनही ग्रंथ हरवला होता. सुदैवाने, इलियट याला आपले भाषांतर पुन्हा सापडले आणि त्यांनी ते लायल यांना पाठवले. लायल यांनी सय्यद मुहम्मद मुसवी यांच्या प्रस्तावनेचा मजकूर आपल्या तिसऱ्या आवृत्तीच्या परिशिष्टात (पृ. ४१२–४१४) प्रकाशित केला आहे. डार्विनने १८६७ साली ब्रिटीश म्युझियमला दान केलेली कबुतरांच्या सांगाड्यांची व कातड्यांची खास संग्रहित मालिका सध्या नॅचरल हिस्टरी म्युझियम मध्ये ‘म्युझियम ट्रेझर्स’ म्हणून प्रदर्शित केली जाते.