Dangal fame actress Bulimia Disorder ‘दंगल’फेम अभिनेत्री फातिमा सना शेखने एका पॉडकास्टमध्ये बुलिमिया नावाच्या गंभीर विकाराविषयी सांगितले. हा विकार खाण्याशी संबंधित आहे. फातिमा म्हणाली की, तिला दोन वर्षांपासून बुलिमियाशी झुंज द्यावी लागत आहे. हा आजार असताना केलेल्या डाएटिंगमुळे तिला कसा त्रास झाला याचे वर्णन तिने केले. बुलिमियाने ग्रस्त रुग्ण जास्त प्रमाणात खातात आणि त्यानंतर वजन वाढू नये म्हणून उपवास करतात किंवा खूप जास्त व्यायाम करतात. आता एका अभ्यासात बुलिमिया असलेल्या रुग्णांमध्ये भूक, मनःस्थिती आणि शरीराचे वजन नियंत्रित करण्यात आतड्यातील जीवाणूंच्या भूमिकेवर लक्ष केंद्रित करण्यात येत आहे.
आता या विकाराच्या आनुवंशिक संबंधांचादेखील अभ्यास केला जात आहे. फरिदाबादच्या मेट्रो हॉस्पिटलमधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे संचालक डॉ. विशाल खुराना म्हणतात, “बुलिमियाच्या उपचारांसाठी अनुशासनाचा दृष्टिकोन आवश्यक आहे. आपल्याला धोक्याच्या सूचना, त्याची लक्षणे माहीत असणे आवश्यक आहे; जेणेकरून आपण या आजाराने ग्रस्त असलेल्यांना योग्य उपचार मिळवून देऊ शकू.” बुलिमिया हा आजार नक्की काय आहे? या आजाराची लक्षणे आणि उपचार काय? डॉक्टर काय सांगतात?
बुलिमिया नर्व्होसा हा विकार नेमका काय?
बुलिमिया नर्व्होसा हा खाण्याशी संबंधित गंभीर विकार आहे. हा विकार जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करतो. बऱ्याचदा गंभीर आरोग्य समस्या निर्माण होईपर्यंत या आजाराचे निदान होत नाही. या स्थितीमध्ये खाण्यापिण्याच्या पद्धतीचा समावेश असतो. अत्यंत कमी वेळेत जास्त प्रमाणात खाद्यपदार्थ पोटात भरून घेणे आणि असे वारंवार करणे, यालाच बिंज इटिंग डिसॉर्डर असे म्हणतात. या आजाराने ग्रस्त असलेल्यांना अपराधी भावना आल्यानंतर आणि वजन वाढू नये म्हणून ते पोटातून अन्न बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. ते यासाठी उलटी, पोट साफ करणारे औषध घेणे, व्यायामाचा अतिरेक करणे आदी गोष्टी करतात.
बुलिमिया असलेले लोक बऱ्याचदा बिंज इटिंगदरम्यान नियंत्रण गमावल्यासारखे अनुभवतात आणि अपराधीपणामुळे ते गुप्तपणे अन्नाचे अतिरिक्त सेवन करतात. जास्त खाल्ल्यानंतर वजन वाढेल या भीतीने त्यांच्याकडून चुकीच्या पद्धतीचे उपाय केले जातात. याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. बुलिमिया हा आजार केवळ खाण्यापिण्यापुरता मर्यादित नाही, तो शारीरिक प्रतिमा, आत्मसन्मान आणि भावनिक तणावाशी जोडलेला आहे.
या आजाराची लक्षणे कशी ओळखायची?
- अत्यंत कमी वेळेत जास्त प्रमाणात खाद्यपदार्थ पोटात भरणे किंवा खाण्यावर नियंत्रण ठेवता येत नाहीये असे वाटणे.
- खाल्ल्यानंतर उलट्या करणे, पोट साफ करणारी विरेचक घेणे किंवा अति व्यायाम करणे.
- रुग्णांना शरीराचा आकार आणि वजनाची खूप काळजी वाटणे.
- जेवणानंतर वारंवार शौचालयात जाणे.
- शारीरिकदृष्ट्या, त्यांच्या गालांवर किंवा जबड्यावर सूज असू शकते, दातांचे नुकसान झालेले असू शकते आणि स्वतःहून उलट्या केल्यामुळे शरीरात त्रास जाणवणे.
विकाराला ट्रिगर करणारे घटक कोणते?
बुलिमिया हा आनुवंशिक, मानसिक आणि सामाजिक घटकांच्या मिश्रणामुळे होणारा आजार आहे. आहार, तणाव, भावनिक आघात आणि शरीराच्या दिसण्याबद्दलचे सामाजिक दबाव, यामुळे याचा धोका वाढू शकतो. ज्या लोकांनी वजनाशी संबंधित त्रास अनुभवले आहे किंवा ज्यांना नैराश्य किंवा चिंता यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्यांचा इतिहास आहे, त्यांनादेखील या आजाराचा धोका आहे.
उपचार न केल्यास बुलिमिया या आजारामुळे शरीराचे गंभीर नुकसान होऊ शकते, जसे की:
- इलेक्ट्रोलाइट असंतुलन, ज्यामुळे हृदयाच्या समस्या उद्भवू शकतात.
- दात आणि हिरड्यांचे नुकसान.
- ॲसिड रिफ्लक्स आणि बद्धकोष्ठता यांसारख्या पाचनसंस्थेशी संबंधित समस्या.
- नैराश्य, चिंता आणि आत्मघाती विचार यांसारख्या मानसिक आरोग्याच्या समस्या.
तज्ज्ञांच्या मदतीने बुलिमियामधून बरे होणे शक्य आहे. सामान्यतः समुपदेशन आणि कधीकधी औषधांच्या मदतीने हा आजार बरा केला जाऊ शकतो. दीर्घकाळ चालणाऱ्या आरोग्य समस्या टाळण्यासाठी याकडे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे तज्ज्ञ सांगतात. जुलै २०२४ मध्ये, ‘JAMA Network Open’मध्ये प्रकाशित झालेल्या एका क्लिनिकल ट्रायलमध्ये असे दिसून आले की, इंटरनेटचा आधार घेऊन स्वतः यावर उपाय शोधणे विकाराची लक्षणे लक्षणीयरीत्या कमी करण्यासाठी प्रभावी आहे. ही डिजिटल साधने पारंपरिक उपचारांना पूरक म्हणून आणि अधिक रुग्णांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणून पाहिली जातात, कारण बरेच जण तज्ज्ञांची मदत घेणे टाळतात.
अभ्यासातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे बुलिमिया असलेल्या लोकांमध्ये भूक, मनःस्थिती आणि शरीराचे वजन नियंत्रित करण्यात आतड्यातील जीवाणूंची भूमिका महत्त्वाची असते. अभ्यासातून एक आनुवंशिक घटकही निश्चित झाला आहे. जर एखाद्या व्यक्तीच्या कुटुंबात बुलिमिया असलेला सदस्य असेल, तर त्याला हा विकार होण्याची शक्यता जवळपास १० पट अधिक असते.
उपचार काय?
योग्य मदतीसह बुलिमियावर उपचार करता येतात. नेशनवाइड्स चिल्ड्रन रिपोर्टनुसार, काही शिफारस केलेल्या उपचार पद्धतींमध्ये खालील बाबी समाविष्ट आहेत:
- समुपदेशन आणि मानसोपचार
- कॉग्नीटिव्ह बिहेवियरल थेरपी, इंटरपर्सन थेरपी
- मानसिक आरोग्य तज्ज्ञांनी लिहून दिलेले औषध
- रुग्णांसाठी एक सहायक वातावरण तयार करणे.
