मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गामुळे हा प्रवास तीन ते साडेतीन तासांत करणे शक्य झाले आहे. पण आता या प्रवासातील अंतर ३० मिनिटांनी आणखी कमी होणार आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) महामार्गातील घाट बायपास करून अतिजलद प्रवासासाठी खोपोली – कुसगाव दरम्यान नवीन मार्गिका अर्थात ‘मिसिंग लिंक’ बांधत आहे. या मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. यावेळी त्यांनी हा प्रकल्प केव्हा वाहतूक सेवेत दाखल होईल हेही सांगितले. मुंबई-पुणे प्रवासाचे अंतर कधीपासून ३० मिनिटांनी कमी होणार आणि कसे याचा हा आढावा…
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग कधीपासून सेवेत?
राज्याची राजधानी मुंबई आणि सांस्कृतिक राजधानी पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी, प्रवास वेगवान करण्यासाठी नवीन मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय १९९० मध्ये घेण्यात आला होता. ब्रिटिशकालीन जुना महामार्ग भविष्यात अपुरा पडण्याची शक्यता लक्षात घेऊन नवीन महामार्ग बांधण्याचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून हाती घेण्यात आले. यासाठी १९९७ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून १९९८ मध्ये कामाला सुरुवात करण्यात आली. ९४.५ किमी लांबीचा महमार्ग २००२ मध्ये पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात आला. या महामार्गामुळे मुंबई – पुणे अंतर तीन ते साडेतीन तासांत पूर्ण करणे शक्य होऊ लागले. या मार्गावरून प्रवास करण्यासाठी टोल भरावा लागतो. मात्र हा महामार्ग राज्यातील वाहतुकीच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचा महामार्ग मानला जात असून देशातील सर्वाधिक वर्दळीचा महामार्ग अशीही या महामार्गाची ओळख आहे. या महामार्गाला २००९ मध्ये राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचे नाव देण्यात आले आहे.
महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न?
या सहा पदरी महामार्गावरून काही वर्षांपूर्वीपर्यंत दिवसाला ५५ हजार वाहने धावत होती. पण आता यात वाढ झाली असून दिवसाला ६५ हजार वाहने या महामार्गावरून धावत आहेत. गर्दीच्या वेळी, सलग सुट्ट्यांच्या काळात या महामार्गावरून दावणाऱ्या वाहनांची संख्या थेट एक लाखाच्या आसपास जातो. या महामार्गावरील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तर भविष्यात यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या वाढत्या वाहन संख्येमुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला असून हा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एमएसआरडीसीने मिसिंग लिंक प्रकल्प हाती घेतला आहे.
कसा आहे मिसिंग लिंक प्रकल्प?
मुंबई – पुणे अंतर आणखी कमी करून प्रवास अधिक सुसाट करण्यासाठी एमएसआरडीसीने खोपोली – कुसगाव दरम्यान १९.८० किमी लांबीच्या नवीन मार्गिकेचे काम हाती घेतले. या कामाला फेब्रुवारी २०१९ मध्ये दोन टप्प्यात सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाअंतर्गत खोपोली – कुसगावदरम्यानचा मार्ग आता सहाऐवजी आठ पदरी होणार आहे. या नव्या मार्गात दोन बोगदेही बांधण्यात येत आहेत. यापैकी एक बोगदा १.७५ किमी लांबीचा, तर दुसरा ८.९२ किमी लांबीचा आहे. हा बोगदा २१.४२ रुंदीचा देशातील सर्वाधिक रुंदीचा असेल असा दावा केला जात आहे. तर ८.९२ किमी लांबीचा बोगदा आशियातील सर्वांत रुंद डोंगर आणि तलावाखालून जाणारा बोगदा ठरणार आहे. लोणावळा तलावाच्या तळाखाली जवळपास ५०० ते ६०० फूट अंतरावर हा बोगदा आहे. जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या बोगद्याचे काम करण्यात येत आहे. प्रवासी, वाहने यांच्या सुरक्षेचा बारकाईने विचार करून हा बोगदा बांधण्यात येत आहे. आपत्कालीन परिस्थितीत बाहेर पडण्यासाठी प्रत्येक ३०० मीटरवर मार्ग तयार करण्यात आले आहेत. बोगद्याच्या भिंतीला ५ मीटरचे आवरण करण्यात येणार असून त्यावर आगप्रतिबंधक लेपन करण्यात येणार आहे. आग लागल्यास ती विझवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध करण्यात येणार आहे. ६६९५.३७ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे प्रवासाच्या वेळेत ३० मिनिटांची बचत होणार आहे. प्रवास अधिक सुरक्षित होणार आहे. कारण नव्या मार्गिकेत घाट भाग कमी होणार असल्याने दरडी कोसळण्याची भीती दूर होणार आहे.
कामाला केव्हा सुरुवात?
मिसिंग लिंकच्या कामाला २०१९ मध्ये सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्याचे काम मे. नवयुग इंजिनीयरींग कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले, तर दुसऱ्या टप्प्याचे काम मे. एफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आले. हे काम आतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र काम आव्हानात्मक असल्याने आणि काही तांत्रिक अडचणी आल्याने प्रकल्पास विलंब झाला असून आजही या प्रकल्पाचे काम सुरू आहे. पावसाळा आणि वाऱ्याचा वेग अधिक असताना काम करणे अशक्य होत असून त्यामुळे कामास विलंब होत असल्याचेही एमएसआरडीसीकडून सातत्याने सांगितले जाते. यामुळेच या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठीच्या अनेक तारखा चुकल्या आहेत. प्रकल्प पूर्णत्वासाठी डिसेंबर २०२२, जून २०२३, जानेवारी २०२४, मार्च २०२४ अशा अनेक तारखा देण्यात आल्या. मात्र अद्याप काम पूर्ण झालेले नाही. तर आता एमएमआरडीसीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी नवीन तारीख जाहीर केली आहे.
प्रकल्प डिसेंबरमध्ये की ऑक्टोबरमध्ये?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवार, १२ जुलै रोजी मिसिंग लिंक प्रकल्पास भेट दिली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी काम कसे सुरू आहे, कामात काय अडचणी येत आहेत आणि काम केव्हा पूर्ण होणार याची माहिती गायकवाड यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिसिंग लिंकचे काम आव्हानात्मक असल्याचे म्हणत कामाचे कौतुक केले. हा प्रकल्प आभियांत्रिकी चमत्कार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. महत्त्वाचे म्हणजे हा प्रकल्प डिसेंबरमध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर तो वाहतूक सेवेत दाखल होईल, अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. पण मुख्यमंत्र्यांनी कामाला अधिक वेग द्या आणि काम ऑक्टोबर वा नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करा असे निर्देश एमएसआरडीसीला दिले आहेत. यासंबंधी अधिकाऱ्यांशी चर्चा करू, असेही ते यावेळी म्हणाले.
मुंबई-पुणे प्रवास अंतर ३० मिनिटांनी कमी?
मुख्यमंत्र्यांनी ऑक्टोबर वा नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे निर्देश एमएसआरडीसीला दिले आहेत. त्यानुसार कामाला वेग दिला जाणार आहे. मात्र दऱ्याखोऱ्यात काम सुरू असून कित्येक मीटर उंचीवरील पुलाचे काँक्रीटीकरण करण्यास वेळ लागणार आहे. या परिसरात पाऊस खूप पडतो. पावसात काम करणे अशक्य होते. तर वाऱ्याचा वेग वाढल्यानंतर कामात अडथळा निर्माण होतो. मिसिंग लिंकचे काम अत्यंत आव्हानात्मक असून त्यास वेळ द्यावा लागतो. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबरपर्यंत काम पूर्ण करणे अशक्य असल्याचे एमएसआरडीसीतील सूत्रांचे म्हणणे आहे. डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे नियोजन एमएसआरडीसीचे आहे. त्यामुळे काम पूर्ण करूनत डिसेंबरअखेरीस ही नवीन मार्गिका वाहतूक सेवेत दाखल करण्याचा एमएसआरडीसीचा प्रयत्न आहे. असे झाल्यास डिसेंबरअखेरपासून मुंबई-पुणे प्रवास आणखी जलद होईल, प्रवासाचे अंतर ३० मिनिटांनी कमी होईल. तर दुसरीकडे पुणे – नवी मुंबई विमानतळ अंतरही पुणेकरांना सव्वा तासात पार करता येणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.