Right to die with dignity गेल्या आठवड्यात अभिनेत्री रूथ पॉसनर आणि त्यांचे पती मायकल या दोघांचाही स्वित्झर्लंडमधील एका ‘सुसाइड क्लिनिक’मध्ये मृत्यू झाला. ते दोघेही आपल्या नव्वदीच्या उत्तरार्धात होते. त्यांच्या या निर्णयामुळे इच्छामरणाचा मुद्दा पुन्हा उपस्थित झाला आहे आणि या विषयावरील वादविवाद पुन्हा सुरू झाले आहेत. इच्छामरणाच्या केंद्रस्थानी दु:ख (Suffering) ही संकल्पना आहे. अमेरिकेतील एका पुराणमतवादी नियतकालिकाने एका लेखात म्हटले आहे, “एकदा आपण दु:खावर उत्तर म्हणून मरणे स्वीकारार्ह मानले, तर त्याचा विस्तार सतत होत जाईल.” काय आहे इच्छामरण? हा वादाचा विषय का ठरत आहे? इच्छामरणाची मागणी का वाढतेय? त्याविषयी जाणून घेऊयात…
इच्छामरण म्हणजे नक्की काय?
इच्छामरणाची (Assisted dying) एक व्यापक संज्ञा आहे, त्यामध्ये खालील दोन गोष्टींचा समावेश होतो :
- वैद्यकीय साह्याने इच्छामरण : जेव्हा व्यक्ती अंतिम कृत्य स्वतः करते.
- ऐच्छिक सक्रिय इच्छामरण: जेव्हा डॉक्टर, रुग्णाच्या संमतीने अंतिम कृत्य करतात.
इच्छामरणाची मागणी का वाढतेय?
रूथ पॉसनर (वय ९६) यांनी आत्महत्या करण्यापूर्वी मित्र आणि कुटुंबीयांना पाठविलेल्या ई-मेलमध्ये लिहिले होते, “अखेरीस दृष्टी व श्रवणशक्ती कमकुवत होणे आणि ऊर्जेचा अभाव असल्यामुळे जगणे कठीण झाले होते. त्यामुळे केवळ अस्तित्व उरले होते. ही स्थिती कोणत्याही उपचाराने किंवा काळजीने सुधारू शकली नसती.” अनेकांच्या इच्छामरणासाठी या शारीरिक बाबीच कारणीभूत ठरतात.

ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो (इ.स.पूर्व ४ थे शतक) यांनी द रिपब्लिकमध्ये म्हटले होते की, जे शारीरिकदृष्ट्या निरोगी नाहीत आणि आजारांबरोबर जगत आहेत, त्यांना मरण्यासाठी सोडून द्यावे. यामागची कल्पना अशी आहे की, आयुष्याच्या एका विशिष्ट टप्प्यावर दु:खामुळे आयुष्य जगण्यालायक राहत नाही. अशा परिस्थितीत, एखाद्या व्यक्तीला मरणासाठी आपल्या अधिकाराचा वापर करता यायला हवा. अनेक सर्वेक्षणांनी असे नोंदवले आहे की, आयुष्याच्या अंतिम टप्प्यात स्वायत्तता गमावण्याची भीती हेच इच्छामरणाची मागणी करणाऱ्या बहुतेक वृद्धांसाठी प्राथमिक कारण आहे.
हा विषय वादग्रस्त का ठरत आहे?
टीकाकारांचे म्हणणे आहे की, इच्छामरण ही स्वायत्ततेची कृती नाही. कारण- जीवनाशिवाय स्वायत्तता अस्तित्वात नाही. पूर्वी नमूद केलेल्या नॅशनल रिव्ह्यूमधील लेखात म्हटल्याप्रमाणे, “एक काळ होता जेव्हा दोन वृद्धांनी एकत्र आत्महत्या करणे ही शोकांतिका मानली जात असे. आता अनेक लोक त्याला सहज स्वीकारतात.” टीकाकार असाही युक्तिवाद करतात की, दु:खाच्या कल्पनेत व्याख्येची स्पष्टता नाही, ज्यामुळे सामाजिक संरचनेचा मूळ आधार विस्कळित होत आहे. उदाहरणार्थ, पॉसनर्स या जोडप्याला कोणताही असह्य आजार नव्हता; त्यांना केवळ वाटले की, त्यांच्या इंद्रियांमध्ये अडचणी आल्याने त्यांचे जीवन जगण्यालायक राहिले नाही.
टीकाकारांचे म्हणणे आहे की, किशोरवयीन किंवा प्रसूतीनंतरच्या नैराश्याने त्रस्त असलेल्या नवीन माताही याच आधारावर युक्तिवाद करू शकतात. दु:खासारखी अस्पष्ट संकल्पना मृत्यूचे समर्थन म्हणून दडपशाही करणाऱ्या शक्तींद्वारे गैरवापरली जाऊ शकते. याचे उदाहरण म्हणजे ॲडॉल्फ हिटलरनेही अपंगांचे जीवन जगण्यालायक नाही, या युक्तिवादावर आधारित त्यांना मृत्यू छावण्यांमध्ये (Death camps) पाठवले होते.
कोणकोणत्या देशात मरणाचा अधिकार? भारतात इच्छामरण वैध आहे?
बहुतेक ठिकाणी मृत्यू बेकायदा आहे, किंबहुना तो गुन्हा आहे. इच्छामरणाला परवानगी देणाऱ्या ठिकाणी अनेक नियम आहेत. उदाहरणार्थ, ब्रिटनमध्ये ‘Terminally Ill Adults (End of Life) Bill, 2024’ केवळ १८ वर्षांवरील आणि आजारी असलेल्या व्यक्तींनाच इच्छामरण निवडण्याची परवानगी देतो. या कायद्यात अपंगत्व आणि मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तींना वगळण्यात आले आहे. एखाद्याला इच्छामरणासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून परवानगी घेणे अनिवार्य करते आणि व्यक्ती आपला निर्णय बदलू शकेल यासाठी ‘पुनर्विचार कालावधी’ दिला जातो. अर्ज दाखल करण्यापूर्वी व्यक्ती किमान १२ महिने ब्रिटनचा रहिवासी असणेदेखील या कायद्यात आवश्यक आहे.
ब्रिटनचा कायदा सर्वांत कडक मानला जात असताना, स्वित्झर्लंडसारखे काही देश असे आहेत, ज्यांनी निर्बंध इतके शिथिल केले आहेत की ते ‘डेथ टुरिझम’चे ठिकाण ठरत आहे. स्विस कायद्यांमध्ये रहिवासाची कोणतीही अट नाही. इच्छामरणाची प्रक्रियादेखील खूप कमी किचकट आहे. २०१८ मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने ‘सन्मानाने मरणाचा अधिकार’ (Right to die with dignity) हा भारतीय संविधानाच्या कलम २१ अंतर्गत असलेल्या ‘सन्मानाने जगण्याचा अधिकार’चा भाग असल्याचे मत नोंदवले. परंतु, याला इच्छामरण म्हणता येणार नाही. कारण- यात मृत्यू घडवून आणण्यासाठी हस्तक्षेप आवश्यक असतो. भारतात, असा कायदा झाल्यास कुटुंबांकडून वृद्धांच्या शोषणासाठी त्याचा गैरवापर होण्याची भीती आहे आणि हीच भारतात या कायद्याला वैधता मिळण्यात अडचण आहे.
इच्छामरणासाठी ‘सुसाईड पॉड’
स्वित्झर्लंडमध्ये काही आजारी असणार्या आणि लवकर मृत्यू होणार्या व्यक्ती, अंथरुणाला खिळून असणार्या व्यक्ती जीवन संपवण्यासाठी म्हणून इच्छामरणासाठी अर्ज करू शकतात. स्वित्झर्लंडमध्ये त्यासाठी सुसाईड पॉडदेखील तयार करण्यात आले आहेत. स्वित्झर्लंडमध्ये १९४२ पासून स्वेच्छेने मरण्याची कायदेशीर परवानगी आहे. या सार्को पॉडला ‘टेस्ला ऑफ इउथेनिशिया’ म्हणूनही ओळखले जाते. सार्को पॉडमध्ये एखाद्या व्यक्तीचा केवळ १० मिनिटांत वेदनेशिवाय मृत्यू होऊ शकतो.
२०१९ मध्ये पहिल्यांदा लॉंच करण्यात आलेल्या या पॉडचा शोध ऑस्ट्रेलियन वंशाच्या फिलीप नित्शके यांनी लावला होता. मरणाच्या प्रक्रियेत होणार्या वेदना आणि अस्वस्थता दूर करणे, हे त्याचे उद्दिष्ट आहे आणि त्याच वर्षी व्हेनिस डिझाईन फेस्टिव्हलमध्ये या पॉडची स्लीक 3D कॅप्सूल डिझाइन प्रदर्शित करण्यात आली होती.