Etymology of the word Bhagwa गेले काही दिवस दिपिका पदुकोणने ‘पठाण’ चित्रपटात परिधान केलेल्या भगव्या बिकिनीवरून देशभर गदारोळ सुरू आहे. आक्रमक हिंदू संघटनांनी भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. त्या निमित्ताने भगवा या शब्दाच्या व्युत्पत्तीचा आणि भगव्या रंगाच्या गुणधर्म- वापराचा घेतलेला हा वेध…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भगवान या शब्दाची नेमकी व्युत्पत्ती काय?

भग हा शब्द ‘भज् सेवायाम्’ या धातुपासून तयार झाला आहे. या शब्दाचे अनेक अर्थ आहेत. ऐश्वर्य, ओज/तेज, रवि, योनी याचबरोबर भग ही (वैदिक) देवतादेखील आहे. शब्द वापरला जातो त्यावेळेस त्याचा संदर्भ पाहून भाषेमध्ये अर्थ घेतला जातो.
भगवान् – यात मूळ शब्द भगवत् – यामध्ये भग या शब्दाला वत् हा मत्वर्थी प्रत्यय लागला आहे. वत् प्रत्यययुक्त शब्द ‘ती विशिष्ट गोष्ट असणारा’ असा अर्थ दाखवतो. भगवती हे भगवान् शब्दाचंच स्त्रीलिंगी रूप आहे. देवीसाठी भगवती असा शब्द प्रयोग केला जातो.

आणखी वाचा : दीपिकाच्या भगव्या बिकिनीवर आक्षेप; पण हिंदू धर्मात भगव्या रंगाला एवढं महत्त्वं का? हिंदू साधू-संत भगवी वस्त्रं का परिधान करतात?

भग- योनी- भगवती असा या शब्दाचा प्रवास आहे का?

भग याचा एक अर्थ योनि/छिद्र असाही कोशात सापडतो. ’सुभगा’ (जिची प्रजननक्षमता चांगली आहे, अशी) हा शब्द त्याच अर्थाने वापरला जातो. मात्र हा शब्द देवीसाठी वापरला जातो, त्यावेळेस भगवान म्हणजे तेज धारण करणारा तो याचे स्त्रिलिंगी रूप म्हणून भगवती हा शब्द वापरला जातो. त्याचा योनी या अर्थाशी काहीही संबंध नाही, असे भाषातज्ज्ञ डॉ. गौरी माहुलीकर सांगतात.

भगवान ही संकल्पना आहे का?

होय, या संकल्पनेनुसार, ज्याच्याकडे ज्ञान, वैराग्य, लक्ष्मी, बल, ऐश्वर्य आणि शक्ती असे सहा विशेष गुण आहेत, त्याला भगवान असे म्हटले जाते. भगवान या शब्दाचा पहिला वापर आपल्याला ऋग्वेदामध्ये सापडतो. युनेस्को या जागतिक सांस्कृतिक संघटनेने ऋग्वेदाला जगातिक सर्वात प्राचीन मौखिक वाङ् मयाचा दर्जा दिला आहे. ऋग्वेदाची पाचवी ऋचा, ४१ वे सुक्त आणि सातव्या मंडलात ‘भगवान’ हा उल्लेख येतो. ऋग्वेद तसेच अथर्ववेदामध्येही काही ठिकाणी भगवान हा शब्दप्रयोग येतो.

आणखी वाचा : ‘बेशरम रंग’ ते हिंदू महासभेचा आक्षेप; ‘पठाण’ चित्रपट प्रदर्शनाआधीच वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?

भगवान हा शब्दप्रयोग सर्वाधिक गौतम बुद्ध यांना वापरण्यात आला हे खरे आहे काय?

होय. पालीमधील अथातो भगवा… हे तर सुप्रसिद्धच आहे. असे होते भगवान (बुद्ध) असा त्याचा अर्थ आहे. गौतम बुद्धांसाठी या शब्दाचा वापर साहित्यात मुबलक प्रमाणात करण्यात आला आहे. बौद्ध साहित्याचे विद्वान अभ्यासक डॉ. आ. ह. साळुंखे सांगतात, पाली वाङ्मयात गौतम बुद्धांना उद्देशून पुनः पुन्हा वापरण्यात आलेला शब्द म्हणजे ‘भगवा’. ‘भगवा’ म्हणजे उत्तम गुणांनी संपन्न’. या शब्दाचे मूळ रूप ‘भगवत’ असे आहे. ‘भगवा’ हे त्याचे प्रथमा विभक्तीमधील एकवचन होय, संस्कृतमध्ये ‘भगवान्’ असे रूप वापरले जात असले, तरी पालीमध्ये ‘भगवा’ हेच रूप वापरले जाते. संगणकाच्या आधारे केलेल्या गणनेनुसार, तिपिटकामध्ये हा शब्द ८७५८ वेळा आला आहे. तिपिटक, अट्ठकथा आणि टीका या सर्व ग्रंथांचा एकत्रित विचार केला, तर तो तब्बल १७ हजार ९४२ वेळा आला आहे.

तर मग, नारिंगी रंगाला भगवा या शब्दाचे उपयोजन करण्यामागचे प्रयोजन काय असावे?

भग याचा एक अर्थ ओज/ तेज/ ऐश्वर्य असा आहे त्यामुळे ओजयुक्त/तेजयुक्त रंग म्हणून या रंगाला भगवा हे नामाभिधान प्राप्त झालेले असावे. भगवा हा शब्द मुळातील भगवान् या संस्कृत शब्दावरून आलेला असण्याची शक्यता सर्वाधिक आहे.

भगव्या रंगाचा वापर…

अडचणीतून सुटका करण्यासाठी जगभरात जी उपकरणे वापरली जातात ती सर्व भगव्या किंवा नारिंगी रंगाची असतात. हा जगातील एकमेव रंग आहे जो, प्रदूषित वातावरणातही त्याच ओजस्वी रंगाचा दिसतो. इतर रंग प्रदूषित वातावरणात प्रत्यक्षापेक्षा वेगळे भासमान होतात. प्रदूषित वातावरणातही भगवा रंग भगवाच दिसण्यामागे त्याच्या तरंगलांबीचे भौतिकशास्त्रातील वैज्ञानिक कारण त्यामागे आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepika padukones orange bikini pathaan controversy etimology where does a colour name bhagawa comes from vp
First published on: 21-12-2022 at 17:50 IST