गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयात काम करणाऱ्या टेक्निशियनला डिजिटल बलात्काराच्या गुन्ह्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी (ता. ११) रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात (आयसीयू) व्हेंटिलेटरवर असलेल्या एअर होस्टेसवर त्याने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा अतिदक्षता विभागात दोन परिचारिका उपस्थित होत्या. ‘डिजिटल अरेस्ट’ हा कायद्यात परिभाषित केलेला गुन्हा आहे. ‘डिजिटल रेप’ म्हणजे नक्की काय? या गुन्ह्यांतर्गत शिक्षेची तरतूद काय? मेदांता रुग्णालयात नक्की काय घडले? जाणून घेऊ.
मेदांता रुग्णालयात काय घडले?
गुरुग्राममधील मेदांता रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात एअर होस्टेसवर डिजिटल बलात्कार झाल्याची घटना घडली. एअर होस्टेस व्हेंटिलेटरवर असताना टेक्निशियन म्हणून काम करणाऱ्या दीपक कुमारने तिच्यावर बलात्कार केला. काही वेळाने पीडिता शुद्धीवर आली. तिच्यावर झालेल्या बलात्काराच्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आणि त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. आरोपी दीपक कुमार आता पोलिसांच्या ताब्यात आहे. दीपक कुमार बिहारमधील मुझफ्फरपूरचा रहिवासी असून, त्याने ऑपरेशन थिएटर टेक्नॉलॉजीमध्ये पदवी मिळवली आणि त्यानंतर तो मेदांता हॉस्पिटलमध्ये आयसीयू टेक्निशियन म्हणून कामावर रुजू झाला. हे प्रकरण उघडकीस येताच डिजिटल रेप म्हणजे काय, याविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.
डिजिटल रेप म्हणजे काय?
डिजिटल रेप हा इंटरनेटशी संबंधित गुन्हा नाही. हा एक गंभीर लैंगिक गुन्हा आहे. ‘डिजिटल रेप’ म्हणजे महिला किंवा मुलीच्या गुप्तांगात तिच्या संमतीशिवाय हाताची बोटे, पायाची बोटे, अंगठा किंवा प्रजनन अवयवाव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तूचा वापर केला जातो. त्यातील डिजिटल हा शब्द अंकांना सूचित करतो. म्हणजेच हा तंत्रज्ञानाचा नाही, तर हाताच्या किंवा पायाच्या अंकांना सूचित करतो. डिसेंबर २०१२ पर्यंत ‘डिजिटल रेप’ बलात्काराच्या कक्षेत येत नव्हता.
निर्भया सामूहिक बलात्कारानंतर भारतातील लैंगिक गुन्ह्याला ‘डिजिटल रेप’ म्हणून वर्गीकृत करण्यात आले. भारतीय दंड संहिता (आयपीसी) अंतर्गत या गुन्ह्याचा बलात्काराच्या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. अशी कृत्ये रुग्णालये, घरे, सार्वजनिक जागा किंवा अगदी पोलिस कोठडीतदेखील विविध घडू शकतात. डिजिटल रेपमुळे शारीरिक, भावनिक आणि मानसिक परिणाम होऊ शकतात.
न्यायालयाने अशा प्रकरणांमध्ये दिलेले निर्णय?
२०२१ च्या एका प्रकरणात दिल्लीच्या न्यायालयाने दोन वर्षांच्या मुलीवर झालेल्या गंभीर लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली एका आरोपीला २५ वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. या प्रकरणात न्यायालयाने असा निर्णय दिला की, हे डिजिटल रेपचे प्रकरण आहे आणि त्यामुळे यात कोणतीही सूट दिली जाणार नाही. लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पोक्सो) अंतर्गत येणारी प्रकरणे हाताळणाऱ्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश बबिता पुनिया यांनी हा निकाल दिला होता. डिजिटल रेप याला कमी गंभीर गुन्हा मानला जावा, अशा आशयाची याचिका त्यांनी फेटाळून लावली होती.
न्यायाधीशांनी त्या निर्णयात म्हटले होते, “मी याच्याशी सहमत नाही. कायदेमंडळाने डिजिटल पेनिट्रेशन आणि पेनिट्रेशनमध्ये कोणताही फरक केलेला नाही.” न्यायालयाने बचाव पक्षाने केलेले इतर दावेदेखील फेटाळून लावले होते. त्यात आरोपीचे कमी वय, पहिल्यांदाच गुन्हा केला असल्याचे कारण, निरक्षरता आदी कारणे मांडण्यात आली होती. परंतु, न्यायालयाकडून शिक्षा कमी करण्यासाठी ही कारणे म्हणून स्वीकारली गेली नाहीत. १७ जानेवारी २०२५ रोजी त्या आरोपीला विविध कलमाच्या अंतर्गत दोषी ठरवण्यात आले होते.
दोन वर्षांच्या एका मुलीला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर डॉक्टरांना तिच्या योनीमध्ये बोटांचे ठसे आढळून आले होते. या प्रकरणात लैंगिक छळ किंवा बलात्काराशी संबंधित कोणतेही पुरावे आढळले नाहीत. मुख्य म्हणजे वडिलांनी तिच्याबरोबर हे कृत्य केले होते. त्यानंतर आरोपीला या प्रकरणात अटक करण्यात आली आणि भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. दिल्लीतदेखील अशाच प्रकारची एक घटना घडली. ६० वर्षीय महिला रिक्षामधून लग्न समारंभासाठी जात होती. या प्रकरणात रिक्षाचालकाने महिलेच्या गुप्त मार्गात लोखंडी रॉड घातला होता. या प्रकरणी ड्रायव्हरला अटक करण्यात आली; परंतु भारतीय दंड संहितेच्या कलम ३७६ अंतर्गत त्याला दोषी ठरवण्यात आले नाही.
मेदांता प्रकरणातील आरोपीची ओळख पटली असून, आता आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस उपायुक्त (मुख्यालय) डॉ. अर्पित जैन यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाकडून करण्यात आलेल्या विस्तृत चौकशीनंतर दीपकला अटक करण्यात आली. जैन म्हणाले, “या प्रकरणात रुग्णालयातील ५० हून अधिक कर्मचारी आणि काही डॉक्टरांची चौकशी करण्यात आली. ८०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज तपासण्यात आले आहेत.
विस्तृत तपासानंतर आम्ही अखेर आरोपीची ओळख पटवली असून, आज त्याला अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुलीदेखील दिली आहे,” असे जैन म्हणाले. १४ एप्रिल रोजी ४६ वर्षीय एअर होस्टेसने तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपीला शनिवारी न्यायालयात हजर केले जाईल. तसेच या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.