हिवाळी अधिवेशनात आज जी काही गरमागरमी पाहण्यास मिळाली ती दिशा सालियनच्या प्रकरणावरून. दिशा सालियनचा मृत्यू हा सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यू आधी काही दिवस झाला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणावरून शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर आरोप केले. त्यानंतर हिवाळी अधिवेशनातही यावरून आरोप- प्रत्यारोप झाले. या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी होईल असं आश्वासन महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. आपण जाणून घेणार आहोत हे प्रकरण नेमकं आहे काय?
दिशा सालियनचा मृत्यू कधी झाला? ती कोण होती?
तारीख होती ८ जून २०२० याच दिवशी दिशा सालियनचा मृत्यू तिच्या घराच्या बाल्कनीतून पडून झाला. ही आत्महत्या असल्याची नोंद पोलिसांनी केली. दिशा सालियन ही दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतची मॅनेजर म्हणून काम करत होती. सुशांतचा मृत्यू होण्याच्या काही दिवस आधी दिशाचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार होतं. या प्रकरणानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी याबाबत गंभीर आरोप केले.

नारायण राणे यांनी काय आरोप केले?
नारायण राणे आणि नितेश राणे या दोघांनी या प्रकरणात आदित्य ठाकरेंवर आरोप केले आहेत. त्यांनी नाव घेतलं नसलं तरीही त्यांचा अंगुलीनिर्देश हा आदित्य ठाकरेंकडेच आहे. एवढंच नाही तर दिशा सालियनची आत्महत्या नसून हत्या आहे असाही दावा नारायण राणेंनी केला आहे.
काय आहेत नारायण राणेंचे आरोप?
दिशा सालियनने आत्महत्या केलेली नाही तर तिची हत्या झाली आहे
दिशा सालियनवर बलात्कार झाला त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. तिचा मृत्यू झाला तेव्हा ती गरोदर होती
दिशा सालियनवर बलात्कार होत असताना त्या फ्लॅट बाहेर कोणत्या मंत्र्यांचे सुरक्षा रक्षक पहारा देत होते?
सुशांत सिंह राजपूतला हे सगळं प्रकरण समजलं होतं त्याने आवाज उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याचीही हत्या करून त्याला शांत करण्यात आलं. हे प्रमुख आरोप राणे यांनी केले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरेंकडे मंत्रिपद होतं. दिशा सालियन आणि सुशांत प्रकरण घडल्यानंतर हे आरोप नारायण राणे यांनी केले आहेत.
नारायण राणे यांनी ऑगस्ट २०२० च्या पत्रकार परिषदेत काय म्हटलं होतं?
नारायण राणेंनी ऑगस्ट २०२० महिन्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर या पत्रकार परिषदेत त्यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप केले होते. सुशांतसोबत पार्टीमध्ये आदित्य पांचोलीचा मुलगा सूरज पांचोली होता. दिशा सालियन एका पार्टीला गेली होती. तिथे तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि त्यानंतर तिला १८ व्या मजल्यावरून खाली फेकण्यात आलं. या प्रकरणी जेव्हा सुशांतला माहिती मिळाली तेव्हा त्याने मी गप्प बसणार नाही असं सांगितलं होतं. त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली आणि ती आत्महत्या आहे असं भासवण्यात आलं असा आरोप नारायण राणेंनी केला होता.
पोलिसांच्या तपासात नेमकं काय समोर आलं?
दिशा सालियनने आत्महत्या केली त्या रात्री कोणतीही पार्टी सुरू नव्हती. तसंच मृत्यूच्या वेळी ती गरोदर नव्हती. तिच्यावर बलात्कार झाल्याचाही कुठला पुरावा आढळला नाही असं पोलिसांनी सांगितलं.
दिशा सालियनची हत्या झाली नसून ती आत्महत्या आहे या निष्कर्षांपर्यंत पोलीस पोहचले आहेत. तसंच यात राजकीय हितसंबंध नाहीत असंही त्यांचं म्हणणं आहे.
दिशा सालियनच्या कुटुंबाचं काय म्हणणं आहे?
दिशा सालियनने तिच्या कामाच्या तणावातून आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असं दिशाच्या आईने सांगितलं. दिशाच्या मृत्यूनंतर विविध आरोप केले जात आहेत. मात्र या कुठल्याही आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. दिशा तिच्या कामाच्या तणावात होती. तिची एक महत्त्वाची डील रद्द झाली होती त्यामुळे तिचं टेन्शन आणखी वाढलं होतं. ती तणावात असल्याचं आम्हाला कळत होतं असंही दिशाच्या आईने सांगितलं होतं.
फेब्रुवारी महिन्यात दिशाच्या आईने पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी राजकारण्यांना आमच्या मुलीची बदनामी करण्याचा अधिकार कुणी दिला असाही प्रश्न उपस्थित केला होता. दिशा आता आमच्यात नाही. मात्र राजकारणी त्यांच्या फायद्यासाठी आम्हाला त्रास देत आहेत आणि दिशाची बदनामी करत आहेत. आम्ही इतके तणावात आहोत की आम्हीही आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू. तसं काही झालं तर जबाबदारी ही फक्त आरोप करणाऱ्यांची असेल असंही दिशाच्या आईने सांगितलं होतं.

आदित्य ठाकरेंनी या प्रकरणी काय भाष्य केलं होतं?
दिशा सालियन आणि सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण एकमेकांशी जोडण्याचा प्रयत्न केला गेला. सुशांतच्या आत्महत्येनंतर व्यक्तिशः माझ्यावर आणि ठाकरे कुटुंबावर चिखलफेक करण्यात आली. वैफल्यातून आलेली ही राजकीय पोटदुखी आहे. मृताच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा हा प्रकार माणुसकीला कलंक लावणारा आहे असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं होतं. तसंच माझा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नाही असंही आदित्य ठाकरेंनी स्पष्ट केलं होतं.
दिशा सालियनचा मृत्यू झाल्यापासून हे प्रकरण आता वेगवेगळ्या आरोप प्रत्यारोपांची आणि स्पष्टीकरणांची वळणं घेत इथपर्यंत येऊन ठेपलं आहे. या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी केली जाईल असेही आदेश देण्यात आले आहेत त्यातून काय बाहेर येणार हे पाहणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे.