Bhaubeej and Raksha Bandhan Difference : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरे गुरुवारी (तारीख २३ ऑक्टोबर) पुन्हा एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. बहीण जयवंती पांडे यांच्या मुंबईतल्या घरी दोघांनीही भाऊबीज साजरी केली. यावेळी आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे यांचीही उपस्थिती होती. ठाकरे कुटुंबियांच्या भेटीचे फोटो समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाले. अनेकांनी त्यांना एकत्र येण्याच्या शुभेच्छाही दिल्या. भाऊबीज आणि रक्षाबंधन हे दोन्ही सण बहीण भावाच्या नात्याला बळकटी देणारे मानले जातात. बहिणीने भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करणे आणि भावाने बहिणीला रक्षण करण्याचे वचन देणे असा त्यामागील मुख्य उद्देश आहे. दरम्यान, या दोन्ही सणांमध्ये नेमका काय फरक आहे? त्याबाबत जाणून घेऊ…
हिंदू पंचांगानुसार, रक्षाबंधनाचा सण श्रावण पौर्णिमेला साजरा केला जातो; तर भाऊबीज कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील द्वितीयेला म्हणजेच दिवाळीनंतरच्या दुसऱ्या दिवशी साजरी केली जाते. बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेले दोन्ही सण वेगवेगळे का साजरे केले जातात असा प्रश्न अनेकांना पडतो. याचे उत्तर दोन्ही सणांच्या मूळ पौराणिक कथांमध्ये आणि त्यांच्या महत्त्वात दडलेले आहे.
रक्षाबंधन का साजरे केले जाते?
हिंदू परंपरेतील अनेक सणांप्रमाणेच राखी पौर्णिमेच्या सणालाही अनेक पौराणिक कथांचा आधार आहे. त्यापैकी सर्वात लोकप्रिय असलेल्या दोन कथा भगवान विष्णू आणि त्यांच्या दोन अवतारांशी (वामन आणि कृष्ण) संबंधित आहेत. पहिल्या कथेनुसार, बळी नावाच्या महापराक्रमी दैत्य राजाने युद्धात इंद्रासह इतर देवांना पराभूत केले होते, त्याची कीर्ती इतकी प्रचंड वाढली की प्रजाही त्याची देवासारखीच पूजा करू लागली. या घटनेमुळे भयभीत झालेल्या देवांनी मदतीसाठी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. राजा बळी त्याच्या दानशूरतेसाठी ओळखला जात होता, म्हणूनच भगवान विष्णूंनी ब्राह्मणाचे (वामन) रूप घेतले आणि त्याच्याकडे तीन पावले जमीन दान म्हणून मागितली.
बळीने होकार दिल्यानंतर विष्णूंनी आपले विशाल रूप धारण केले. त्यांनी एका पावलात पृथ्वी आणि दुसऱ्या पावलात आकाश व्यापले. तिसरे पाऊल कुठे ठेवायचे अशी विचारणा त्यांनी राजाकडे केली. बळीने कसलाही विचार न करता त्याचे मस्तक समोर केले. विष्णूंनी त्याच्या डोक्यावर पाय ठेवताच बळी हा पुन्हा पाताळलोकात गेला. या भक्तीने विष्णू प्रसन्न झाले आणि त्यांनी राजाला एक वरदान देण्याचे ठरवले. त्यावेळी बळीने मोठ्या चलाखीने विष्णूला आपल्या राज्याचे रक्षण करण्याची विनंती केली. त्याची ही विनंती मान्य करून विष्णू वैकुंठ सोडून पातळालोकात राहू लागले. या घटनेने देवी लक्ष्मी (विष्णूंची पत्नी) चिंताग्रस्त झाली आणि त्यांनी विष्णूंना परत देवलोकात आणण्याचे ठरवले.
देवी लक्ष्मीने एका साधारण महिलेचे रूप धारण केले आणि बळी राजाच्या मनगटाला दोरा (राखी) बांधला. त्या बदल्यात विष्णूंना वैकुंठात परत पाठवण्यात यावे अशी मागणी लक्ष्मीने केली. बळीने होकार दिल्यानंतर विष्णू पुन्हा पाताळ लोकातून वैकुंठात गेले. दुसरी कथा महाभारतातील कृष्ण आणि द्रौपदीशी संबंधित आहे. द्रौपदीने एकदा कृष्णाच्या जखमी हातावर आपल्या साडीचा कपडा बांधला होता. जेव्हा कौरवांनी भरसभेत द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा श्रीकृष्णाने मदतीचा हाथ देऊन तिचे रक्षण केले. या दोन्ही घटनांचा सन्मान करण्यासाठी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर धागा बांधतात.
भाऊबीज या सणामागे यमराज (मृत्यूदेवता) आणि त्यांची जुळी बहीण यमी (यमुना नदीचे रूप) यांची पौराणिक कथा जोडलेली आहे. दोघेही सूर्यदेव आणि त्यांच्या पत्नी सरन्या (संजना) यांची मुले आहेत. मृत्यूची देवता आणि सर्व सजीवांच्या कर्माचा हिशेब ठेवण्याची जबाबदारी असल्याने यमराज यांना त्यांच्या बहिणीला भेटायला फारसा वेळ मिळत नव्हता. एकदा कार्तिक महिन्याच्या दुसऱ्या दिवशी ते यमीला भेटण्यासाठी गेले, त्यावेळी बहिणीने यमराज यांचे स्वागत केले आणि त्यांच्या कपाळाला टिळा लावून स्वादिष्ट भोजन दिले. या कथेवरून भाऊबीज सणाची परंपरा पडल्याचे सांगितले जाते. या दिवशी बहिणी भावाला ओवाळून त्याच्या कपाळावर टिळा लावते. हा टिळा त्याचे मृत्यूपासून तसेच जन्म आणि मरणाच्या चक्रातून संरक्षण करतो, असे मानले जाते. रक्षाबंधनात बहीण भावाकडून संरक्षणाचे वचन घेते, पण भाऊबीजमध्ये ती आपल्या भावाचे आयुष्य वाढण्यासाठी प्रार्थना करते, अशी कथेत नोंद आहे.
रक्षाबंधन आणि भाऊबीजमधील सांस्कृतिक फरक
जमशेदपूर येथील भारतीय ज्योतिष अध्यात्म परिषदेचे अध्यक्ष डॉ. रमेश कुमार उपाध्याय सांगतात, “आज राखी पौर्णिमेचा सण हा धार्मिक कारणांपेक्षा सांस्कृतिक कारणांमुळे खूप लोकप्रिय झाला आहे. राजपूत राणी कर्णावतीने मुघल बादशहा हुमायूनला राखी पाठवून आपल्या रक्षणाची मागणी केल्याची कथा प्रसिद्ध आहे. जरी इतिहासात याचा ठोस पुरावा नसला तरी या कथेतून राखी मुघल राजवटीतही लोकप्रिय होती हे दिसून येते. ब्रिटिशांनी बंगालचे विभाजन करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा लोकांनी एकमेकांना राखी बांधून एकतेचा संदेश दिला होता. चित्रपटांनीही राखीला लोकप्रिय करण्यात मोठा हातभार लावला. त्याशिवाय मुलींचे लग्न झाल्यानंतर तिला भाऊबीज आणि राखी पौर्णिमेच्या सणानिमित्त माहेरी जावे लागत असल्याने या सणाला अधिकच लोकप्रियता मिळाली.”
हिंदू धर्मातील टिळा आणि दोऱ्याचे महत्त्व
हिंदू सणांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूला विशिष्ट धार्मिक आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. राखीतील दोरा हा कुटुंबाशी असलेल्या नात्याचा आणि कर्तव्याच्या बंधनाचा प्रतीक मानला जातो. एखादी व्यक्ती जर सर्व जबाबदाऱ्यांमधून मुक्त होऊन संन्यास घेत असेल तर त्याला दोऱ्याचे बंध तोडावे लागतात, त्यामुळे दोरा हा भारतीय संस्कृतीत अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. इतकेच नव्हे तर सुफी संतांच्या दरगाहांवर मुस्लीम भक्तदेखील इच्छापूर्तीसाठी दोरे बांधतात, यावरून त्याचे महत्त्व कळते. दौऱ्याबरोबरच टिळाही सामाजिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. देवाची पूजा झाल्यानंतर काही हिंदू लोक स्वत:च्या कपाळावर आजही चंदनाचा टिळा किंवा भस्म लावतात. युद्धावर किंवा रणभूमीवर जाण्यासाठी पूर्वी अनेक महिला त्यांच्या पतीच्या कपाळावर कुंकवाचा टिळा लावत होत्या. आजही काही कामानिमित्त बाहेर जायचे झाल्यास ही परंपरा पाहायला मिळते.
