Diwali Laxmi Poojan 2025 Lakshmi with elephants: पुढील वर्षभर घरात सुख, समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजन मोठ्या भक्तिभावाने केले जाते. काळाच्या ओघात देवीच्या प्रतिमांमध्ये अनेक बदल झालेले असले, तरी पारंपरिकरित्या कमळात बसलेली किंवा उभी असलेली आणि बाजूला दोन गज असलेली लक्ष्मीची प्रतिमा पूजण्याची परंपरा आहे. अशाचं स्वरूपाचं राजा रवीवर्म्यांनी रेखाटलेलं लक्ष्मीच चित्र भारतीय जनमानसाच्या मनावर कायमचं कोरलं गेलं आहे. या चित्रात देवीच्या बाजूला असलेले हे दोन्ही गज म्हणजे हत्ती देवीवर सतत जलाअभिषेक करताना दिसतात. या हत्तींच्या पूजेला भारतीय संस्कृतीत अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. म्हणूनच जाणून घेऊया, हत्तींची पूजा का केली जाते? त्यामागचा इतिहास काय?
दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीचा वास हा पृथ्वीवर असतो, अशी धारणा आहे. लक्ष्मी ही संपत्ती, समृद्धी आणि सृजनतेची देवी मानली जाते. ज्यावेळी लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला हत्ती असतात, त्यावेळी त्या रुपाचे वर्णन गजलक्ष्मी असे करण्यात येते. कोकणात प्रामुख्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात गजलक्ष्मी ही भावई, भावकाई अशा वेगवेगळ्या नावांनी विराजमान झाली आहे. ती अनेकांची कुलस्वामिनीदेखील आहे. अष्टलक्ष्मींपैकी एक असलेल्या या गजलक्ष्मीला राजसत्तेची शक्ती देणारे रूप मानले जाते. म्हणूनच संपत्ती, समृद्धीसाठी गजलक्ष्मीची उपासना केली जाते.
प्रतिमा आणि प्रतिकात्मकता
- गजलक्ष्मी ही समुद्रमंथनातून प्रकट झाली. तिने प्रकट होताच इंद्राने गमावलेली संपत्ती आणि शक्ती त्याला परत मिळवून दिली, असे लोककथा सांगते.
- ती चतुर्भुज आहे आणि रक्त वस्त्र परिधान करते. तिच्या दोन हातात कमळ असते तर इतर दोन हात अभय आणि वरद मुद्रेत असतात.
- तिच्या दोन्ही बाजूंना दोन गज असतात. लक्ष्मीवर हे दोन्ही गज सोंडेने किंवा कलशातून अभिषेक करत असतात.
- हा अभिषेक म्हणजे कृषी समृद्धीसाठी आणि जीवननिर्वाहासाठी आवश्यक अशा पोषक पावसाचे प्रतीक मानला जातो.
हत्ती- पावसाच्या पोषणशक्तीचे प्रतीक
- हत्ती हे प्राचीन काळापासून फलदायी पावसाचे प्रतीक मानले गेले आहेत. भारतीय संस्कृतीत त्यांचा संबंध थेट ढगांशी जोडला जातो.
- पुराणकथांमधील संदर्भानुसार आरंभीचे हत्ती पंख असलेले होते आणि ते आकाशात विहार करून पृथ्वीवर पाऊस पाडत असत. मात्र, एका ऋषीच्या ध्यानात व्यत्यय आणल्यामुळे त्यांना पृथ्वीवर राहण्याचा शाप मिळाला. तरीही, त्यांचा ढगांशी असलेला दैवी संबंध कायम राहिला.
- म्हणूनच हत्ती हे शेतीसाठी आणि जीवनासाठी आवश्यक अशा पावसाच्या पोषणशक्तीचे प्रतीक ठरले. त्यामुळे लक्ष्मीच्या प्रतिमेत हत्तींचे असणे ही तिच्या फलप्राप्ती, समृद्धी आणि जीवनदायिनी स्वरूपाचे प्रभावी प्रतीक आहे.

अभिषेकलक्ष्मी
लक्ष्मीचे विशेषतः अभिषेक लक्ष्मीचे प्राचीन रूप सांची आणि भारहूत स्तूपावर दिसते. याची परंपरेची सुरुवात नक्की कधी झाली, हे सांगता येत नाही. या परंपरेची सुरुवात लोकजीवन आणि नागरसंस्कृती यांच्या मिलनातून झाली. लोकसंस्कृती मोठ्या समुदायात विलीन होवून एकसमान सांस्कृतिक रूप आकारास येते, तेच शहरीकरण किंवा नागरीकरण असते असे तज्ज्ञ मानतात. या प्रक्रियेत देवतेचे स्वागत करणारी आणि शुभ ऊर्जा निर्माण करणारी प्रतीकं तयार झाली, त्यात अभिषेक लक्ष्मीचा आकृतिबंधही महत्त्वाचा आहे.

भारतीय संस्कृती आणि हत्ती
भारतीय इतिहासात हत्तींचा नेहमीच राजसत्तेशी संबंध होता. हत्ती हा सामर्थ्य, ऐश्वर्य आणि वैभवाचे प्रतीक मानला जातो. हत्ती हा भारतातील मूळ प्राणी आहे. इ.स.पू. ५०० वर्षांपूर्वीपासून भारतातून हत्ती पर्शियाला निर्यात केले जात असत, तर तिकडून भारतात घोडे आणले जात होते. चंद्रगुप्त मौर्याने ग्रीक सम्राट सेल्यूकसला ५०० हत्ती दिले होते. हत्ती लढाईत अधिक शिस्तबद्ध असतात, त्यांना नियंत्रित करणे सोपे असते, पण तरीही भारतीय राजवटींनी हत्तीला नेहमीच अधिक महत्त्व दिले.

हस्ति-मृग
प्राचीन वैदिक ग्रंथांमध्ये हत्तीला हस्ति-मृग म्हटले आहे. म्हणजेच हातासारख्या सोंडेचा विशेष प्राणी. उत्तर वैदिक काळात हत्तींचे पाळीव प्राण्यांमध्ये रूपांतर झाले. ब्राह्मण ग्रंथांमध्ये अंग देशाचा राजा विधी करणाऱ्यांना हत्ती भेट देतो, असा उल्लेख आहे. बिहारमधील बाराबर लेणीच्या प्रवेशद्वारांवर हत्तींची कोरीव शिल्पं आढळतात. या लेणी मौर्य राजांनी आजीविक साधूंसाठी खोदल्या होत्या. सिंधू संस्कृतीच्या शिक्क्यांवरही हत्ती आढळतात (संदर्भ: हत्ती… सत्ता, सामर्थ्य आणि कामभावनेचे प्रतीक!: देवदत्त पट्टनायक, लोकसत्ता.कॉम).

‘गज’ म्हणजे शक्ती आणि समृद्धीचे प्रतीक
लक्ष्मीच्या दोन्ही बाजूला उभे असलेले गज केवळ सौंदर्याचा भाग नाहीत, तर ते तिच्या तत्त्वज्ञानाचे सजीव प्रतीक आहेत. त्यांच्या सोंडेतील पाणी हे जीवनदायी पावसाचे रूपक आहे, तर त्यांचे अस्तित्व हे सामर्थ्य, वैभव आणि फलप्राप्तीची साक्ष आहे. म्हणूनच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी गजांची पूजा म्हणजे केवळ संपत्तीची नव्हे, तर निसर्गाशी सुसंवाद, श्रमाचे महत्त्व आणि पृथ्वीच्या पोषणचक्राबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा विधी आहे. या दिवशी जेव्हा आपण देवी लक्ष्मीची आणि तिच्या गजांची पूजा करतो, तेव्हा आपण केवळ धन आणि वैभवाचीच नव्हे, तर निसर्ग, पाऊस, शेती, आणि जीवनाच्या अखंड प्रवाहाचीही स्तुती करतो. ज्यामुळे घराघरात सुख, समाधान आणि समृद्धी नांदते, असा भारतीयांचा लोकविश्वास आहे.

