अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची दुसऱ्यांदा सूत्रे हाती घेतल्यापासून डोनाल्ड ट्रम्प सातत्याने चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. मागील काही दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबाबत समाजमाध्यमांवर दावे प्रतिदावे केले जात आहेत. दोन आठवड्यांपूर्वी अमेरिकेत ट्रम्प यांच्या मृत्यूची अफवा पसरली होती. जवळपास एक लाखांहून अधिक लोकांनी ‘ट्रम्प इज डेड’ अशा आशयाच्या पोस्ट ‘एक्स’वर केल्या होत्या. मात्र, दुसऱ्याच दिवशी ते व्हर्जिनियातील एका मैदानावर गोल्फ खेळताना दिसून आल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला. हे प्रकरण ताजं असताना आता ट्रम्प यांना अर्धांगवायूचा झटका आल्याची नवी आवई अमेरिकेत उठली आहे. एका व्हायरल व्हिडीओवरून अमेरिकन लोकांनी हा अंदाज बांधला आहे. नेमकं काय आहे या व्हिडीओत? ते जाणून घेऊ…
डोनाल्ड ट्रम्प यांना खरंच अर्धांगवायूचा झटका आला?
अमेरिकेतील ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याला गुरुवारी (तारीख ११ सप्टेंबर) २४ वर्ष पूर्ण झाली. या हल्ल्यात शहीद झालेल्या लोकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पेंटागॉनमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डोनाल्ड ट्रम्प हेदेखील कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी त्यांच्या चेहऱ्याचा एक भाग असामान्य असल्याचं दिसून आलं. यादरम्यान व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे ट्रम्प यांना अर्धांगवायूचा झटका आला असावा, अशी आवई समाजमाध्यमांवर उठली. एका वापरकर्त्याने लिहिले, “ट्रम्प यांना स्ट्रोक आला आहे का? कारण त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे तशीच लक्षणे दिसून येत आहेत.” तर दुसऱ्या एका वापरकर्त्याने दावा केला की, ट्रम्प यांना काही दिवसांपूर्वीच अर्धांगवायूचा सौम्य झटका आला होता, त्यामुळेच ते सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर होते. त्यांनी रुग्णालयात उपचार घेतले असून आता त्यांची प्रकृती बरी आहे.
अमेरिकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी काय म्हटलं?
व्हायरल झालेल्या व्हिडीओनंतर अमेरिकेतील एका वैद्यकीय अधिकाऱ्यानेही ट्रम्प यांच्या प्रकृतीबाबत भाष्य केलं आहे. “ट्रम्प यांना खरंच अर्धांगवायूचा झटका आला आहे का याची कुठलीही माहिती माझ्याकडे नाही, पण व्हिडीओत त्यांच्या चेहऱ्याचा भाग एका बाजूला झुकलेला दिसून येत आहे. हे खरोखरच धोक्याचे लक्षण असून त्यांनी तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यायला हवा”, असं या अधिकाऱ्याने म्हटलं आहे. “स्ट्रोकदरम्यान मेंदूच्या काही भागांना रक्तपुरवठा थांबतो. जर डाव्या बाजूच्या मेंदूला पुरवठा खंडित झाला, तर चेहऱ्याच्या उजव्या बाजूला शिथिलपणा येऊ शकतो,” असंही ते म्हणाले. ‘MeidasTouch’ या पॉडकास्टचे होस्ट बेन मेसेलास यांनीही यावर आपले मत मांडले. “पेंटागॉनमधील समारंभात ट्रम्प यांचा चेहरा खरोखरच वाकडा झालेला दिसून येत होता. ते अतिशय गोंधळलेले वाटत होते आणि आपण कुठे आहोत हेच कदाचित त्यांना माहिती नसावे.”
आणखी वाचा : Nepal India Merger : नेहरूंनी खरंच नेपाळच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव नाकारला होता का? या दाव्यामागील सत्य काय?
ट्रम्प यांचा तो व्हिडीओ बनावट?
दुसऱ्या एका वापरकर्त्यानेही अशीच चिंता व्यक्त केली. “पेंटागॉन येथील कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प यांचा चेहऱ्याचा भाग स्पष्टपणे उजव्या बाजूने झुकलेला दिसून येत होता. ही अर्धांगवायूची लक्षणे असून त्यांनी त्वरीत रुग्णालयात दाखल होऊन वैद्यकीय उपचार घ्यायला हवे,” अशी विनंती या वापरकर्त्याने केली. दरम्यान, ट्रम्प यांचा हा व्हिडीओ एआयद्वारे तयार करण्यात आल्याचा आरोप त्यांच्या समर्थकांनी केला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची प्रकृती ठणठणीत असून ते आपला कार्यकाळ पूर्ण करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रकृतीविषयी समाजमाध्यमांवर दावे प्रतिदावे केले जात असताना व्हाईट हाऊसने मात्र यावर कुठलेही स्पष्टीकरण दिले नाही, त्यामुळेच या चर्चांना आणखीच हवा मिळाली आहे.
हातावरील जखमा आणि सूजलेल्या टाचांचे फोटो
याआधीही डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्यावरून प्रश्न उपस्थित झाले होते. गेल्या महिन्यात दक्षिण कोरियाचे अध्यक्ष ली जे म्युंग यांची ओव्हल ऑफिसमध्ये भेट घेताना ट्रम्प यांच्या उजव्या हातावर जखम दिसून आली. माध्यमांसमोर त्यांनी ही जखम झाकून ठेवण्याचा प्रयत्नही केला. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प दिवसभर अनेकांशी हस्तांदोलन करीत असल्याने ही जखम झाली आहे, असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हिट यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. ट्रम्प यांच्या वैद्यकीय सल्लागार डॉ. सीन बार्बाबेला यांनीही अधिकृत पत्रात या जखमेबाबत स्पष्टीकरण दिलं होतं. ‘ट्रम्प हे वारंवार हस्तांदोलन करीत असल्याने त्यांना झालेली ही किरकोळ समस्या आहे, असं बार्बाबेला म्हणाल्या होत्या. ट्रम्प यांच्या आरोग्यावर लक्ष वेधले जाण्याची ही पहिली वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला त्यांचे पायाच्या टाकेवर सूज आल्याचे फोटो व्हायरल झाले होते.
हेही वाचा : सैनिकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; काय आहे ‘माऊस फीवर’? रशियन सैनिकांमध्ये कसा पसरतोय हा आजार?
‘द सिम्पसन्स’ची भविष्यवाणी पुन्हा चर्चेत
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोग्याबाबत समाजमाध्यमांवर तर्कवितर्क सुरू असताना ‘द सिम्पसन्स’ या व्यंगचित्राचे निर्माते मॅट ग्रोइनिंग यांचं जुनं वक्तव्य पुन्हा चर्चेत आलं आहे. जुलैमध्ये सॅन दिएगो कॉमिक-कॉनमध्ये या मालिकेच्या ३७ व्या सीझनच्या प्रचारावेळी ग्रोइनिंग यांनी गमतीत म्हटलं होतं की, “मला खरं तर वाटलं होतं की ३६व्या सीझननंतर मालिका संपेल; पण अजून शेवट दिसत नाही. जोपर्यंत कोणीतरी मरत नाही, तोपर्यंत ही मालिका चालूच राहील. तुम्हाला माहिती असलेल्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर लोक रस्त्यावर नाचतील; पण राष्ट्राध्यक्ष व्हान्स त्या नाचण्यावर बंदी घालतील.” ग्रोइनिंग यांचा रोख अत्यप्रत्यक्षरित्या डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडेच होता. दरम्यान, ‘द सिम्पसन्स’ या मालिकेचा डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दलच्या अनेक भविष्यावाणीचा एक गूढ इतिहास आहे. २००० साली प्रसारित झालेल्या एका भागात रिपब्लिकन नेते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतील असं दाखवण्यात आलं होतं, जे नंतर प्रत्यक्षात खरं ठरलं.