US student visa changes अमेरिकेत स्थलांतरीतांविरोधात मोठे बदल करण्यात येत आहेत. ट्रम्प यांनी आतापर्यंत अनेक बेकायदा स्थलांतरितांना अमेरिकेतून हद्दपार केलं आहे. त्याचा मोठा फटका भारतीयांनाही बसत आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासन आता विद्यार्थी व्हिसासाठी एक निश्चित मुदत लागू करण्याचा विचार करत आहे. या बदलामुळे विद्यार्थ्यांच्या अमेरिकेतील वास्तव्यावर एक विशिष्ट कालावधीची मर्यादा येईल. प्रस्तावित नियमांनुसार, आता आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी निश्चित मुदतीचे एफ-१ आणि जे-१ व्हिसा असतील. या नव्या बदलामुळे ४.२ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थ्यांसह हजारो आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. नेमके काय बदल करण्यात येणार आहेत? या व्हिसा नियमांतील बदलांचा भारतीय विद्यार्थ्यांवर काय परिणाम होणार? त्याविषयी जाणून घेऊयात.

अमेरिकेचे विद्यार्थी व्हिसा नियम

सध्या, अमेरिका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात (Course) नोंदणीकृत असेपर्यंत देशात राहण्याची परवानगी देते. मात्र, ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ (DHS) आता वेळमर्यादा लागू करण्याचा विचार करत आहे. प्रस्तावित नियमांनुसार, अभ्यासक्रमाचा कालावधी गृहीत धरला जाणार नाही आणि विद्यार्थ्यांसाठी राहण्याचा कालावधी निश्चित असेल. जर त्यांचा अभ्यासक्रम त्या वेळेपेक्षा जास्त असेल, तर त्यांना व्हिसाची कालमर्यादा वाढवण्यासाठी (Extension) अर्ज करावा लागेल. व्हाईट हाऊसने या प्रस्तावित नियमाचे पुनरावलोकन केले असून, लवकरच तो लागू करण्याची तयारी केली जात आहे.

अमेरिका आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमात (Course) नोंदणीकृत असेपर्यंत देशात राहण्याची परवानगी देते. मात्र, ‘डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरिटी’ (DHS) आता वेळमर्यादा लागू करण्याचा विचार करत आहे. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

अमेरिकेच्या विद्यार्थी व्हिसा नियमांमधील बदलाचा भारतीय विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर कसा परिणाम होईल?

अमेरिकेच्या विद्यार्थी व्हिसा नियमांमध्ये बदल झाला, तर अनेक वर्षे पदवीचे (Multi-year degrees) शिक्षण घेणार्‍या किंवा रिसर्च करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अडचणी निर्माण होऊ शकतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासादरम्यान व्हिसाचे नूतनीकरण (Renewal) करणे भाग पडेल. त्यामुळे प्रशासकीय कामाचा ताण वाढेल आणि अमेरिकेतील त्यांच्या शिक्षणात व्यत्यय निर्माण होईल. २०२४ पर्यंतच्या आकडेवारीनुसार ४.२ लाखांहून अधिक भारतीय विद्यार्थी अमेरिकेतील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम व्हिसाच्या मर्यादेपेक्षा जास्त असल्यास निश्चित मुदतीच्या व्हिसामुळे त्यांच्या शिक्षणात व्यत्यय येऊ शकतो. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाचा कालावधी वाढवण्यासाठी अर्ज करावा लागेल आणि ही प्रक्रिया किचकट व वेळखाऊ असू शकते, तसेच त्यासाठी अतिरिक्त कायदेशीर किंवा सरकारी खर्च येऊ शकतो. याचा विशेषतः STEM (विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित) कार्यक्रमांमधील विद्यार्थ्यांना फटका बसेल.

भारतीय विद्यार्थ्यांना अमेरिकेतील अधिकृत दूतावास (US consulate) आणि विद्यापीठांच्या सूचनांवर बारकाईने लक्ष ठेवावे लागेल. त्यांना अभ्यासक्रमाच्या मध्येच व्हिसाच्या नूतनीकरणासाठी अतिरिक्त वेळ द्यावा लागेल आणि खर्चही करावा लागेल. त्यांना वेळखाऊ प्रक्रिया, कायदेशीर त्रुटी व कामात व्यत्यय, अशा समस्यांना सामोरे जावे लागू शकते. दरम्यान, हा प्रस्ताव लवकरच ‘फेडरल रजिस्टर’मध्ये ३० ते ६० दिवसांच्या सार्वजनिक प्रतिक्रियांच्या नोंदणीसाठी प्रकाशित होण्याची शक्यता आहे. सार्वजनिक मतांचा विचार करून अंतिम नियम जारी करण्यापूर्वी मसुद्यात बदल करण्यात येऊ शकतो.

अमेरिकेतील उच्च शिक्षण क्षेत्र आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. हे विद्यार्थी अमेरिकेत केवळ शैक्षणिकच नव्हे, तर आर्थिक योगदानदेखील देतात. विश्लेषकांनी असा इशारा दिला आहे की, निश्चित मुदतीच्या व्हिसाकडे वळल्यास अमेरिकेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होऊ शकते. विशेषतः संशोधन कार्यक्रमांसाठी अमेरिकेत जाणारे भारतीय विद्यार्थी इतर पर्याय शोधू शकतात. या बदलामुळे ‘ड्युअल-इन्टेंट व्हिसा’ किंवा ‘ग्रीन-कार्ड’ (green-मिळवण्याचे सोपे मार्ग यांसारख्या पर्यायांवर चर्चा वाढण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांच्या बदललेल्या धोरणामुळे विद्यार्थी संख्या घटली

अमेरिकन स्टुडंट व्हिसाची संख्या घटली असून, मार्च ते मे या कालावधीत जारी केलेल्या एफ-१ व्हिसाची संख्या करोनानंतर पहिल्यांदाच सर्वांत जास्त घटली आहे. तसेच मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत २७ टक्के घट नोंदवली गेली आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. ही परिस्थिती अमेरिकन विद्यापीठांमध्ये शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या आधीची आहे.

मार्च ते जुलै हे महिने विद्यार्थ्यांसाठी व्यस्त व्हिसा हंगाम असतो. या वर्षी मार्च ते मे या कालावधीत भारतीय विद्यार्थ्यांना ९,९०६ एफ-१ (शैक्षणिक) व्हिसा देण्यात आले आहेत. जे २०२२ च्या या कालावधीपेक्षा (१०,८९४) कमी आहेत. कोविडनंतर जेव्हा आंतरराष्ट्रीय प्रवास सुरू झाला होता, तेव्हा २०२३ मध्ये याच कालावधीत एकूण १४,९८७ आणि २०२४ मध्ये १३,४७८ एफ-१ व्हिसा देण्यात आले होते. ट्रम्प प्रशासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांवर केलेल्या कारवाईमुळे आणि याबाबत घेतलेल्या भूमिकेनंतर ही संख्या घटल्याचं सांगितलं जात आहे.

अमेरिकन संस्थांमध्ये शिक्षण घेताना अभ्यासक्रम सोडला, तर भविष्यातील व्हिसासाठी पात्रता गमावू शकता, असाही इशारा अमेरिकन दूतावासाने मे महिन्यात आपल्या एक्स पोस्टममधून दिला होता. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये, भारतातील अमेरिकन दूतावासाने विद्यार्थ्यांना त्यांच्या व्हिसाच्या अटींचे पालन करण्यास आणि कोणत्याही समस्या टाळण्यासाठी त्यांचा विद्यार्थी दर्जा कायम ठेवण्यास सांगितले. “जर तुम्ही शैक्षणिक संस्थांना न कळवता अभ्यासक्रम सोडला, लेक्चर्सना बसला नाहीत किंवा तुमचा अभ्यासक्रम सोडला, तर तुमचा विद्यार्थी व्हिसा रद्द केला जाऊ शकतो आणि भविष्यातील अमेरिकन व्हिसासाठी तुम्ही पात्रता गमावू शकता. तुमच्या व्हिसाच्या अटींचे नियमित पालन करा आणि कोणत्याही समस्या टाळण्यासाठी तुमचा विद्यार्थी दर्जा कायम ठेवा”, असे पोस्टमध्ये म्हटले होते.