या जादा आयात शुल्काच्या आकारणीमुळे जागतिक पातळीवर व्यापार तणाव निर्माण झाला आहे. याच वेळी अमेरिकेत देशांतर्गत पातळीवर त्याचे विपरीत परिणाम दिसून येऊ लागले आहेत. अमेरिकेचे हे पाऊल स्थानिक पातळीवर महागाई वाढविणारे ठरू लागले आहे.
जादा आयात शुल्क का?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जगभरातून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर टॅरिफ म्हणजेच अतिरिक्त आयात शुल्क आकारणी सुरू केली आहे. यामुळे इतर देशांतील स्वस्त माल अमेरिकेत येण्यापासून रोखला जाणार आहे. याचबरोबर अमेरिकेतील निर्मिती क्षेत्राला गती मिळून रोजगार निर्मिती होईल, असा त्यांचा होरा आहे. इतर देशांतून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर जादा आयात शुल्क आकारल्याने त्यांची किंमत वाढणार आहे. त्यातून बाहेरील महागड्या वस्तूंऐवजी तेथील नागरिक अमेरिकी वस्तूंच्या खरेदीला प्राधान्य देतील. यातून अमेरिकी वस्तूंना मागणी वाढून उद्योगांची निर्मिती क्षेत्रात गुंतवणूक वाढेल, असे ट्रम्प यांचे गणित आहे. अमेरिकेचा जगभरातील देशांसोबत व्यापार असून, अनेक देशांसोबत व्यापारी तूट खूप मोठय़ा प्रमाणात आहे. ही व्यापारी तूट कमी करण्यावरही ट्रम्प यांचा प्रामुख्याने भर आहे. हे देश एक प्रकारे अमेरिकेची लूट करीत आहेत, असा त्यांचा दावा आहे.
सर्वाधिक शुल्क कोणावर?
अमेरिकेचे सरासरी आयात शुल्क या वर्षाच्या सुरुवातीला अडीच टक्के होते. हे सरासरी आयात शुल्क आता १८ टक्क्यांवर पोहोचले आहे. अमेरिकेने सर्वाधिक ५० टक्के आयात शुल्क भारत आणि ब्राझीलवर लादले आहे. भारताने रशियाकडून खनिज तेल खरेदी केल्याप्रकरणी आकारलेल्या २५ टक्के दंडात्मक शुल्काचाही आयात शुल्कात समावेश आहे. अमेरिकेने दक्षिण आफ्रिकेवर ३० टक्के, व्हिएतनामवर २० टक्के, जपानवर १५ टक्के आणि दक्षिण कोरियावर १५ टक्के आयात शुल्क आकारले आहे. याच वेळी चीन, कॅनडा आणि मेक्सिको या देशांनी अमेरिकेवरही ‘जशास तसे’ आयात शुल्क लावल्याने या देशांशी सध्या चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत.
अमेरिकेत महागाईत वाढ?
अमेरिकेने आयात शुल्कात वाढ केल्याने तेथे वस्तूंच्या किमतीत वाढ होऊ लागली आहे. इतर देशांतून येणाऱ्या वस्तू आणि कच्चा माल जास्त किमतीत खरेदी करावा लागत असल्याने कंपन्यांकडून याचा भार ग्राहकांवर टाकला जात आहे. अमेरिकेतील महागाईची पातळी सध्या उच्चांकी पातळीच्या खाली असली तरी त्यात आगामी काळात मोठी वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात कपडय़ांच्या किमतीत ०.५ टक्के आणि किराणा मालाच्या किमतीत ०.६ टक्के वाढ झाली आहे. त्यात आयात शुल्कामुळे परिणाम झालेल्या उत्पादनांच्या किमतीत वाढ होत आहे. याच वेळी ट्रम्प यांच्या स्थलांतरितविरोधी धोरणामुळेही महागाईत वाढ होत आहे. अमेरिकेने खाद्यवस्तू व कृषी क्षेत्रातील बेकायदा स्थलांतरित कामगारांची त्यांच्या मायदेशी हकालपट्टी सुरू असल्यामुळे या क्षेत्रावर परिणाम होऊन खाद्यवस्तूंच्या किमती वाढत आहेत.
फटका कोणाला?
अमेरिकेत दैनंदिन वापराच्या वस्तूंच्या किमती वाढत असल्या तरी त्याचा होणारा परिणाम वर्गनिहाय वेगवेगळा दिसत आहे. आयात शुल्क वाढीचा थेट परिणाम होणाऱ्या वस्तूंच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना अधिक फटका बसत आहे. या कुटुंबांना आता दैनंदिन वस्तूंवर त्यांच्या आर्थिक ताळेबंदापेक्षा जास्त खर्च करावा लागत आहे. घरगुती उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्ससह इतर रोजच्या वापरातील वस्तू आयात शुल्कातील वाढीमुळे महाग होत आहेत. श्रीमंत वर्गावर याचा फारसा परिणाम होताना दिसत नाही. मात्र, अल्प व मध्यम उत्पन्न गटातील कुटुंबांना हा खर्च पुढील काळात पेलवेनासा होईल, असा इशारा अर्थतज्ज्ञांनी दिला आहे.
मध्यम वर्गाचे कंबरडे मोडणार?
अमेरिकेत गेल्या वर्षी केवळ जास्त उत्पन्न असलेल्या कुटुंबांच्या उत्पन्नात वाढ नोंदविण्यात आली होती. याच वेळी अल्प व मध्यम उत्पन्न कुटुंबांच्या उत्पन्नात फारसा बदल झालेला नाही, असे तेथील जनगणना विभागाची आकडेवारी दर्शविते. बोस्टन फेडरल रिझव्र्हने गेल्या महिन्यात केलेल्या संशोधनातील निष्कर्षही महत्त्वाचे आहेत. अल्प व मध्यम उत्पन्न कुटुंबांच्या क्रेडिट कार्डमधील कर्जात वाढ झाली आहे, असे हे संशोधन सांगते. ही वाढ करोना संकटाच्या वेळी असलेल्या कर्जाच्या पातळीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे ट्रम्प यांचे अतिरिक्त आयात शुल्काचे पाऊल अमेरिकेत महागाई निर्माण करणारे आणि तेथील मध्यम वर्गाचे कंबरडे मोडणारे ठरण्याचे चिन्ह आहे.
sanjay.jadhav@expressindia.com
