Chhattisgarh Liquor Policy Scam News : छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश सिंह बघेल यांचे पुत्र चैतन्य बघेल यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी (तारीख १८ जुलै) अटक केली. सुमारे दोन हजार १६१ कोटी रुपयांच्या कथित मद्य धोरण घोटाळा प्रकरणात ही अटक करण्यात आली आहे. शुक्रवारी चैतन्य यांना रायपूर येथील विशेष न्यायालयात हजर केलं असता त्यांना पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. काही महिन्यांपूर्वी ईडीने या प्रकरणात १४ ठिकाणी छापेमारी केली होती, ज्यामध्ये बघेल कुटुंबीयांच्या भिलाई येथील निवासस्थानाचा समावेश होता. आता थेट माजी मुख्यमंत्र्याच्या मुलालाच अटक झाल्याने राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? चैतन्य बघेल ईडीच्या रडारवर नेमके कसे आले? त्या संदर्भातील घेतलेला हा आढावा…
मद्य धोरण घोटाळ्याचं प्रकरण नेमकं काय?
हा कथित घोटाळा २०१९ ते २०२२ या कालावधीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील छत्तीसगड सरकारच्या काळात घडल्याचा आरोप आहे. ईडीच्या तपासानुसार, राज्यातील काही वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, राजकीय नेते आणि मद्य विभागाचे अधिकारी यांनी मिळून एक समांतर उत्पादन व्यवस्था तयार केली होती. या व्यवस्थेद्वारे राज्यातील दारू सामान्य नागरिकांना विकली जात होती, मात्र त्यातून मिळणारा महसूल अधिकृतपणे सरकारकडे जमा होत नव्हता. या गैरव्यवहारामुळे सरकारच्या तिजोरीत सुमारे दोन हजार १६१ कोटी रुपयांची तूट निर्माण झाल्याचं निदर्शनास आलं.
मद्य धोरणाचं हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखा (EOW) आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) एप्रिल २०२४ मध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर ईडीने याच आधारे ECIR (Enforcement Case Information Report) नोंदवून पुढील तपास सुरू केला. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये माजी उत्पादन शुल्क मंत्री कवासी लखमा, घोटाळ्याचे कथित सूत्रधार अन्वर ढेबर (रायपूरचे माजी महापौर व काँग्रेस नेते एजाज ढेबर यांचे बंधू), तसेच माजी आयएएस अधिकारी अनिल तुतेजा आणि अरुण पती त्रिपाठी (त्यावेळी वाणिज्य व उद्योग विभागाचे विशेष सचिव आणि छत्तीसगड मार्केटिंग कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक) यांचा समावेश आहे.
आणखी वाचा : विश्लेषण : डायनॉसॉरसारख्या महाकाय पक्ष्याचे पुनरुज्जीवन? काय आहे ‘जायंट मोआ प्रोजेक्ट’?
चैतन्य बघेल ईडीच्या रडारवर कसे आले?
- या घोटाळ्याशी संबंधित एफआयआरमध्ये माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल किंवा त्यांचे पुत्र चैतन्य बघेल यांची नावं थेटपणे नमूद करण्यात आलेली नाहीत.
- या वर्षी मार्चमध्ये ईडीने पहिल्यांदाच भिलाई (जिल्हा दुर्ग) येथील बघेल यांच्या निवासस्थानी छापेमारी करून कथित घोटाळ्यासंदर्भात चौकशी सुरू केली.
- ईडीच्या मते, या प्रकरणातील अटकेत असलेले लक्ष्मीनारायण बंसल ऊर्फ पप्पू यांच्या जबाबातून चैतन्य बघेल यांचे नाव समोर आले.
- पप्पू यांनी ईडीला दिलेल्या जबाबात सांगितलं की, चैतन्य बघेल यांच्या सांगण्यावरूनच त्यांनी या घोटाळ्यातील रकमेचे व्यवस्थापन केले होते.
- अन्वर ढेबर यांच्याकडून पैसे जमा केल्यानंतर दीपेन चौधा यांच्या मध्यस्थीने ते काँग्रेसचे माजी कोषाध्यक्ष रामगोपाल अग्रवाल यांच्याकडे दिले जात होते, असं पप्पू यांनी ईडीला सांगितलं.
- चैतन्य यांच्या आदेशानंतरच के. के. श्रीवास्तव यांना मी ८० ते १०० कोटी रुपयांची रक्कम दिली, असा दावाही पप्पू यांनी केला.
‘विठ्ठल ग्रीन प्रोजेक्ट’मध्ये काळ्या पैशांचा वापर?
मद्य घोटाळ्यातील लाटलेला पैसा हा चैतन्य बघेल यांच्या ‘बघेल डेव्हलपर्स’ या कंपनीमार्फत ‘विठ्ठल ग्रीन प्रोजेक्ट’च्या उभारणीसाठी वापरला गेला, असा आरोप ईडीने केला आहे. या प्रकल्पाशी संबंधित एका साक्षीदाराने ईडीला सांगितले की, प्रकल्पाचा मूळ खर्च १३ ते १५ कोटी रुपये होता, मात्र कागदोपत्री तो केवळ ७.१४ कोटी दाखवण्यात आला. म्हणजेच हेतुपुरस्सर खर्च कमी दाखवून आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. दरम्यान, ईडीच्या म्हणण्यानुसार या प्रकरणातील आरोपींपैकी एक त्रिलोक सिंग ढिल्लन यांनी ‘बघेल डेव्हलपर्स’ या चैतन्य यांच्या कंपनीला कर्मचाऱ्यांसाठी १९ फ्लॅट्स खरेदी करण्यासाठी जवळपास पाच कोटी रुपये दिले. याशिवाय, एका ज्वेलर्स कंपनीने चैतन्य यांना ४.५ कोटी रुपयांचे थकीत कर्ज दिले असून, त्याच कंपनीने ‘बघेल डेव्हलपर्स’कडून ८० लाख रुपयांचे सहा भूखंडही खरेदी केले आहेत. ईडीने असाही दावा केलाय की, या घोटाळ्यातून एकूण १६.७ कोटी रुपयांची रक्कम चैतन्य बघेल यांना मिळाली आहे.

चैतन्य बघेल यांच्या वकिलांनी काय सांगितलं?
चैतन्य बघेल यांचे वकील फैसल रिजवी यांनी ईडीचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच त्यांच्यावर सुरू असलेली कारवाई ही राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा केला आहे. त्यांनी सांगितले की, ही चौकशी २०२२ पासून सुरू आहे. या कालावधीत ईडीने न्यायालयात चार आरोपपत्रे दाखल केली; पण एकातही चैतन्य बघेल यांचे नाव नव्हते. ते पुढे म्हणाले, “यावर्षी १० मार्च रोजी चैतन्य यांच्या घरी पहिला छापा टाकण्यात आला, परंतु मनी लॉन्ड्रिंग कायद्यांतर्गत ईडीने त्यांना कधीही समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावले नाही, त्यामुळे हे आरोप संशयास्पद आणि केवळ राजकीय प्रेरणेतून केले गेलेले आहेत.” फैसल रिजवी यांनी असा युक्तिवाद केला की, चैतन्य यांना केवळ पप्पू बंसल यांच्या जबाबाच्या आधारे अटक करण्यात आली आहे. “ईडीने चैतन्य यांना एकदाही विचारले नाही की पप्पू बंसल यांचे आरोप खरे आहेत का? बंसल यांचा जबाब दबावाखाली घेतला गेला असावा, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा : पाकिस्तान-चीन सीमेवर ‘एके-२०३’ रायफल ठरणार ‘गेमचेंजर’? ‘आत्मनिर्भर भारत’ मालिकेत आणखी एक सुवर्णाध्याय?
मुलाला अटक झाल्यानंतर माजी मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
दरम्यान, माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, त्यांच्या मुलाला कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा चौकशी न करता अटक करण्यात आली. त्यांनी ही अटक पूर्णपणे राजकीय हेतूने झाल्याचा आरोप केला आहे. “मी रायगड जिल्ह्यातील अदानींच्या कोळसा प्रकल्पाला विरोध केला म्हणूनच माझ्या मुलाला अटक झाली. ही कारवाई केवळ आम्ही झाडांची कत्तल थांबवण्याचा मुद्दा उपस्थित केला म्हणून झाली आहे,” असं माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय तपास यंत्रणांवरही टीका केली. “पप्पू बंसल यांच्याविरोधात न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे, तरीही ते मोकळे फिरत आहेत आणि विविध कार्यालयांमध्ये निवेदने देत आहेत, त्यामुळे भाजपा सरकार, तपास यंत्रणा व पक्षाचे लोक न्यायालयाचा किती आदर करतात हे स्पष्ट होते,” असं भूपेश बघेल यांनी म्हटलं आहे.