बुलढाणा येथील शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी विधानभवनातील उपाहारगृह चालकाला अन्नाच्या दर्जावरून मारहाण केली. आता या चालकाचा परवाना निलंबित करण्यात आला. तर संतापाची दखल घेत अखेर गायकवाड यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाला. मात्र सत्ताधारी पक्षाच्याच आमदाराने असा कायदा हातात घ्यावा का, हा मुद्दा आहे. यावरून मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली असली तरी, अशा कृत्यांमुळे शिंदे यांच्या पक्षाची यामुळे कोंडी होते. त्याचा परिणाम पक्षाच्या प्रतिमेवर होतो.

संजय गायकवाड यापूर्वीही वादात

गायकवाड यांनी कृत्याबद्दल खेद व्यक्त केला नाही. उलट अनेक वेळा तक्रार करूनही कारवाई होत नव्हती असे त्यांचे म्हणणे आहे. गायकवाड आणि वाद हे समीकरणच बनलेय. सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले होते. अमेरिका दौऱ्यात राहुल गांधी यांनी जातीय आरक्षणावरून विधान केले होते. त्यावर राहुल यांची जीभ छाटणाऱ्यास ११ लाखांचे बक्षीस देऊ अशी घोषणा केली होती. त्यावर गदारोळ झाला. अनेक ठिकाणी गायकवाड यांच्याविरोधात गुन्हे नोंदविण्यात आले. शिवजयंतीच्या मिरवणुकीत काठीने एका तरुणाला मारहाण करण्याची चित्रफीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी समाजमाध्यमावर प्रसारित करत गृहखात्याला सवाल केले होते. याखेरीज एक पोलीस त्यांच्या खासगी वाहनाची स्वच्छता करत होता. ही चित्रफीत प्रसारित होताच, तो स्वेच्छेने करत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. एप्रिलमध्ये महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असल्याचे सांगत त्यांनी पक्षाला अडचणीत आणले होते. मात्र या मुद्द्यावर त्यांनी माफी मागितली. गेल्याच आठवड्यात विरोधी ठाकरे गटाच्या नेत्यांना लक्ष्य करताना महापुरुषांबाबत विधाने केली. त्यावरही टीका झाली. विधानसभेला केवळ ८४१ मतांनी ते विजयी झाले. या निसटत्या विजयानंतर त्यांची नाराजी व्यक्त करणारी चित्रफीत गाजली होती. एकूणच वाद आणि ५८ वर्षीय संजय गायकवाड हे समीकरण बनले.

संजय शिरसाट यांना नोटीस

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते व समाजकल्याण मंत्री संजय शिरसाट हे अनेक वेळा चर्चेत असतात. आता प्राप्तिकर विभागाची नोटीस त्यांना आली आहे. दोन विधानसभा निवडणूक म्हणजे २०१९ व २०२४ यासाठी त्यांनी जे शपथपत्र सादर केले त्यात पुढील निवडणुकीत संपत्तीत वाढ आहे. याखेरीज शिरसाट यांच्या मुलाने छत्रपती संभाजीनगरमधील एक हॉटेल लिलावात कमी दरात घेण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. काही जणांनी तक्रारी केल्याने नोटीस आली असे उत्तर शिरसाट यांनी दिले. एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी शिरसाट यांच्याविरोधात आरोप केले होते.

इतर नेत्यांमुळे वाद

एकनाथ शिंदे यांच्या दृष्टीने सहकाऱ्यांची सततची वादग्रस्त वक्तव्ये अडचणीची ठरतात. त्यात सिल्लोडचे आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचाही समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वादग्रस्त विधान केले होते, त्यावरून त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सत्तार यांच्या मुंबईतील शासकीय निवासस्थानी तोडफोड केली होती. नंतर सत्तार यांनी याबाबत सारवासारव केली. मंत्री असताना सत्तार अनेक वेळा चर्चेत होते. कळमनुरीचे शिंदे यांच्या पक्षाचे संतोष बांगर मोडतोडीमुळे चर्चेत आले. माध्यान्ह भोजन योजनेत खराब अन्न दिल्यावरून एका उपाहारगृहाच्या व्यवस्थापकाला त्यांनी ऑगस्टमध्ये मारहाण केल्याचा प्रकार घडला होता. ऑक्टोबरमध्ये पीक विमा कंपनीच्या कार्यालयात गेल्यावर अधिकारी नसल्याने तोडफोड केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. ज्येष्ठ नेते तानाजी सावंत यांनीही आरक्षणावरून आंदोलन करणाऱ्यांबाबत टीका करणारे वक्तव्य केले होते. बोलण्याच्या ओघात झाले असे सांगत यावर पडदा टाकला होता. रत्नागिरी जिल्ह्यात २०१९ मध्ये एका धरणफुटीला त्यांनी खेकड्यांना जबाबदार धरले होते. त्यावेळी ते मंत्री होते. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मिरा-भाईंदरमध्ये मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्यावरून सरकारबाबत नाराजी व्यक्त केली होती. या मोर्चात सहभागी होण्यासाठी गेले असता त्यांना रोषाचा सामना करावा लागला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पक्षाची कोंडी

संजय गायकवाड यांना कायदेशीर तक्रार करण्याचा मार्ग होता. मारहाण करणे योग्य नाही अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली. मात्र एकूणच पक्ष नेत्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे प्रतिमेला धक्का बसतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या चार महिन्यांत अपेक्षित आहेत. अशा वेळी विरोधकांच्या हाती आयता मुद्दा देऊन पक्षाचे नुकसान होते. आता निवडणुकांचा प्रचार मोठ्या प्रमाणात समाजमाध्यमातून होतो. त्यामुळे अशा चित्रफिती, वादग्रस्त वक्तव्ये यांचा आधार यासाठी घेतला जातो. त्याचा परिणाम पक्षावर निश्चित होतो.