सरकारच्या महत्त्वाकांक्षी सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पांतर्गत बांधल्या जाणाऱ्या संसदेच्या नव्या इमारतीसाठीचा खर्च आता वाढला आहे. काही अतिरिक्त कामांमुळे त्याचा खर्च आता २८२ कोटींनी वाढला आहे. बांधकाम बजेटमध्ये २९ टक्के वाढ झाल्याने, नवीन संसद भवनाचा अंदाजित खर्च १२०० कोटींच्या पुढे गेला आहे. मात्र, नवीन संसद भवनाच्या बांधकामासाठी यापूर्वी ९७७ कोटींचे बजेट निश्चित करण्यात आले होते.
टाटा प्रोजेक्ट्स नवीन संसद भवन बांधत आहे. वर्षभरात सुमारे ४० टक्के काम झाले आहे. २०२० च्या डिसेंबर महिन्यात बांधकाम सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला हे बांधकाम ७५ व्या स्वातंत्र्य दिनापूर्वी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र नंतर त्याची मुदत ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. हे काम सर्वोच्च प्राधान्यावर ठेवून ते पूर्ण करण्यात सरकार व्यस्त आहे. करोना महामारीमुळे इतर अनेक बांधकामांवर बंदी असताना सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पावर मात्र कोणतेही बंधन नाही.
नवीन संसद भवन पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक असेल आणि अद्यावत डिजिटल तंत्रज्ञानावर आधारित काम होईल. एकूण ६४ हजार ५०० चौरस मीटरमध्ये नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ही इमारत ४ मजली असेल. तसेच, नवीन संसद भवनात जाण्यासाठी सहा मार्ग असतील. पंतप्रधान आणि राष्ट्रपतींसाठी एक प्रवेशद्वार असेल. लोकसभेचे सभापती, राज्यसभा अध्यक्ष, खासदारांच्या प्रवेशासाठी एक प्रवेशद्वार आणि दोन सार्वजनिक प्रवेशद्वार असतील.