राखी चव्हाण

कचरा ही भारतातील मोठी समस्या फक्त माणसांसाठीच नाही तर वन्यप्राण्यांसाठी जीवघेणी ठरत आहे. केवळ महाराष्ट्रातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातच नाही तर भारतातील जवळपास सर्वच व्याघ्र प्रकल्पांत प्लास्टिक कचऱ्याची समस्या भेडसावत आहे.

Pet Passport
पाळीव प्राण्यांना परदेशात फिरायला नेताय? मग ‘या’ गोष्टी तुम्हाला माहिती असायलाच हव्यात!
Health Benefits of Avocado
झपाट्याने वजन कमी करणारे हिरव्या रंगाचे ‘हे’ फळ कापण्यापूर्वी स्वच्छ धुवा; तज्ज्ञ म्हणतात, अन्यथा पडेल महागात
feast of snowballs juicy fruits and green fodder for animals at Karunashram Orphanage in Wardha
वन्यप्राणी करताहेत उन्हाळा एन्जॉय! बर्फ के गोले, रसभरीत फळे अन हिरवा चारा यांची मेजवानी
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….

निमढेला बफर क्षेत्रात नेमके काय घडले?

निमढेला बफर क्षेत्रात ‘भानूसिखडी’ या वाघिणीचे १५ महिन्यांचे तीन बछडे रबरी बुटांशी खेळताना वन्यजीवप्रेमी व छायाचित्रकार संदीप गुजर यांना दिसून आले. या क्षेत्रात पर्यटन व्यवस्थापन उत्तम असले तरीही रामदेगी मंदिर आणि बौद्ध स्तूप असल्याने गावातील लोक येथे येत असतात. रामदेगी मंदिराचे व्यवस्थापन पुरातत्त्व विभागाकडे असून बौद्धस्तूपाचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. परिसरात रस्त्याचे काम सुरू आहे. निमढेलाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर सध्या पाणी जाण्यासाठी वाटा तयार करण्यात आल्या आहेत. मजूर काम करत असताना या परिसरात मोठय़ा प्रमाणावर पाऊस सुरू झाला. त्यामुळे काम थांबवून मजूर इतरत्र गेले आणि त्यांचे गमबूट मात्र तिथेच राहिले.

हेही वाचा >>>पंजाब राज्य ३.२७ लाख कोटींच्या कर्जाच्या ओझ्याखाली कसे गेले?

ताडोबातील यापूर्वीच्या घटना कोणत्या?

पर्यटकांचा ओघ अधिक असलेल्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात कधी प्लास्टिक बाटल्या तर कधी प्लास्टिकची वेष्टने आढळतच आहेत. मे २०२३ मध्ये नवेगाव-अलीझंझा बफर क्षेत्रात ‘बबली’ या वाघिणीचे बछडे प्लास्टिकच्या बाटलीशी खेळताना दिसले होते. मुंबई येथील डॉक्टर राहुल महादार यांनी ही छायाचित्रे समाजमाध्यमावर प्रसारित केल्यानंतर खळबळ उडाली होती. डिसेंबर २०२० मध्ये ‘जुनाबाई’ वाघिणीचे बछडे प्लास्टिक पिशवीसोबत खेळताना आढळून आले. जानेवारी २०२१ मध्ये अलीझंझा बफर क्षेत्रात वाघिणीचा बछडा प्लास्टिक बाटली उचलतानाचे छायाचित्र समाजमाध्यमावर आले होते. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात नवेगाव गेट परिसरात रस्त्याचे बांधकाम करताना मजुरांनी झाडाखाली माती टाकण्याचे फायबरचे टोपले ठेवले होते. वाघाने चक्क ते टोपले तोंडात घेऊन धूम ठोकली.

या घटना वारंवार का घडत आहेत?

अनेक व्याघ्र प्रकल्पांत वाघांनी मानवी वर्चस्व असलेल्या भागात किंवा अपुऱ्या संरक्षित जंगलांमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात केली आहे. या ठिकाणी त्यांना मानवी समुदायासोबत अधिवास वाटून घेण्याच्या दबावाचा सामना करावा लागतो. यामुळे अनेक प्रकारचे संघर्ष होऊ शकतात आणि त्यापैकी एक म्हणजे प्लास्टिक. वाघ केंद्रस्थानी असल्याने तो प्लास्टिक चघळताना आढळला तर लवकर उघडकीस येते, पण इतर वन्यप्राणी प्लास्टिक चघळतात, ते उघडकीस येत नाही, एवढाच काय तो फरक असतो.

हेही वाचा >>>वैमानिक आणि क्रू सदस्यांनी परफ्यूम आणि माउथवॉश वापरू नये; निर्बंध घालण्याचे कारण काय?

प्लास्टिकमुक्त व्याघ्र प्रकल्प शक्य आहे?

अनेक व्याघ्र प्रकल्पांत पर्यटकांना प्लास्टिकची पाण्याची बाटली वा तत्सम वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही ‘प्लास्टिकमुक्त ताडोबा’ ही संकल्पना राबवण्यात येत आहे. मात्र, नियम आणि नियमांची अंमलबजावणी या दोन्हीत मोठे अंतर आहे. पर्यटकांजवळ पाण्याच्या प्लास्टिकच्या नसल्या तरी प्लास्टिकच्या वेष्टनात असलेले खाद्यपदार्थ असतातच. सुजाण पर्यटक जंगलात वावरताना संवेदनशील असला तरीही प्रत्येक पर्यटक तसा नसतो. त्यामुळे नियमांची अंमलबजावणीसुद्धा गांभीर्याने करावी लागेल.

इतर राज्यांतील घटना काय?

राजस्थानमधील रणथंबोर येथे सांबर आणि माकड पॉलिथील खाताना आढळले. तमिळनाडूतील वालपराई येथे मकाक नावाने ओळखले जाणारे सिंहासारखा चेहरा असणारे माकड एकेरी वापराचे प्लास्टिक हाताळताना आढळून आले. दुर्गम लडाखमध्ये पक्षी घरटय़ांसाठी गोळा करत असलेल्या साहित्यांमध्ये प्लास्टिकचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे जंगली हत्ती कचऱ्याच्या ढिगाऱ्यात अन्न शोधताना, भाज्यांच्या सालीने भरलेली प्लास्टिकची पिशवी तोंडात पकडून जाताना आढळला. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील गवताळ प्रदेशात लांडगा प्लास्टिकच्या पिशव्या फाडताना दिसून आला. तर महाराष्ट्रात टिपेश्वर अभयारण्यात वाघाचा बछडा प्लास्टिकची बाटली उचलताना आढळला.

हेही वाचा >>>कमी उत्‍पादन होऊनही संत्र्यांचे दर का घसरले?

प्राणी प्लास्टिक खातात तेव्हा काय होते?

चुकून प्लास्टिक खाल्ल्यामुळे अनेकदा प्राण्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिक गिळल्यामुळे त्यांचे पोट भरते आणि यामुळे भुकेची भावना कमी होते. परिणामी ते कमी खातात. त्यामुळे ते कमजोर होतात. प्लास्टिकच्या मोठय़ा तुकडय़ांमुळे त्यांचा ‘गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रॅक’ बंद होऊ शकतो. त्यामुळे प्लास्टिक शरीरातून पुढे जाऊ शकत नाही. त्यातच त्यांचा मृत्यू होतो. प्लास्टिकमुळे दरवर्षी दहा लाख समुद्री पक्षी आणि एक लाख समुद्री सस्तन प्राणी, कासव, मासे मृत्युमुखी पडतात.