सध्या नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दररोज विविध मुद्य्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांविरोधात आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर भूखंड घोटाळ्याचा आरोप करण्यात आल्यानंतर, आज विरोधकांनी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरल्याचे दिसून आले. मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसंच गायरान जमीन एका व्यक्तीला विकल्याचा आरोप आज विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला आहे. यानिमित्त सत्तारांवर नेमके काय आहेत आरोप आणि काय आहे प्रकरण, हे जाणून घेऊयात.

राज्याचे कृषीमंत्री आणि तत्कालीन सरकारमध्ये महसूल राज्यमंत्री असलेले अब्दुल सत्तार यांनी वाशीम शहराला लागून असलेली ३७ एकर गायरान जमीन सत्तेचा दुरुपयोग करून एका व्यक्तीला वाटप केल्याचा प्रकार जनहित याचिकेतून उघड झाला. एका व्यक्तीसाठी मंत्री सत्तार यांनी शासकीय निर्णयाची पायमल्ली करून शासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी वाशीमचे श्याम देवळे, अ‍ॅड. संतोष पोफळे यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली होती. त्यासंदर्भात २२ डिसेंबर रोजी न्यायालयाने त्या आदेशाला स्थगिती दिल्याची माहिती श्याम देवळे यांनी दिली.

वाशीम शहराला लागूनच असलेल्या घोडबाभूळ गाव परिसरात अत्यंत मोक्याची गायरान जमीन आहे. २२ जून २०११ च्या शासन निर्णयानुसार गायरान जमीन कोणत्याही व्यक्तीला विकता येत नाही किंवा कोणत्याही कामासाठी देता येत नाही. मात्र, असे असतानाही तत्कालीन महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी एका व्यक्तीला घोडबाभूळ येथील गायरान जमीन वाटप केल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणाचा श्याम देवळे यांनी सखोल अभ्यास करून ठोस पुरावे सादर केले होते.

अजित पवार काय नेमकं म्हणाले? –

“नागपूर खंडपीठाने कृषीमंत्र्यांविरोधात कडक शब्दात ताशेरे ओढले आहेत. महसूल राज्यमंत्री असताना त्यांनी वाशीम जिल्ह्यातील १५० कोटींची ३७ एकर गायरान जमीन खासगी व्यक्तीला दिली. त्यांनी कायदेशीर बाबींचं उल्लंघन केलं आहे. अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठोस पुरावे आहेत. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला आहे. राज्य सरकार, सुप्रीम कोर्टाचा निर्णय़ माहिती असतानाही एका व्यक्तीला फायदा मिळवून देण्यात आला. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे. त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी,” अशी मागणी अजित पवारांनी केली आहे.

कृषि प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी? –

सिल्लोड कृषि प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला आहे. दरम्यान अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांना रोखत नियमाची आठवण करुन दिली. ३५ ची नोटीस दिल्यानंतर हा विषय आणणं योग्य आहे का अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर अजित पवार म्हणाले की “मी नियमाप्रमाणे जाण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हीदेखील फडणवीस, शिंदे विरोधी पक्षात असताना हे पाहिलं आहे. कोर्टाने ताशेरे ओढलेले असतानाही कृषीमंत्र्यांनी त्यांचं ऐकलं नाही. जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य सचिवांना कळवलं नाही. कार्यक्रम शासकीय नसतानाही पत्रिकेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषीमंत्री यांचे फोटो छापले आहेत. दादा भूसे कृषीमंत्री असताना असे कार्यक्रम घेण्यासाठी आम्ही बजेटमध्ये तरतूद केली होती. त्याबद्दल काही दुमत नाही. पण यांनी नियमांचं उल्लंघन केल्याचे माझ्याकडे ठोस पुरावे आहेत,”

याशिवाय “कृषी विभागाल वेठीस धरण्यात आलं आहे. अधिकाऱ्यांनी आम्हाला काही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक कृषी दुकानदाराला पाच हजार रुपये वसूल करुन देण्यास सांगितलं आहे. हा एक प्रकारचा भ्रष्टाचार नाही का? याकरता मंत्री केलं आहे का?,” अशी विचारणा अजित पवारांनी फडणवीसांना केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सवाची शासनाने गंभीर दखल घेतली असून कुठे गैरप्रकार घडला असेल तर कठोर कारवाई करण्यात येईल असं आश्वासन दिलं आहे.