scorecardresearch

समजून घ्या: पश्चिम किनारपट्टीवर डिंसेबरमध्ये पाऊस तर पूर्वेला ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका; या मागील कारणं काय?

एकाच वेळी भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीवर हे आस्मानी संकट कोसळलं आहे. पण हे नक्की काय घडतंय? याची कारण काय?

Inida Weather
भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीच्या भागांमध्ये पाऊस (मूळ फोटो – VizagWeather247 ट्विटरवरुन साभार)

डिसेंबर म्हटलं की डोळ्यासमोर येते गुलाबी थंडी. यंदा मात्र थंडीसाठी हक्काचा महिना असलेल्या डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली. मुंबईसह कोकण विभागात सर्वत्र, पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. बुधवारी संततधार बसरल्यानंतर गुरुवारीही राज्यातील अनेक भागांमध्ये पाऊस पडलाय. तर दुसरीकडे पूर्व किनारपट्टीलाही ‘जवद’ चक्रीवादळाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे भारताच्या पूर्व आणि पश्चिम अशा दोन्ही किनारपट्ट्यांवर सध्या अवकाळी पाऊस पडतोय. पण नक्की हे असं का होतंय? यामागील कारणं काय आहेत?, नक्की पूर्व किनारपट्टीवर काय इशारा देण्यात आलाय? या साऱ्या प्रश्नांवर टाकलेली नजर…

महाराष्ट्रामध्ये पाऊसच पाऊस…
लांबलेल्या मोसमी पावसामुळे लुप्त झालेली ‘ऑक्टोबर हीट’ची स्थिती आणि नोव्हेंबरमध्ये तीनही ऋतूंची अनुभूती राज्यातील नागरिकांना मिळाल्यानंतर सलग तिसऱ्या महिन्यात हवामानाचा लहरीपणा नागरिकांना अनुभवण्यास मिळत आहे. थंडीसाठी हक्काच्या समजल्या जाणाऱ्या डिसेंबरच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावली. बुधवारी अनेक भागांत सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाली. कोकण विभागातील मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आदी जिल्ह्यांत पाऊस झाला. पश्चिम कोकणात पावसाचा जोर अधिक होता. हवामान विभागाच्या नोंदींनुसार बुधवारी सांताक्रूझ येथे २८.६ मिमी, कुलाबा येथे २७.६ मिमी, डहाणू येथे ११.६ मिमी, ठाणे येथे २७.२ मिमी पाऊस पडला. बुधवारची ही पावसाची रीपरीप गुरुवारीही सुरुच राहिल्याचं चित्र दिसत आहे.

नक्की वाचा >> Cyclone Jawad: भारताला ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका कायम; जाणून घ्या कसे पडले नाव

पूर्व किनारपट्टीला जवदचा धोका
एकीकडे राज्याची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्रातील अनेक शहरं, जिल्हे डिसेंबरमध्ये ओलेचिंब झालेले असतानाच भारताच्या पूर्व किनारपट्टीवरील ओडिशा आणि आंध्र प्रदेश या राज्यांना ‘जवद’ चक्रीवादळाचा धोका आहे. ओडिशा सरकारने जवद चक्रीवादळासंदर्भात किनारपट्टीवरील जिल्ह्यांना इशारा दिलाय. ४ डिसेंबर रोजी हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीला धडक देणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने किनारपट्टी भागातील १३ जिल्ह्यामधील जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला असून नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात यावं असे आदेश दिलेत.

प्रशासन सज्ज
आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने मदत पोहचता यावी यासाठी ओडिशा सरकारने उपाययोजना केल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दल, ओडिशा आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशामन दलाच्या तुकड्यांची मदत घेण्यात येणार आहे. राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे आयुक्त पी. के. जेना यांनी समुद्रामध्ये वादळ निर्मितीसंदर्भातील परिस्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे. हवेचा वेग हा ४५ ते ५५ किमी प्रती तास इतका आहे. शुक्रवारी हवेचा वेग ६५ किमी प्रती तास इतका असण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. शनिवारी पहाटच्या सुमारास हे वादळ लॅण्ड फॉल करेल म्हणजेच समुद्रामधून जमीनीवर दाखल होईल. याचा फटका ओडिशाबरोबरच आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागाला बसण्याची शक्यता आहे.

८० किमी प्रती तास वेगाने धडक देणार…
हे वादळ जमीनीला धडकेल तेव्हा त्याचा वेग ८० ते ९० किमी प्रती तास इतका असेल. भारतीय हवामान खात्याचे महानिर्देशक मृत्यूंजय महापात्रा यांनी हे वादळ ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर धडकणार असल्याचं म्हटलं आहे. मात्र लॅण्डफॉल नक्की कुठे होणार हे सांगता येणार नाही असं म्हटलंय. ओडिशाच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये ३ डिसेंबरपासून मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. ओडिशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीचा भाग असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये तीन डिसेंबरपासून जोरदार पाऊस होईल असं महापात्रा म्हणालेत.

या जिल्ह्यांमध्ये अलर्ट…
हवामान विभागाने गजपति, गंजम, पुरी आणि जगतसिंहपूर जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट जारी केलाय. तर क्रेंद्रपाडा, कटक, खुर्दा, नयागड, कंधमाल, रायगड आणि कोराटपुट जिल्ह्यांमध्ये शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय.

महाराष्ट्रातील पाऊस आणि ‘जवद’ वादळ कशामुळे?
अरबी समुद्रामध्ये ३० नोव्हेंबरला कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. १ डिसेंबरला त्याची तीव्रता वाढल्याने कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला आहे. अरबी समुद्रापासून कच्छपर्यंत सध्या कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. राज्याच्या पश्चिम भागात त्याचा परिणाम होतो आहे. दुसरीकडे बंगालच्या उपसागरातही कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याची तीव्रता वाढत आहे. २ डिसेंबरला त्याचे चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून, ते आंध्र प्रदेश आणि ओडिसाच्या किनारपट्टीजवळून जाणार आहे. या चक्रीवादळाला जवद असं नाव देण्यात आलं आहे. सौदी अरेबियाने हे नाव दिलं आहे.

आणखी दोन दिवस महाराष्ट्रात पावसाळी वातावरण
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पावसाचा जोर कमी होणार असला, तरी आणखी दोन दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडय़ात पावसाळी वातावरण राहणार आहे. मुंबई, ठाणे, पालघर, धुळे, नंदूरबार, जळगाव, नाशिक आदी जिल्ह्यांत आणखी एक दिवस हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, उस्मानाबाद जिल्ह्यांत आणखी दोन दिवस पावसाळी वातावरण राहणार आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशला फटका बसणार असलेल्या जवद वादळाचा महाराष्ट्रावर फारसा परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या पावसाळी परिस्थितीला अरबी समुद्रामधील परिस्थिती जबाबदार आहे. तर जवद वादळ पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेय. ते भारताच्या पूर्व किनारपट्टीला धडकणार आहे.

मान्सून आधी आणि नंतर निर्माण होणारी वादळं…
मे महिन्यामध्येच अरबी समुद्रामध्ये तौक्ते चक्रीवादळ निर्माण झालं होतं. तौक्ते वादळ हे मागील चार वर्षांमध्ये अरबी समुद्रात निर्माण झालेलं चौथं वादळ ठरलं. मागील चार वर्षांपासून सलग अरबी समुद्रामध्ये वादळं निर्माण होत आहेत. खास करुन एप्रिल ते जून म्हणजेच प्री मान्सून कालावधीमध्ये ही वादळ तयार होत असल्याचं दिसून आलं आहे. तसेच ही वादळं किंवा वादळ सदृष्य परिस्थिती मान्सूननंतर म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यानही तयार होते. तशीच परिस्थिती सध्या अरबी समुद्रात निर्माण झालीय. २०१८ पासून या कालावधीमध्ये निर्माण झालेली वादळ ही सिव्हियर म्हणजेच धोकादायक किंवा त्याहून वरच्या प्रकारची अधिक घातक वादळ ठरली आहेत. तौक्ते वादळ हे चार वर्षांमध्ये निर्माण झालेल्या वादळांपैकी महाराष्ट्र किंवा गुजरातला धडकणारं तिसरं वादळ ठरलं. यापूर्वी २०१८ मध्ये मेकानू वादळ ओमानच्या किनारपट्टीवर धडकलं होतं, २०१९ साली वायू वादळ गुजरात किनारपट्टीला धडकलं होतं. मागील वर्षी म्हणजेच २०२० मध्ये ३ जून रोजी निसर्ग वादळ महाराष्ट्राच्या उत्तरेकडील किनारपट्टीला धडकलं होतं.

सर्वात कमी कालावधीमध्ये तीव्र होणारं वादळ
तौक्ते वादळ अगदी कमी काळामध्ये घातक स्वरुपाचं वादळ झालं होतं. अरबी समुद्रामध्ये १४ मे २०२१ रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. १४ मे रोजी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानंतर अवघ्या ४८ तासांमध्ये म्हणजेच १६ मे रोजी या वादळाला व्हेरी सिव्हयर सायक्लॉनिक स्ट्रोम अर्थात व्हीएससीएस घोषित करण्यात आलं होतं. तौक्तेशी तुलना केल्यास वायू वादळ ३६ तासांमध्ये व्हीएससीएस झालं होतं तर मेकानूला यासाठी चार आणि निसर्ग वादळाने पाच दिवसांचा अवधी घेतला होता. म्हणजेच तौक्ते वादळ हे सर्वात जलद गतीने घातक वादळ होण्याच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी राहिलं. तसेच २०२० आणि २०२१ मध्ये आलेल्या वादळांपैकी मान्सूच्या महिन्याआधीच आलेलं व्हीएससीएस प्रकारचं हे पहिलंच वादळ आहे. सध्या म्हणजेच डिसेंबर २०२१ मध्ये मुंबई आणि महाराष्ट्रभर पडणार पाऊस हा चक्रीवादळामुळे पडत नसला तरी चक्रीवादळ निर्माण होण्याच्या स्थितीसारखीच ही परिस्थिती आहे. मात्र ती सौम्य स्वरुपाची असल्याने त्याला वादळ म्हटलं जात नाही.

वादळं कशी निर्माण होतात?
उष्णकटिबंधीय चक्रीवादळांना जीवंत राहण्यासाठी ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा त्यांना उष्ण पाण्यामधून आणि समुद्रावरील बाष्पातून मिळते. सध्या समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून ५० मीटर खोल अंतरावरील पाणी हे समुद्रामधील खोल भागातील पाण्याच्या तुलनेने जास्त उष्ण असते. त्यामुळे या दोन्ही गोष्टींपासून ऊर्जा मिळाल्याने तौक्ते वादळ अधिक तीव्र आणि घातक झालं होतं. पाण्याची वाफ होण्याचं प्रमाण कमी झाल्याने जास्त उष्णता बाहेर येते आणि तितका कमी दाबाचा पट्टा अधिक परिणाम दाखवतो. चक्रीवादळ तयार करण्यासाठी कमी-दाबाच्या पट्ट्यामध्ये अनेक स्तरांवर बदल होत होत अखेर ते चक्रीवादळाचं रुप धारण करतं.

बदलणारा ट्रेण्ड
सामान्यपणे उष्णकटिबंधीय चक्रीवादळं हे उत्तरेकडील समुद्री भागांमध्ये म्हणजेच बंगालची खाडी आणि अरबी समुद्रामध्ये मान्सूनपूर्व काळामध्ये आणि मान्सूननंतर (ऑक्टोबर ते डिसेंबर) तयार होतात. मे-जून आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात निर्माण होणारी वादळं ही भारतीय किनारपट्टी भागाला खूप जास्त हानी पोहचवणारी असतात.

अरबी समुद्रात नक्की काय घडतंय?
मागील काही वर्षांमध्ये बंगालची खाडी आणि अरबी समुद्रामध्ये सरासरी पाच वादळं निर्माण झाली आहेत. त्यापैकी चार वादळं ही बंगालच्या खाडीमध्ये निर्माण झालीय. येथील वातावरण हे अरबी समुद्रापेक्षा अधिक उष्ण असतं. अरबी समुद्रामध्ये सामान्यपणे लक्षद्वीप परिसरामध्ये वादळं निर्माण होतात आणि नंतर ती भारताच्या पश्चिमेकडील किनारपट्टी भागाला आदळतात. मात्र मागील काही वर्षांमध्ये अरबी समुद्रावरील तापमानही आधीच्या तुलनेत अधिक उष्ण होऊ लागलं आहे. हे सारं जागतिक वातावरण बदलांमुळे म्हणजेच ग्लोबल वॉर्मिंगमुळे घडत असून समुद्राचे तापमान असेच वाढत राहिल्यास वादळं निर्माण होण्याचं प्रमाण वाढत राहिलं असा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळेच अमेरिकन आणि इतर युरोपीयन देशांप्रमाणे वादळं ही महाराष्ट्र, गुजरात, केरळ, गोवा कर्नाटकच्या किनरापट्टी भागांना तडाखा देत राहतील अस म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही. आता बंगलाच्या खाडीमध्ये तयार झालेलं जवद हे पाचवं वादळ आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2021 at 16:41 IST

संबंधित बातम्या