कतार सरकारकडून ताब्यात घेण्यात आलेल्या भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांच्या सुटकेसाठी भारतीय दूतावास सातत्याने प्रयत्न करत आहे. या प्रयत्नांना जोर देण्यासाठी दिल्लीहून एका वरिष्ठ अधिकाऱ्यास दोहा येथे पाठवलं होतं. ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस या अधिकाऱ्याने दोहाला भेट दिली होती.
नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांना कतार सरकारने ताब्यात घेऊन ७० पेक्षा अधिक दिवस झाले आहेत. मात्र त्यांना नेमके कोणत्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आले आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. आता सोशल मीडियावरही पंतप्रधान आणि कॅबिनेटकडे कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी वेगाने हालचाली करण्याची मागणी वाढत आहे. भारत सरकार मागील १० दिवसांपासून कतारसोबत चर्चा करत आहे, मात्र अद्याप या प्रकरणी तोडगा निघालेला नाही.
या सर्व आठ भारतीयांच्या सुटेकसाठी कतारसोबत उच्च आयुक्तस्तरावर दुसऱ्यांदा चर्चा होणार असल्याचे संकेत मागील आठवड्यात मिळाले होते. त्यामुळे त्यांच्या सुटकेच्या आशा निर्माण झाल्या होत्या, मात्र पुढे काहीच सकारात्मक घडामोडी न घडल्याने निराशा झाली आहे. भारत आणि कतार यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असून, त्यांनी संयुक्त नौदल सरावही आयोजित केल्याने ही घटना काहीशी धक्कादायकच म्हणावी लागत आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना सप्टेंबरच्या अखेरीस त्यांच्या कुटुंबीयांशी फोनवर बोलण्याची परवानगी देण्यात आली होती. तर ऑक्टोबरच्या सुरुवातीस त्यांची भारतीय दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी भेट घेतली होती.
नौदलाचे माजी कर्मचारी कतारमध्ये काय करत होते? –
प्राप्त माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेले भारतीय नौदलाचे माजी अधिकारी दाहरा ग्लोबल टेक्नोलॉजीस अॅण्ड कन्सलटन्सी सर्व्हिसेसमध्ये काम करत होते. ही कंपनी सैन्य दलाशी निगडीत उपकरणे पुरवते. शिवाय संरक्षण आणि इतर सुरक्षा एजन्सींची स्थानिक व्यावसायिक भागीदार आहे आणि संरक्षण उपकरणांची देखभाल करते. हे आठ कर्मचारी मागील चार ते सहा वर्षांपासून कंपनीत काम करत होते. ताब्यात घेतलेल्या अधिकाऱ्यांपैकी एक निवृत्त कमांडर पूर्णेंदू तिवारी, फर्मचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. २०१९ मध्ये त्यांना भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
कतारची गुप्तचर संस्था एसएसबीने या आठ जणांना ३० ऑगस्ट रोजी ताब्यात घेतले होते. दोहास्थित भारतीय दूतावासास सप्टेंबरमध्ये त्यांच्या अटकेबाबत माहिती मिळाली होती. या अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी भारत सरकारला त्यांना सुखरुप परत आणण्याचे आवाहन केले आहे.
भारतीय उच्चायुक्त कतार उच्चायुक्तांच्या संपर्कात –
माजी नौदल अधिकाऱ्यांच्या अटकेवर गुरुवारी भारत सरकारने प्रतिक्रिया दिली. या पार्श्वभूमीवर माहिती देताना परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, भारतीय उच्चायुक्त कतारच्या उच्यायुक्तांच्या संपर्कात आहेत. कतार सरकारकडून कायदेशीर मदत मिळाल्यानंतर आम्हाला त्यांच्याबद्दल माहिती मिळाली आहे. या लोकंना कोणत्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे, याची माहिती सरकारला अद्याप मिळालेली नाही. मात्र सर्वांना सुखरुप परत आणण्यासाठी भारत सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.