विश्लेषण : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण… आता प्रदूषणुक्त, वेगवान प्रवास? | Explained Electrification of Konkan Railway print exp 0622 abn 97 | Loksatta

विश्लेषण : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण… आता प्रदूषणुक्त, वेगवान प्रवास?

मध्य रेल्वेने आपल्या पाच पैकी चार विभागात विद्युतीकरण पूर्ण केले असतानाच कोकण रेल्वेही यात मागे राहिलेली नाही. 

विश्लेषण : कोकण रेल्वेचे विद्युतीकरण… आता प्रदूषणुक्त, वेगवान प्रवास?
(फोटो सौजन्य – ट्विटर)

सुशांत मोरे

डिझेलचा खर्च, इंजिनामधून निघणाऱ्या धुरामुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या दोन दशकांपासून रेल्वे मंत्रालयाकडून  विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यासाठी रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण हा प्रभावी उपाय आहे. सध्या विद्युतीकरण प्रकल्पाला गती प्राप्त झाली असून देशातील ब्रॉडगेज मार्गाचे १०० टक्के विद्युतीकरण येत्या दोन वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट रेल्वे प्रशासनाने ठेवले आहे. त्याचबरोबर रेल्वेतील डिझेल इंजिनांचा वापर बंद करून कार्बन उत्सर्जन शून्यावर आणण्याचे नियोजन आहे. हे उद्दिष्ट महाराष्ट्रात हळूहळू पूर्ण होत आहे. मध्य रेल्वेने आपल्या पाच पैकी चार विभागात विद्युतीकरण पूर्ण केले असतानाच कोकण रेल्वेही यात मागे राहिलेली नाही. 

कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण का?

रोहा ते ठोकूर असा ७०० किलोमीटर कोकण रेल्वेचा मार्ग आहे. विद्युतीकरण नसल्यामुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांना एखाद्या पट्ट्यात समस्या येत होती. मध्य रेल्वेवर मुंबईपासून रोह्यापर्यंत विद्युतीकरण असल्याने विद्युतप्रवाहावरील इंजिने मेल, एक्स्प्रेस गाड्यांना जोडली जात होती. रोह्यापुढे मात्र विद्युतीकरण नसल्याने पुन्हा धूर सोडणारे डिझेलवरील इंजिन जोडून मेल, एक्स्प्रेस चालवण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यामुळे वेळेचा अपव्यय होण्याबरोबरच प्रदूषण होऊन पर्यावरणाला हानीही पोहोचत होती. देशभरातील रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण होत असतानाच कोकण रेल्वेनेही त्यासाठी पुढाकार घेतला आणि तो मार्गीही लावला.

विद्युतीकरणला सुरुवात कधीपासून?

रोहा ते ठोकूर अशा कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करणे हे सोपे काम नव्हते. या कामाला २०१५ पासून सुरुवात झाली. ७०० किलोमीटर मार्गाचे विद्युतीकरण सहा टप्प्यांत करण्याचा निर्णय झाला. रोहा ते रत्नागिरी, बिजूर ते ठोकूर, कारवार ते बिजूर, कारवार ते वेरणा, वेरणा ते थिविम आणि रत्नागिरी ते थिविम असे टप्पे निश्चित करण्यात आले होते. कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी ते थिविम या शेवटच्या टप्प्यातील विद्युतीकरणाचे काम मार्च २०२२ मध्ये पूर्ण झाले आणि कोकण रेल्वेला दिलासा मिळाला. या प्रकल्पासाठी १ हजार २८७ कोटी रुपये खर्च आला आहे. विद्युतीकरणाच्या कामात ओव्हरहेड वायरमधून २५ किलोवॉट एवढा उच्चदाबाचा विद्युतप्रवाह सोडला जातो. यासाठी अन्य मोठी यंत्रणाही उभी करावी लागते. रेल्वे सुरक्षा आयुक्तांच्या देखरेखीखाली हे काम होते. विद्युतीकरणाच्या चाचणीसाठी विद्युत प्रवाहावरील इंजिन चालवले जाते. ही चाचणी केल्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांची मंजुरी घेतली जाते.

विद्युतीकरणाचा फायदा काय?

मुंबई ते कोकण मार्गावर अप, डाऊन अशा एकूण २० रेल्वेगाड्या धावतात. देशातून एकूण ३७ रेल्वेची वाहतूक कोकणात होते. यामध्ये डिझेल इंजिनाचा समावेश असल्याने धुरामुळे प्रदूषण होते. रेल्वेगाडीला एका किलोमीटरसाठी साधारणपणे ६ ते १० लिटर डिझेलची आवश्यकता असते. इंजिनाच्या अश्वशक्तीनुसार यात बदल होतो. त्यामुळे डिझेल मोठ्या प्रमाणात लागते. मेल, एक्स्प्रेस गाड्यांना डिझेल लोकोची गरज लागत असल्याने इंधनावरही वर्षाला १५० ते २०० कोटी रुपये खर्च होत होता. विद्युतकरणामुळे प्रदूषण कमी होण्याबरोबर आर्थिक बचत होईल. शिवाय मेल, एक्स्प्रेस  गाड्यांना विद्युतवरील इंजिन जोडल्यास काहीसा वेग वाढण्यास मदत होणार आहे.

मध्य रेल्वेही विद्युतीकरणाच्या अंतिम टप्प्यात?

मध्य रेल्वेही विद्युतीकरणाच्या अंतिम टप्यात आहे. मध्य रेल्वेचे राज्यात मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, भुसावळ असे पाच विभाग असून सोलापूरातील काही पट्टा सोडता उर्वरित सर्व विभागातील विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. मुंबईतील उपनगरीय लोकलही विद्युतीकरणावरच धावत आहे. सोलापूर विभागातील लातूर ते औसा हा रेल्वे पट्टा बाकी असून तो या वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मध्य रेल्वेने ठेवले आहे. ते झाल्यास मध्य रेल्वेचा राज्यातील संपूर्ण पट्ट्याचे विद्युतीकरण करण्यात येईल. पश्चिम रेल्वेवरील मुंबई विभागासह अन्य विभागांत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-06-2022 at 07:41 IST
Next Story
विश्लेषण : हवामान बदलामुळे  विस्थापन वाढले?