जयेश सामंत

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यातील सरकार धोक्यात आले असतानाच शिवसेनेला ठाणे शहर आणि जिल्ह्यातील बालेकिल्ल्यांमध्ये मोठे धक्के बसतील असे स्पष्ट दिसू लागले आहे. शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीत मुंबई आणि ठाणे शहराने या पक्षाला भरभरून दिले आहे. शिवसेनेला पहिली सत्ता ठाणे शहराने दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचेही ठाणे शहरावर विशेष प्रेम होते. येथील कलासक्त नागरिकांसाठी नाट्यगृह उभारायला हवे हा विचार शिवसेनाप्रमुखांनी मांडला आणि पुढे सत्ता येताच तो दिलेला शब्द पूर्णही केला. त्यानंतरच्या काळात आनंद दिघे यांच्या माध्यमातून ठाणे शहरच नव्हे, तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वादळ घोंघावत राहिले. शिवसेनेने आजवर अनेक बंडे पाहिली. ठाणे जिल्ह्याचा भाग असलेल्या नवी मुंबईत गणेश नाईकांचे बंडही नव्वदीच्या दशकात गाजले. ठाणे शहराचा बालेकिल्ला मात्र या बंडानंतरही कायम शिवसेनेमागे अभेद्य राहिला. तेव्हा  शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर पक्षात झालेल्या पहिल्या बंडाचे बीज ठाण्यात पेरले जावे आणि तेही आनंद दिघे यांचे नाव घेऊन, हा एक खरोखरच योगायोग आहे, की आणखी काही? तसेच ठाण्यातील सैनिक शिवसेनेशी निष्ठावान आहेत, की आनंद दिघे आणि त्यांचे शिष्योत्तम म्हणवले जाणारे एकनाथ शिंदे यांच्याशी? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा हा प्रयत्न.

Modi, religious polarization, Marathwada,
‘रजाकारी’ला उजाळा देत मराठवाड्यात मोदींचा धार्मिक ध्रुवीकरणावर भर
2024 Lok Sabha elections
उत्तराखंडमध्ये भाजपाच्या निर्भेळ यशाचे लक्ष्य
sangli lok sabha marathi news, sangli bjp lok sabha marathi news
सांगलीत विरोधकांमधील फूट भाजपच्या पथ्थ्यावरच
congress
सांगलीत मैत्रीपूर्ण लढत की माघार ? दिल्लीच्या निर्णयाची काँग्रेस नेत्यांना प्रतीक्षा

शिवसेनेत ठाण्याचे महत्त्व काय?

शिवसेनेला पहिली सत्ता ठाणे शहराने मिळवून दिली एवढ्यापुरते शिवसेनेच्या इतिहासात या शहराचे महत्त्व उरत नाही. मुंबईप्रमाणेच किंबहुना अधिक ताकदीची आणि कडव्या कार्यकर्त्यांची संघटना या शहरात रुजली आणि पुढे फोफावली. ठाण्यात शिवसेनेच्या बांधणी, कामाची पद्धत, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आवश्यक व्यूहरचना, रात्रंदिवस मेहनत करण्याची वृत्ती या पक्षाला इतरांपेक्षा नेहमीच वेगळे ठरवत आली आहे. शिवसेनाप्रमुखांचे निष्ठावंत म्हणून ओळखले जाणारे आनंद दिघे यांनी रात्रीचा दिवस करत संपूर्ण जिल्ह्यात शिवसेना बांधली. रात्री उशिरा अगदी पहाटेपर्यत त्यांचे चालणारे जनता दरबार, त्यामध्ये प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांसाठी सदैव सदेह उपलब्धता, प्रश्नांचे तात्काळ निराकरण करणारे ‘राॅबीनहूड’ पद्धतीचे नेतृत्व हे ठाणे शिवसेनेचे नेहमीच वैशिष्ट्य ठरत आले आहे.

एकनाथ शिंदे यांचे वैशिष्ट्य काय?

आनंद दिघे यांच्या तालमीत वाढलेले एकनाथ शिंदे यांची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी अगदीच सामान्य भासत असली तरी दिघे यांच्या मृत्युपश्चात जेव्हा त्यांना नेतृत्वाची संधी मिळाली, त्यानंतर त्यांनी घेतलेली मेहनतही वैशिष्ट्यपूर्ण ठरली. दिघे यांच्याप्रमाणेच नागरिकांना, कार्यकर्त्यांना सदैव उपलब्ध असणे, कोणत्याही प्रश्नाला थेट भिडण्याची वृत्ती, रात्रीचा दिवस करत प्रचंड मेहनत करण्याची क्षमता, संपूर्ण ठाणे जिल्हा पालथा घालत शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीत बारीक लक्ष घालण्याची सवय आणि साम दाम दंड भेद अशा नीतींचा पुरेपूर वापर करत सत्तेच्या राजकारणाची गणिते जुळविणारा नेता म्हणून ठाणे जिल्ह्यात शिंदे यांनी स्वत:ची ओळख निर्माण केली हे कुणालाही नाकारता येणार नाही. शिंदे यांच्यापेक्षा दिघे यांच्या तालमीत वाढलेले तसेच त्यांचा अधिक सहवास लाभलेले अनेक पदाधिकारी, नगरसेवक आजही शिवसेनेत आहेत. मात्र दिघेंचा खरा वारसा मीच चालवितो हे शिवसैनिकांच्या मनात ठसविण्यात शिंदे पुरेपूर यशस्वी ठरल्याचे दिसत आहेत. जेमतेम दीड-दोन महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला ‘धर्मवीर’ हा चित्रपट पुढील आखणीचा एक भाग तर नव्हता, अशी कुजबूज यामुळेच अधिक जोर धरू लागली आहे.

शिवसेना तग धरेल?

शिंदे यांच्या बंडानंतर ठाणे जिल्ह्यात आता शिवसेनेचा पुढील प्रवास अधिक खडतर असेल यात शंका नाही. यापूर्वी जिल्ह्यात गणेश नाईकांचे बंड झाले खरे मात्र नवी मुंबईच्या बाहेर या बंडाचे पडसाद फारच कमी प्रमाणात उमटले. शिंदे हे तशा अर्थाने जिल्ह्याचे निर्विवाद नेते राहिले आहेत. १५ वर्षे पालकमंत्री पद भूषवूनही नाईकांना जिल्ह्यात शिंदे यांच्याइतका प्रभाव निर्माण करता आला नाही ही वस्तुस्थिती आहे. तुलनेने सत्ता नसतानाही शिंदे यांचे जिल्ह्याचे राजकीय नेतृत्व होते आणि सत्ता आल्यानंतर ते अधिक अधोरेखित झाले. त्यामुळे शिंदे यांचे बंड शिवसेनेसाठी धक्कादायक तर आहेच शिवाय या पक्षाला ठाणे, कल्याण डोंबिवली यासारख्या शहरातून अगदी शून्यातून सुरुवात करावी लागते की काय असा प्रश्न उपस्थित होण्याजोगी परिस्थिती आता निर्माण झाली आहे.