भक्ती बिसुरे
रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला नुकतेच १०० दिवस पूर्ण झाले आहेत. या युद्धात रशियाने युक्रेनचा सुमारे २० टक्के भाग काबीज केल्याची माहिती हे १०० दिवस पूर्ण होत असताना, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांनी दिली आहे. रशियाविरुद्ध युक्रेनने पुकारलेल्या युद्धात आता अमेरिकेने युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. सुमारे ७० कोटी अमेरिकन डॉलरच्या मदतीमध्ये हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम (हायमार्स) ही अद्ययावत यंत्रणाही अमेरिकेने युक्रेनला देऊ केली आहे.

अमेरिकेची मदत काय आहे?

रशिया आणि युक्रेन युद्धाला तोंड फुटल्यानंतर अमेरिकेने आपण युक्रेनच्या बरोबर असल्याचे वेळोवेळी कृतीतून दर्शवले आहे. युद्ध सुरू झाल्यानंतर मे महिन्यात अमेरिकेकडून दारूगोळा, शस्त्रास्त्रे आणि इतर युद्धसामग्रीचा पहिला टप्पा युक्रेनला सुपूर्द करण्यात आला. अमेरिकन फर्स्ट लेडी जिल बायडेन यांनीही युद्धकाळात युक्रेनला सदिच्छा भेट दिली. त्यापाठोपाठ आता सुमारे ७० कोटी अमेरिकन डॉलरची युद्धसामग्री अमेरिकेकडून युक्रेनला मिळत आहे. यामध्ये युद्धजन्य युक्रेनला मदतीचा हात म्हणून अमेरिकेकडून एम १४२ हाय मोबिलिटी आर्टिलरी रॉकेट सिस्टिम देण्यात येणार असल्याचे व्हाईस हाऊसतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. मध्यम पल्ल्याच्या या प्रक्षेपक प्रणालीची मागणी रशियाने विशेषत: कीव्ह या शहराला लक्ष केल्यापासून युक्रेनकडून करण्यात आली होती. युद्धात होरपळत असलेल्या युक्रेनला मदतीचा हात म्हणून आता अमेरिका युक्रेनला दुसऱ्या टप्प्यातील मदत देऊ करत आहे. या मदतीचा भाग म्हणून तब्बल प्रक्षेपक प्रणाली, यंत्रणा, शस्त्रास्त्रे युक्रेनला दिली जाणार आहेत. त्यांमध्ये हायमार्स यंत्रणेसह हेलिकॉप्टर्स, जॅवलिन रणगाडा विरोधी शस्त्रास्त्र यंत्रणा, चिलखती वाहने, यंत्रणांचे सुटे भाग अशा अनेक गोष्टींचा समावेश आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी ‘न्यूयॉर्क टाईम्स’मध्ये लिहिलेल्या स्तंभामध्ये अमेरिकेकडून देऊ करण्यात येणारी मदत युक्रेनला युद्धात अधिक सक्षम बनवण्यासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे म्हटले आहे. अमेरिका युक्रेनला देत असलेली क्षेपणास्त्र यंत्रणा आणि दारूगोळा युद्धभूमीवर लक्ष्याचा अचूक वेध घेण्यास उपयुक्त ठरणार आहे. युक्रेनने या यंत्रणेचा वापर करून युद्धभूमीवर निकराने लढा द्यावा आणि वाटाघाटींमध्ये आपले स्थान बळकट करावे, असे आवाहन बायडेन यांनी या स्तंभातून केले आहे. यापूर्वी अमेरिकेने युक्रेनला ४.५ लाख अमेरिकन डॉलरचे सहकार्य केले आहे. त्यामध्ये हॉवित्झर या शक्तिशाली तोफखाना यंत्रणेचा समावेश आहे.

हायमार्स हे काय आहे?

हायमार्स हे अत्यंत अद्ययावत क्षमतेचे मात्र वजनाने हलके रॉकेट लाँचर आहे. त्याला स्थैर्य देण्यासाठी एका चाकावर बसवून त्याचा मारा अधिक नेमका, अचूक आणि स्थिर करणे शक्य होते. प्रत्येक रॉकेट लाँचर जीपीएसच्या निदर्शखाली चालणारी सहा रॉकेट्स वाहून नेऊ शकतात. कमीत कमी वेळ आणि श्रमांमध्ये ती रिलोड करणेही शक्य आहे. युक्रेनच्या सध्या वापरातील प्रक्षेपक प्रणालीच्या तुलनेत ही यंत्रणा अधिक प्रभावी असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते. वॉशिंग्टनकडून देण्यात आलेल्या या प्रणालीचा पल्ला सुमारे ८० किलोमीटर एवढा आहे. मे महिन्यापासून युक्रेनकडून युद्धभूमीवर वापरल्या जात असलेल्या अमेरिकेनेच पुरवलेल्या हॉवित्झरच्या तुलनेतही ही यंत्रणा कितीतरी अधिक वेगवान आहे. हायमार्स प्रकारातील किती यंत्रणा अमेरिका युक्रेनला देणार हे मात्र अद्याप स्पष्ट नाही.

हायमार्सचे महत्त्व काय?

रशियन फौजांचे पूर्व युक्रेनमधील मार्गक्रमण रोखण्यासाठी लांब पल्ल्याच्या प्रक्षेपक प्रणालीची मागणी युक्रेनकडून करण्यात आली होती. युक्रेनच्या इतर दाट शहरी भूप्रदेशाच्या तुलनेत पूर्वेकडील भागाचे संरक्षण करणे अधिक आव्हानात्मक असल्याने युक्रेनकडून ही मागणी करण्यात आली. रशियन फौजांनी नुकतेच युक्रेनच्या सेवरोडोनेत्स्क या परिसरावर आक्रमण केले असून रशियन सैन्याची बरोबरी करण्यासाठी लांब पल्ल्याच्या शस्त्रास्त्रांची गरज असल्याचे युक्रेनने स्पष्ट केले. रशियन आक्रमण थोपवण्यासाठी युक्रेनला हायमार्स प्रणालीची मदत होणार आहे. सुरक्षित अंतरावरून रशियाचा हल्ला परतवण्यासाठीही या प्रणालीचा प्रभावी उपयोग युक्रेनला करता येणे शक्य आहे. अर्थात अमेरिकन तज्ज्ञांच्या मते, या प्रणालीचा वापर युक्रेन किती प्रभावीपणे करते यावरही तिची युक्रेनसाठी असलेली उपयोगिता अवलंबून आहे.

अमेरिकेकडून प्रणाली पुरवण्यास एवढा विलंब का?

‘अल जझिरा’ या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, आजपर्यंत रॉकेट, ड्रोन किंवा हेलिकॉप्टरच्या सहाय्याने युक्रेनने रशियन हद्दीत केलेल्या कोणत्याही कमी टप्प्यातील हल्ल्यांचे उघड समर्थन केलेले नाही. सीमा भागात पुरेसा मारा केल्यास हायमार्स प्रणालीद्वारे केलेला हल्ला रशियापर्यंत सहज पोहोचू शकतो, मात्र रशियाविरुद्ध या प्रणालीचा वापर करणार नसल्याचे युक्रेनकडून सांगण्यात आल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे ‘अल जझिरा’ने म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला तब्बल ३०० किलोमीटर मारक क्षमता असलेल्या आर्मी टॅक्टिकल क्षेपणास्त्र यंत्रणेचा पुरवठा युक्रेनला करणार नसल्याचे अमेरिकेने स्पष्ट केले आहे. तर हायमार्स युक्रेनला दिल्याने थेट संघर्षाचा धोका वाढणार असल्याचे रशियाने म्हटले आहे. जगातील इतर देशही अमेरिकेची ही कृती म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार असल्याचे म्हणून आपली नाराजी व्यक्त करत आहेत.

bhakti.bisure@expressindia.com