scorecardresearch

विश्लेषण: एअरबॅग्स नेमक्या कसं काम करतात? अपघाताच्या वेळी जीव वाचवण्यासाठी त्या महत्वाच्या कशा ठरतात?

सरकार आता वाहनांमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य करण्याची योजना आखत आहे

How airbags works in car
सरकार आता वाहनांमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य करण्याची योजना आखत आहे

दरवर्षी रस्ते अपघातात लाखो लोक आपला जीव गमावतात. भारतात रस्ते अपघातात मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण फार अधिक आहे. याच कारणामुळे केंद्र सरकार देशात विक्री होणाऱ्या वाहनांमधील सुरक्षेवर अधिक भर देत आहे. सरकारकडून रस्ते सुरक्षा आणि अधिक सुरक्षित प्रवासासाठी जी पावलं उचलली जात आहेत त्यामध्ये ग्राहक आणि कंपन्यांच्या दृष्टीने सर्वाधिक चर्चेची गोष्ट ठरत आहेत, एअरबॅग्स!

सरकार आता वाहनांमध्ये सहा एअरबॅग्स अनिवार्य करण्याची योजना आखत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात या एअरबॅग्स दुर्घटनेवेळी नेमक्या कशा काम करतात? तसंच गाडीमध्ये बसल्यावर सामान्यपणे दृष्टीस न पडणाऱ्या या एअरबॅग्स प्रवाशांचा कशा पद्धतीने जीव वाचवतात? याबद्दल…

वाहनांमधील एअरबॅग्सची सुरुवात नेमकी कधी झाली?

जगातील सर्वात पहिल्या एअरबॅगबद्दल बोलायचं झाल्यास अमेरिकेतील जॉन हेट्रिक आणि जर्मनीचे वॉल्टर लिंडरर यांचं नाव घ्यावं लागेल. दोघांनी जवळपास एकाच वेळेस वाहन उद्योगाला एअरबॅगची ओळख करुन दिली. अमेरिकेच्या जॉन हेट्रिक यांनी १९५२ मध्ये पहिल्या एअरबॅगचं डिझाइन तयार केलं आणि ऑगस्ट १९५३ मध्ये त्यांनी यासंदर्भातील पेटंट मिळवलं. तर दुसरीकडे वॉल्टर यांनी १९५१ मध्येच पेटंटसाठी अर्ज केला होता. नोव्हेंबर १९५३ मध्ये त्यांनाही यासाठी पेटंट मिळालं. म्हणजे दोघांच्या पेटंटमध्ये केवळ दोन महिन्यांचा फरक होता.

वॉल्टर यांनी विकसित केलेल्या एअरबॅगचा वापर मर्सिडीजने आपल्या गाड्यांमध्ये केला. तर जॉन हेट्रिक यांनी तयार केलेल्या एअरबॅगचा वापर फोर्ड आणि क्राइसलरसारख्या कंपन्यांनी आपल्या गाड्यांमध्ये पहिल्यांदा केला.

एअरबॅग कशा पद्धतीने काम करते?

जेव्हा एखादी वेगाने धावणारी गाडी एखाद्या गोष्टीला धडकते तेव्हा तिचा वेग लगेच कमी होतो. एक्सेलेरोमीटर वेगात अचानक झालेला हा बदल लक्षात घेतो. यानंतर एक्सेलेरोमीटर एअरबॅगच्या सर्किटमध्ये लागलेले सेन्सर अॅक्टिव्हेट करतो. एअरबॅगचे सेन्सर अॅक्टिव्हेट झाल्यानंतर त्याला हिट सेन्सॉर्सच्या मदतीने विद्युतप्रवाह मिळतो. यानंतर एअरबॅगमध्ये केमिकलचा स्फोट होतो. स्फोट झाल्यानंतर एअरबॅगमध्ये गॅस तयार होऊ लागतो. यामुळे ही बॅग अवघ्या काही क्षणांमध्ये फुगण्यास सुरुवात होते. ही बॅग चालक आणि इतर प्रवाशांना अपघातात गंभीर जखमी होण्यापासून वाचवते.

पण फक्त एअरबॅग वाहनातील प्रवाशांना वाचवू शकत नाही. यावेळी चालक आणि प्रवाशांनी सीटबेल्ट लावलेलं असणंही तितकंच महत्वाचं आहे.

नायट्रोजन गॅसची एअरबॅगमध्ये महत्वाची भूमिका

सुरुवातीला एअरबॅगमध्ये सोडियम एजाइड म्हणजे NaN3 रसायनाचा वापर केला जात होता. धडक दिल्यानंतर इग्नायटरमध्ये वीजेचा प्रवाह सुरु व्हायचा आणि ते गरम व्हायचं. गरम झाल्यानंतर सोडियम एजाइड सोडियम मेटल आणि नायट्रोजन गॅसमध्ये परिवर्तित होतो. हाच गॅस एअरबॅगला अगदी कमी वेळात पूर्णपणे उघडण्यासाठी कारणीभूत ठरतो. सध्याच्या कंपन्या एअरबॅग्समध्ये वेगवेगळ्या केमिकल्सचा वापर करत आहेत, जे आधीच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत फार वेगाने गॅस सोडतात आणि कमीत कमी वेळात एअरबॅग फुगेल याची काळजी घेतात. अपघात आणि एअरबॅग फुगण्यासाठी लागणारा वेळ यात जितका कमी वेळ असेल तितका प्रवाशांवर अपघाताचा परिणाम कमी होणार असं मानलं जातं. म्हणूनच कमीत कमी वेळात एअरबॅग फुगावी असं तंत्रज्ञान वापरण्याला कंपन्याचं प्राधान्य असतं.

दरम्यान एअरबॅग्समध्ये वापरल्या जाणाऱ्या गॅसचा वाहनातील प्रवाशांवर काही परिणाम होणार नाही याची काळजी घेतली जाते. याच कारणाने प्रामुख्याने नायट्रोजनचा वापर केला जातो. नायट्रोजन हा न्यूट्रल गॅस म्हणून ओळखला जातो. म्हणजेच अपघात झाल्यानंतर स्पार्किंग झालं तरी नायट्रोजनमुळे आग भडकण्याची वगैरे शक्यता नसते. त्यामुळेच हाच सर्वाधिक सुरक्षित वायू मानला जातो.

एअरबॅगमुळे मृत्यूचं प्रमाण किती कमी झालं?

एअरबॅगमुळे खरंच जीव वाचतो की कंपन्या अधिक पैसा कमावण्यासाठी याचा वापर करण्यावर भर देतात असा प्रश्न अनेकदा ग्राहकांना पडतो. १९९५ मध्ये यासंबंधी एक सर्व्हेक्षण प्रसिद्ध करण्यात आलं होतं. यासाठी १९८५ ते १९९३ दरम्यान अमेरिकेत झालेल्या अपघातांची आकडेवारी देण्यात आली होती. या आकडेवारीतून, धडक होऊन झालेल्या अपघातांमध्ये होणाऱ्या मृत्यूंच प्रमाण हे एअरबॅगमुळे २३ ते २४ टक्कांनी कमी झाल्याचं दिसून आलं.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण ( Explained ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Explained how airbags works in car during accident sgy

ताज्या बातम्या