शैलजा तिवले

जानेवारी २०२२ पासून २० जुलैपर्यंत जगभरात जवळपास ७२ देशांमध्ये मंकीपॉक्सचा उद्रेक झाला आहे. भारतातही त्याचा प्रसार सुरू झाला असून आत्तापर्यंत केरळ आणि दिल्ली अशा दोन राज्यांत चार रुग्ण आढळले आहेत. जगभरात मे महिन्यापासून मंकीपॉक्सचा उद्रेक वाढत असला तरी करोनाप्रमाणे वेगाने याचा प्रसार झाल्याचे आढळलेले नाही. त्यामुळे हा आजार करोनाइतका गंभीर नसला तरीही, दक्षता घेणे निश्चितच आवश्यक आहे.

मंकीपॉक्स आणि करोनामध्ये काय फरक आहे?

मंकीपॉक्स आणि करोना या दोन्हींची लागण दोन वेगवेगळय़ा विषाणूमुळे होते आणि प्रसारही वेगवेगळय़ा पद्धतीने होतो. मंकीपॉक्स हा डीएनए पद्धतीचा विषाणू असून इतर डीएनए विषाणूंच्या तुलनेत हा सर्वात मोठा विषाणू आहे. मंकीपॉक्सच्या विषाणूचे उत्परिवर्तन म्हणजेच म्युटेशन होण्याची प्रक्रिया करोना किंवा इबोला यांसारख्या आरएनए विषाणूच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामुळे हा तसा स्थिर विषाणू आहे. आत्तापर्यत मंकीपॉक्सच्या विषाणूमध्ये कोणत्याही प्रकारचे म्युटेशन झाल्याचे पुरावे आढळलेले नाहीत, असे जागतिक आरोग्य संघटनच्या डॉ. रोझमंड लुईस यांनी स्पष्ट केले. मंकीपॉक्स हा प्राण्यांपासून होणारा संसर्गजन्य आजार असला तरी प्राण्यांद्वारे माणसांमध्ये आणि एका व्यक्तीमार्फत दुसऱ्या व्यक्तीला होतो.

बाधित रुग्णाच्या शरीरावर आलेल्या पुरळमधून बाहेर पडणारा द्रव, लैंगिक संपर्क, घाव किंवा जखम याच्याशी संपर्क आल्यास किंवा त्वचेशी संपर्क आल्यास मंकीपॉक्सची लागण होऊ शकते. बाधित व्यक्तीने वापरलेल्या कपडय़ांशी संपर्क आल्यास, तसेच अशा व्यक्तींच्या खूप काळ सोबत असल्यास, तिची शिंक किंवा तोंडातून बाहेर पडणारी थुंकी याद्वारेही बाधा होऊ शकते.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा >>> विश्लेषण : ‘मंकीपॉक्सपासून मारबर्गपर्यंत’… करोनापेक्षाही भयंकर असलेल्या ‘या’ विषाणूंचे जगात थैमान

मंकीपॉक्सचा प्रसार आत्तापर्यंत कसा झाला आहे?

माणसामध्ये मंकीपॉक्स हा आजार प्रथम १९७० मध्ये डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो येथे नऊ वर्षांच्या बालकांमध्ये आढळला. या भागामध्ये देवी रोगाचे निर्मूलन १९६८ साली झाले होते. त्यानंतर काँगो खोऱ्यातील वर्षांवनांचा विभाग आणि ग्रामीण भागांमध्ये अनेक रुग्ण आढळले. बेनिन, कॅमेरून, द सेंट्रल आफ्रिकन रिपब्लिक, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो, लिबेरिया, नायजेरिया, दक्षिण सुदान अशा आफ्रिकेतील ११ देशांमध्ये १९७० पासून या आजाराचे रुग्ण आढळत आहेत. आफ्रिकेव्यतिरिक्त बाहेरील देशात, अमेरिकेत २००३ मध्ये प्रथम या आजाराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर २०१८, २०१९ आणि २०२१ मध्ये विविध देशांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होत आहे. जानेवारी २०२२ पासून ज्या देशांमध्ये यापूर्वी मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव झालेला नाही, अशा देशांमध्येही मंकीपॉक्सचा उद्रेक होत आहे. युरोप आणि अमेरिकेत सध्या जास्तीत जास्त रुग्ण आढळत आहेत. 

करोनाच्या तुलनेत मंकीपॉक्स हा आजार किती गंभीर आहे?

करोनाच्या तुलनेत हा आजार फारसा गंभीर नसून आतापर्यंत आढळलेल्या रुग्णांमध्ये याचे स्वरूप सौम्य ते मध्यम आहे. जगभरात आढळलेल्या १४ हजार ५३३ रुग्णांपैकी दोन रुग्णांनाच अतिदक्षता विभागात दाखल करण्याची आवश्यकता भासली आहे, तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बहुतांश रुग्णांमध्ये या आजाराची लक्षणे काही आठवडय़ांनी आपोआप कमी होतात. काहीच रुग्णांमध्ये त्याचे स्वरूप तीव्र होते. नवजात बालके, रोगप्रतिकारशक्ती कमी असलेली बालके किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींमध्ये हा आजार गंभीर स्वरूप धारण करू शकतो. या आजारांमध्ये गुंतागुंत झाल्यास न्यूमोनिया, सेप्सिस, मेंदूतील गुंतागुंत, दृष्टिपटलाचा संसर्ग इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. याचा मृत्युदर ० ते १० टक्के आहे. परंतु याचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने दक्षता घेणे आवश्यक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.

मंकीपॉक्स आरोग्य क्षेत्रासाठी आणीबाणी का घोषित केला गेला?

मंकीपॉक्सचे स्वरूप करोनाच्या तुलनेत सौम्य असले तरी आत्तापर्यंत याचा प्रसार न झालेल्या देशांमध्येही उद्रेक होत आहे. बालके आणि गर्भवती महिलांमध्ये याची बाधा होत असल्याचे आढळले आहे. याचा प्रसार इतर देशांमध्ये कसा होत आहे, याबाबत अजूनही ठोस कारणे स्पष्ट झालेली नाहीत. तसेच या आजाराच्या लक्षणांमध्येही काहीसा फरक होत असल्याचे आढळले आहे. या सर्व कारणांमुळे आंतरराष्ट्रीय चिंतेची बाब मानून जागतिक आरोग्य संघटनेने त्यास आणीबाणी घोषित केले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात जनजागृती होऊन या आजाराचा प्रसार रोखणे शक्य होईल. 

मंकीपॉक्सचा प्रसार लैंगिक संबंधांमुळे होतो का?

मंकीपॉक्सचा लैंगिक संबंधामुळे प्रसार होत असल्याचे अद्याप ठोस पुरावे आढळलेले नाहीत. परंतु स्पेन, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमध्ये ९९ टक्के रुग्ण हे समलैंगिक पुरुष आहेत. एकापेक्षा अधिक जोडीदारांसोबत संबंध असल्याचे या रुग्णांमध्ये आढळले आहे. आजाराचा प्रसार रोखण्याच्या दृष्टीने दक्षता म्हणून या समाजामध्ये अधिक जनजागृती करण्यावर भर देण्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केले आहे.

मंकीपॉक्सच्या निदानासाठी आरटीपीसीआर चाचणी केली जाते का ?

मंकीपॉक्सचे निदानही आरटीपीसीआर चाचणीद्वारे केले जाते. परंतु यामध्ये नाक किंवा घशातील नमुने घेण्याऐवजी बाधित व्यक्तीच्या अंगावरील पुरळाचा पापुद्रा किंवा त्यामधील द्रवाचे नमुने तपासणीसाठी घेतले जातात. सध्या पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेसह १५ प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या सुरू आहेत. यासाठी मंकीपॉक्सचे निदान करणारे चाचणी संच वापरले जातात. मंकीपॉक्सची चाचणी अद्याप खासगी प्रयोगशाळांमध्ये सर्वासाठी पद्धतीने उपलब्ध नाही. भारतातील पहिले आरटीपीसीआर संच गुडगावच्या जीन्सटूमी या कंपनीने निर्माण केले असून मंगळवारी हे जाहीर केले आहे. ५० मिनिटात चाचणी करता येणाऱ्या या संचाला भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची अद्याप परवानगी मिळालेली नाही.

shailaja.tiwale@expressindia.com