अन्वय सावंत

भारताचा १६ वर्षीय ग्रँडमास्टर बुद्धिबळपटू आर. प्रज्ञानंदने अलीकडच्या काळात जागतिक स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरी केली आहे. नुकत्याच झालेल्या चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेत त्याने उपविजेतेपद पटकावले. त्याआधी एप्रिल महिन्यात झालेल्या ओस्लो चषक स्पर्धेत त्याने दमदार कामगिरी केली होती. तसेच त्याने काही महिन्यांच्या कालावधीत विश्वातील अव्वल बुद्धिबळपटू मॅग्नस कार्लसनला दोन वेळा पराभूत करण्याची किमयाही साधली. एकीकडे प्रज्ञानंदसारखा युवा खेळाडू अप्रतिम कामगिरी करत असतानाच दुसरीकडे माजी जगज्जेता विश्वनाथन आनंद यानेही यशस्वी कामगिरी सुरू ठेवली आहे. गेल्या काही स्पर्धांतील या दोघांच्या कामगिरीचा घेतलेला हा आढावा.

प्रज्ञानंदच्या कामगिरीचा आलेख कसा आहे?

भारताचा सर्वात कमी वयात ग्रँडमास्टर किताब मिळवणारा बुद्धिबळपटू प्रज्ञानंद त्याच्या कामगिरीचा आलेख सतत उंचावत असल्याचे दिसत आहे. विशेषत: गेल्या काही स्पर्धांमध्ये त्याने सातत्याने आपल्यापेक्षा वरच्या क्रमांकांवरील खेळाडूंना पराभवाचा धक्का दिला आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या एअरथिंग्स मास्टर्स स्पर्धेत प्रज्ञानंदने पाच वेळा विश्वविजेत्या कार्लसनवर मात केली होती. त्यानंतर एप्रिलमध्ये झालेल्या ओस्लो चषक स्पर्धेत पाचव्या फेरीअंती तो गुणतालिकेत अग्रस्थानावर होता. मात्र, त्यानंतरच्या दोन फेऱ्यांमध्ये त्याचा खेळ खालावला आणि त्याला जेतेपदापासून वंचित राहावे लागले. त्यानंतर त्याने चेसेबल मास्टर्स ऑनलाइन बुद्धिबळ स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. या स्पर्धेच्या सहाव्या फेरीत प्रज्ञानंदने कार्लसनवर पुन्हा विजय मिळवला. तसेच त्याने उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत १०व्या स्थानी असलेल्या अनिश गिरीचा पराभव केला.

चेसेबल मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रज्ञानंदची कामगिरी कशी होती?

चेसेबल मास्टर्सच्या अंतिम फेरीत प्रज्ञानंदपुढे जागतिक क्रमवारीतील दुसऱ्या स्थानावरील डिंग लिरेनचे आव्हान होते. लिरेनने चार डावांच्या पहिल्या लढतीत २.५-१.५ अशी सरशी साधली. अंतिम फेरीतील आव्हान टिकवण्यासाठी प्रज्ञानंदने चार डावांची दुसरी लढत जिंकणे अनिवार्य होते. त्याने आपला खेळ उंचावत ही लढत २.५-१.५ अशा फरकाने जिंकली. त्यामुळे अंतिम फेरीतील बरोबरी कोंडी फोडण्यासाठी आणि स्पर्धेचा विजेता ठरवण्यासाठी दोन अतिजलद (ब्लिड्झ) डाव खेळवण्यात आले. यातील पहिला डाव बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या डावात काळ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या प्रज्ञानंदने सुरुवातीला दर्जेदार खेळ केला. मात्र, डाव संपायला काही मिनिटे शिल्लक असताना त्याने चुका केल्या आणि अनुभवी लिरेनने याचा फायदा घेतला. त्याने ४९ चालींमध्ये विजयाची नोंद करत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

आनंदची अलीकडची वाटचाल कशी आहे?

भारताचा सर्वोत्कृष्ट बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद आता कारकीर्दीच्या अखेरच्या टप्प्यावर आहे. मात्र, त्याच्यात अजूनही महत्त्वपूर्ण विजय मिळवण्याची क्षमता कायम आहे. सध्या जागतिक क्रमवारीत १६व्या स्थानावर असलेल्या ५२ वर्षीय आनंदने नुकतेच सुपरबेट जलद (रॅपिड) आणि अतिजलद (ब्लिड्झ) पोलंड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तरीत्या दुसरे स्थान मिळवले. आनंदने सुरुवातीच्या टप्प्यात दमदार कामगिरी करताना जलद विभागाच्या जेतेपदावर आपले नाव कोरले होते. त्यामुळे त्याने १४ गुणांची कमाई केली होती. त्यानंतर अतिजलद विभागात तो सर्वोत्तम कामगिरी करू शकला नाही. त्याला या विभागात ९.५ गुणच मिळवता आले. असे असले तरी एकूण जेतेपद मिळवणाऱ्या पोलंडच्या यान-क्रिस्टोफ डुडा (२४) याच्यापेक्षा आनंदच्या (२३.५) खात्यावर केवळ अर्धा गुण कमी होता.

आनंदचा वारसा पुढे कोण चालवणार?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आनंदने दोन दशकांहूनही अधिक काळ भारतीय आणि जागतिक बुद्धिबळावर वर्चस्व गाजवले. मात्र, त्याच्यानंतर कोण? कोणता भारतीय खेळाडू त्याचा वारसा पुढे चालवणार? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. गेल्या काही वर्षांत या प्रश्नांची उत्तरे मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रज्ञानंदकडे भारतीय बुद्धिबळाचे वर्तमान आणि भविष्य म्हणून पाहिले जात आहे. त्याच्याप्रमाणे विदित गुजराथी, पी. हरिकृष्णा, अर्जुन इरिगेसी आणि डी. गुकेश यांसारख्या खेळाडूंनीही विविध जागतिक स्पर्धांमध्ये आपली छाप पाडली आहे. यंदा ऑलिम्पियाड स्पर्धेत भारताला यजमान या नात्याने दोन संघ निवडता आले आहेत. भारताच्या दोन्ही पुरुष संघांमध्ये ग्रँडमास्टर खेळाडूंचाच समावेश आहे. यावरूनच भारतीय बुद्धिबळ योग्य मार्गावर असल्याचे स्पष्ट होते.