भक्ती बिसुरेदोन वर्षांपूर्वी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आलेल्या करोना साथरोगाने आपल्या सगळ्यांना एक नवा दागिना दिला. तो दागिना म्हणजे मुखपट्टी, अर्थात मास्क. करोना काळात जगभरातल्या सगळ्या तज्ज्ञांचा आग्रह हा प्रतिबंधात्मक उपायांवर होता. त्यातही मुखपट्टी वापरावर जगभरातल्या तज्ज्ञ डॉक्टर आणि शास्त्रज्ञांचा अधिक भर होता. कोणत्या गटातील लोकांनी कोणत्या प्रकारची मुखपट्टी वापरावी याबाबत चर्चा, संम्रम, मार्गदर्शक तत्त्वे असे करत आज मुखपट्टी हा बहुतांश नागरिकांच्या जगण्याचा भाग झाला आहे. सर्जिकल मास्क, एन-९५ मास्क, तीन पदरांचे कापडी मास्क ते अगदी फॅशनेबल डिझायनर मास्कपर्यंत मास्क वापराचा आपला प्रवास येऊन पोहोचला आहे. तशातच आता वैज्ञानिक वर्तुळाला अत्याधुनिक मुखपट्टीचा शोध लावण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे. त्याबाबत हे विश्लेषण. अद्ययावत मास्क म्हणजे काय? करोना साथरोग काहीसा ओसरला असला तरी संपलेला नाही याबाबत शास्त्रज्ञ ठाम आहेत. सुरुवातीच्या काळात अगदीच नवीन असलेला करोना विषाणू आणि त्यामुळे उद्भवणारा करोना संसर्ग आता मात्र वैज्ञानिक वर्तुळाच्या चांगलाच परिचयाचा झाला आहे. गेली दोन अडीच वर्षे सातत्याने त्याबाबत संशोधन सुरू आहे. या संशोधनामध्ये मुख्य भर हा करोना विषाणूला संपूर्णपणे रोखणारी मुखपट्टी बनवण्यावर आहे. याच संशोधनातून मेम्ब्रेनचा स्तर असलेल्या एका मुखपट्टीचा शोध लावण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे. करोना विषाणूच्या बाह्यआवरणावरील स्पाईक प्रोटिनच्या संपर्कात आल्यानंतर त्याला निष्क्रिय करण्याची क्षमता या मुखपट्टीमध्ये असल्याचे शास्त्रज्ञांकडून सांगण्यात येत आहे. मुखपट्टीच्या चाचण्यांमधून हवेतील ९९ टक्के कण गाळून केवळ शुद्ध हवाच शरीरात जाईल याची खबरदारी घेतात. शोध कुणी लावला? अमेरिकेतील केंटकी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून या मुखपट्टीचा शोध लावण्यात आला आहे. तेथील रसायन शास्त्र अभियंता दिबाकर भट्टाचार्य म्हणतात, ‘एन ९५ प्रकारातील मुखपट्टी ही करोना विरोधात संरक्षण देण्यासाठी सर्वोत्तम मुखपट्टी सध्या उपलब्ध आहे. एन ९५ प्रमाणेच या नवीन मुखपट्टीमध्ये हवेतील तब्बल ९९ टक्के गोष्टी गाळल्या जातात. मात्र, त्याबरोबरच त्यामध्ये वापरण्यात आलेल्या विषाणूअवरोधक विकरांच्या (एन्झाईम) थरामुळे विषाणू संपूर्ण निष्क्रिय होण्याचा अतिरिक्त फायदा या मुखपट्टीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यामुळे ही मुखपट्टी वापरल्यानंतर विषाणूचा प्रसार संपूर्णपणे रोखणे शक्य होईल.’ मुखपट्टीची निर्मिती केल्यानंतर त्यातील मेम्ब्रेन स्तरावर विषाणूची चाचणी करण्यात आली आहे. त्यासाठी करोना विषाणूवरील स्पाईक प्रोटीनचा वापर करण्यात आला असून विषाणूअवरोधक एन्झाईमयुक्त स्तरामुळे अवघ्या ३० सेकंदात करोना विषाणू नष्ट होत असल्याचे या चाचण्यांमधून स्पष्ट झाले आहे. संशोधकांचे मत काय? केंटकी विद्यापीठातील तज्ज्ञांच्या मते या मुखपट्टीची परिणामकारकता आणि उपयुक्तता आणखी वाढवता येणे शक्य आहे. मुखपट्टीच्या पडद्याची जाळी आणि मेम्ब्रेन स्तराद्वारे गाळलेले विषाणू कण अथवा स्पाईक प्रोटिन यांचे काळजीपूर्वक नियंत्रण करणे शक्य आहे. श्वसनावर कोणताही परिणाम न करणारी ही मुखपट्टी रोज दोन तास या प्रमाणात कित्येक दिवस वापरणे शक्य आहे. त्यामुळे तो सतत विकत घेणे, विल्हेवाट लावणे किंवा बदलणे या गोष्टींची गरज राहत नाही. मात्र, एकदा वापर पूर्ण झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावणे अत्यावश्यक असल्याचे शास्त्रज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. शास्त्रज्ञ सांगतात, की कमी एअरफ्लो रेझिस्टन्स असलेल्या स्मार्ट फिल्टरेशन मटेरियलचा नाविन्यपूर्ण वापर या मुखपट्टीमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे विषाणूचे सूक्ष्म कण गाळले जाणे शक्य आहे. केवळ गाळले जाणेच नव्हे तर ते निकामी करणेही शक्य असल्यामुळे त्याचे संक्रमण होण्याची शक्यता संपुष्टात येते. प्रदूषण, औद्योगिक क्षेत्रातील श्वसनातून शरीरात जाणारे अपायकारक घटक यांपासूनही ही मुखपट्टी संपूर्ण संरक्षण देऊ शकते. एन ९५ पेक्षा परिणामकारक? नवीन मास्कला देण्यात आलेले मानांकन हे एन ९५ मास्क मानांकनापेक्षा जास्त आहे. एन ९५ मास्कमध्ये तीन किंवा चार फायबर स्तर असतात. तसेच इलेक्ट्रिकली चार्ज केलेला फिल्टर स्तर असतो. सध्याच्या परिस्थितीत एन ९५ मुखपट्टी ही आरोग्यसेवा क्षेत्रात तसेच त्याव्यतिरिक्तही सर्वाधिक प्रमाणात वापरली जाणारी मुखपट्टी आहे. तिच्या परिणामकारकतेबाबत शंका नाही मात्र त्यात अजून सुधारणा करणे शक्य असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. केंटकी विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या मुखपट्टीमध्ये १०० नॅनोमीटर एअरोसोल कणांसाठी ९८.९ टक्के संरक्षण मिळत असल्याचे दिसून आले आहे. त्यावरुन एन ९५ मुखपट्टीमध्ये सुधारणाही शक्य असल्याच्या निष्कर्षाप्रत शास्त्रज्ञ येऊन पोहोचले आहेत. मात्र ही मुखपट्टी तयार होण्यास लागणारा वेळ, त्यासाठी उपलब्ध पायाभूत सुविधा, त्यांच्या उत्पादनासाठी लागणाऱ्या क्षमता, प्रत्यक्ष बाजारपेठेत ती उपलब्ध होण्यासाठी लागणारा कालावधी आणि त्याच्या संभाव्य किंमती यांबाबत शास्त्रज्ञ अद्यापही कोणतेही भाष्य करत नाहीत. त्यामुळे हे अद्ययावत संरक्षण प्रत्यक्ष नागरिकांना उपलब्ध होण्यास किती वेळ जाणार आहे, हा प्रश्न अद्यापही अनुत्तरित असल्याचे स्पष्ट आहे.