राजस्थानच्या उदयपूरमध्ये कन्हैया लालच्या निर्घृण हत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. सामान्य माणूस असो वा राजकारणी, सत्ता असो वा विरोधक, हिंदू असो वा मुस्लिम, सर्वांनी या घटनेचा निषेध केला आहे. आरोपी मोहम्मद रियाज अख्तारी आणि गौस मोहम्मद हे दोघेही सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत. केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाने या संपूर्ण हत्येचा तपास एनआयएकडे सोपवला आहे. हे दोन्ही आरोपी पाकिस्तानच्या दावत-ए-इस्लामी या इस्लामिक संघटनेशी संबंधित असल्याचे वृत्त समोर आले आहे. आता या हत्येचा, दावत-ए-इस्लामीशी दोन्ही आरोपींचे संबंध आणि या हत्याकांडातील दावत-ए-इस्लामीची भूमिका याचा तपास एनआयए करणार आहे.

Continue reading this story with Loksatta premium subscription
Already a subscriber? Sign in

दावत-ए-इस्लामी

दावत-ए-इस्लामी ही पाकिस्तानातील सुन्नी इस्लामिक संघटना आहे. याची स्थापना १९८१ मध्ये कराचीमध्ये झाली होती. मौलाना अबू बिलाल मोहम्मद इलियास यांनी ही संघटना सुरू केली. दावत-ए-इस्लामी संघटना स्वतःचे वर्णन एक गैर-राजकीय इस्लामिक संघटना म्हणून करते. ही संस्था कुराण आणि सुन्नाचा जगभरात प्रचार करते. पण त्यांच्यावरील आरोपांनुसार ते केवळ प्रचारापुरते मर्यादित नाहीत.

Udaipur Murder: “हल्लेखोरांची हत्या करुन त्यांना धडा शिकवा,” माजी मंत्र्याचं विधान; म्हणाले “मोदी शांतता ठेवा म्हणतील, पण…”

दहशतवादी घटनेत दावा-ए-इस्लामीचे नाव कधी आले नसले तरी दहशतवादी घटनांच्या तपासात या इस्लामी संघटनेचे नाव अनेकदा समोर आले आहे. या संघटनेशी संबंधित लोकांनी अनेक दहशतवादी घटना घडवून आणल्या आहेत. दावा-ए-इस्लामी ही संघटना जगातील १०० हून अधिक देशांमध्ये सक्रिय असल्याचे सांगण्यात येते. ही संस्था जगभरात ३० हून अधिक अभ्यासक्रम चालवते. उदयपूर हत्याकांडातील दोन्ही आरोपी या संस्थेच्या ऑनलाइन कोर्सशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. या वेबसाईटनुसार मुलांसाठी वेगळे, मुलींसाठी वेगळे असे दोन प्रकारचे कोर्सेस चालवले जातात.

पाहा व्हिडीओ –

दावत-ए-इस्लामी आपल्या विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी मदनी नावाचे टीव्ही चॅनल चालवते. यामध्ये उर्दू तसेच इंग्रजी आणि बंगाली भाषेत कार्यक्रम प्रसारित केले जातात. संस्थेचे सदस्य सहसा हिरवा अमामा (पगडी) घालतात. काही सदस्य पांढरे अमामा देखील घालतात. बरेलवी चळवळीच्या समर्थकांमध्ये मदनी वाहिनी अधिक लोकप्रिय असल्याचे सांगितले जाते.

Udaipur Murder: आरोपींना तुरुंगात बिर्याणी? राजस्थान पोलिसांचं ट्वीट करत स्पष्टीकरण

दावत-ए-इस्लामीकडे दोन महत्त्वाची कामे असल्याचे सांगितले जाते. तबलीगी जमात प्रमाणे, दावत-ए-इस्लामीचे सदस्य इस्लाम आणि पैगंबराचा संदेश प्रसारित करण्यासाठी प्रवास करतात. संघटना मुस्लिमबहुल भागात बारवफतच्या दिवशी म्हणजेच पैगंबराच्या वाढदिवसानिमित्त मिरवणूक काढते. तबलीगी जमातचा प्रभाव कमी करण्यासाठी दावत-ए-इस्लामीची निर्मिती करण्यात आल्याचे सांगितले जाते.

दहशतवादी हल्ले आणि दावत-ए-इस्लामी

दावत-ए-इस्लामीचे नाव २०२० मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासादरम्यान समोर आले. २५ सप्टेंबर रोजी जहिर हसन महमूद नावाच्या पाकिस्तानी दहशतवाद्याने चार्ली हेब्दो या फ्रेंच मासिकाच्या मुख्यालयाबाहेर चाकूने हल्ला केला होता. चाकू हल्ल्यात दोन जण जखमी झाले होते आणि दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. हल्ल्याच्या तपासादरम्यान, फ्रेंच अधिकाऱ्यांनी दावा केला की झहीर दावत-ए-इस्लामीचा नेता मौलाना इलियास कादरी यांना आपला गुरू मानत होता.

Udaipur Murder: हत्येनंतर हल्लेखोर पळून जात असताना रस्त्यावर रंगला थरार; पोलिसांनी रस्त्यात चोपले; पहा व्हिडीओ

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये गव्हर्नर सलमान तासीर यांची हत्या करणारा मुमताज कादरी हा दावत-ए-इस्लामी आणि त्याचा नेता इलियास कादरी यांचाही अनुयायी होता. इलियासने मुमताज कादरी यांना ‘गाझी’ म्हणून घोषित केले होते. सलमान तासीर यांच्या हत्येनंतर, पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणांनी दावत-ए-इस्लामीच्या वाढत्या प्रभावाबद्दल चिंता व्यक्त केली आणि संघटनेच्या कारवायांवर आळा घालण्याचा निर्णय घेतला.

याशिवाय दावत-ए-इस्लामीचे नाव २०१६ मध्ये स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे असद शाह नावाच्या ब्रिटिश पाकिस्तानी व्यक्तीच्या हत्येतही समोर आले होते. मारेकरी तन्वीर अहमद हा पाकिस्तानी बरेलवी मुस्लिम असून तो दावत-ए-इस्लामीशी संबंधित होता. तन्वीरला २७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

भारतातील दावत-ए-इस्लामी

1989 मध्ये पाकिस्तानातील उलेमांचे (विद्वान) शिष्टमंडळ भारतात आले. वाटाघाटीनंतर, दावत-ए-इस्लामीची स्थापना भारतात दिल्ली आणि मुंबई येथे मुख्यालयांसह झाली. सय्यद आरिफ अली हे भारतातील अटारी येथे संघटनेचे नेते म्हणून कार्यरत आहेत. मात्र, येथे दावत-ए-इस्लामीवर अनेक आरोप आहेत. पहिला आरोप धर्मांतराचा आणि दुसरा कट्टरता पसरवल्याचा.

काही काळापूर्वी भारतात पहिल्यांदाच दावत-ए-इस्लामीचे नाव चर्चेत आले होते. डिसेंबर २०२१ मध्ये, संस्थेने हैदराबादमध्ये दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र त्यांच्या कार्यक्रमाविरोधात मुस्लिम संघटनांनी आघाडी उघडली. दावत-ए-इस्लामी धार्मिक शत्रुत्वाला प्रोत्साहन देते, असे मुस्लिम संघटनांनी म्हटले आहे. त्यांचा कार्यक्रम झाल्यास कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असे सांगण्यात आले होते.

उदयपूर हत्याकांडाच्या आधीच या वर्षी दावत-ए-इस्लामीचे नाव चर्चेत आले होते. वर्षाच्या सुरुवातीला, छत्तीसगडमधील भाजपाने आरोप केला की राज्याच्या भूपेश बघेल सरकारने दावत-ए-इस्लामीला १० एकर जमीन दिली आहे. भाजपा नेते आणि माजी मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांनी याप्रकरणी पत्रकार परिषद घेतली होती. पाकिस्तानातील कराची येथील ही संघटना दहशतवादी कारवायांमध्ये सामील असून राज्य सरकार तिला जमीन देत असल्याचे त्यांनी सांगितले होते. काँग्रेसने हे आरोप फेटाळून लावले होते. सरकारने ही जमीन छत्तीसगडच्या दावत-ए-इस्लामी संघटनेला दिली होती, ज्याची नोंदणी छत्तीसगडमध्येही आहे. त्यामुळे भाजपाचे आरोप चुकीचे आहेत, असे काँग्रेसने म्हटले. मात्र, वादानंतर हे जमिनीचे वाटप रद्द करण्यात आले.

दरम्यान, उदयपूर हत्याकांडाच्या संदर्भात दावत-ए-इस्लामीचे नावही समोर आले आहे. उदयपूर हत्याकांडप्रकरणी राजस्थानच्या पोलीस महासंचालकांनी पत्रकार परिषद घेतली सांगितले की, कन्हैया लालच्या हत्येचा आरोपी मोहम्मद गौस २०१४ साली दावत-ए-इस्लामीच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी कराचीला गेला होता.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Explained pakistani organization dawat e islami whose connection with the accused in the udaipur massacre abn
First published on: 01-07-2022 at 15:18 IST