अभिजित बेल्हेकर

अवघ्या महाराष्ट्राचेच नाहीतर देशभरातील लाखो वैष्णव, भागवत संप्रदायातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरीतील विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होत असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. यामुळे यापूर्वी चार वेळा करण्यात आलेल्या वज्रलेप उपचारांसोबतच अन्य उपाययोजनांचाही अवलंब केला जात आहे. या साऱ्यांचा हा वेध.

विठ्ठल मूर्तीचा इतिहास काय सांगतो?

पुरातत्त्व अभ्यासकांच्या मते विठ्ठलाची मूर्ती साधारण बाराव्या ते तेराव्या शतकातील आहे. एक मीटरभर उंचीची ही मूर्ती वालुकामय पाषाणापासून बनवलेली आहे. कमरेवर हात ठेवून उभी, डोक्यावर मुकुट, गळ्याभोवती ‘तुळशीहार’, कंठी कौस्तुभ असलेली ही भारतातील एक विशेष मूर्ती आहे.

मूर्तीची झीज होण्याची कारणे काय?

अभ्यासकांच्या मते या मूर्तीचा सात-आठशे वर्षांचा प्रवास, तसेच त्यासाठी वापरण्यात आलेला पाषाण आणि या देवतेशी जोडल्या गेलेल्या लाखो भाविकांकडून अव्याहतपणे सुरू असलेले पदस्पर्श दर्शन, पूजा उपचार यातून ही झीज प्रामुख्याने घडलेली आहे. याशिवाय वेळोवेळी सांगितलेल्या अन्य उपाययोजना करण्यात आलेले अपयश ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. ही झीज रोखण्यासाठी आणि मूर्तीचे जतन करण्यासाठी अभ्यासकांनी वज्रलेप, जोडीने मूर्तीसोबतचे नित्य उपचार आणि गाभाऱ्यातील वातावरणाबाबत अनेक उपाय-सूचना केलेल्या आहेत.

वज्रलेप म्हणजे काय?

कुठलीही मूर्ती वा शिल्प म्हणजे पाषाणातून घडवलेला तो विशिष्ट आकार, चेहरा असतो. त्यातला तो विशिष्ट आकार, मुद्रा, प्रकार, त्यावरील अलंकरण यातून त्या कलाकृतीला एक ओळख प्राप्त झालेली असते. कालपरत्वे नैसर्गिक आघातांमुळे आणि काही वेळा मानवी हस्तक्षेपामुळे या मूर्तीची झीज होते. मात्र वेळीच योग्य उपाय योजल्यास ही झीज रोखता येऊ शकते. यामध्ये वज्रलेप हा पर्याय प्रामुख्याने पुढे येतो. यामध्ये मूर्तीची स्वच्छता करत तिला विविध घटकांच्या वापरातून पारदर्शी स्वरूपाचे लेपन केले जाते. या पद्धतीत मूर्तीवरील शिल्पांकन, भाव, ओळख यात कुठलाही बदल न करता तिचे आयुष्य वाढवण्यासाठी एक शास्त्रीय प्रक्रिया केली जाते. ज्यायोगे बाह्य परिणाम करणाऱ्या घटकांपासून मूर्तीला सुरक्षाकवच प्राप्त होते. असा वज्रलेप करण्याची पारंपरिक आणि आता पुरातत्त्वीय तंत्रज्ञानातून सिद्ध झालेली आधुनिक अशा दोन पद्धती आहेत. या पद्धतीचा वापर करताना त्या विशिष्ट मूर्तीचा प्रकार, त्यासाठी वापरलेला पाषाण आणि झालेली झीज लक्षात घेतली जाते.

विठ्ठलाच्या मूर्तीवरील आजवरचे वज्रलेप कधी झाले?

पंढरीतील विठ्ठलाच्या मूर्तीची झीज होते आहे, हे साधारण चाळीस वर्षांपूर्वीपासूनच ठळकपणे लक्षात येऊ लागले आहे. त्यानुसार पावले टाकण्यास सुरुवात झाली आहे. याअंतर्गतच पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आजवर सन १९८८, २००५, २०१२ आणि २०२० अशा चार वेळा विठ्ठलाच्या मूर्तीवर वज्रलेप करण्यात आले आहेत. हे वज्रलेप केंद्रीय वा राज्य पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीखाली करण्यात आले आहेत. त्यासाठी काही रासायनिक प्रयोगशाळांचीही मदत घेण्यात आलेली आहे. दरम्यान, या चार उपचारांनंतरही दोन वज्रलेपातील अंतर कमी होत आहे. एका अर्थाने झीज रोखण्याची गरज दिवसेंदिवस अधिकाधिक वाढू लागल्याने त्यामागच्या कारणांचाही शोध घेण्यात येत आहे.

विठ्ठल मूर्ती जतनासाठी सुचवलेले उपाय कुठले?

विठ्ठलाच्या मूर्तीतील त्याचे ते सावळे लोभस रूप जतन करण्यासाठी मूर्ती अभ्यासक, पुरातत्त्वज्ञ यांनी वज्रलेप या मुख्य उपायासोबतच अन्य सूचनादेखील केलेल्या आहेत. विठ्ठल ही लोकदेवता आहे. या देवाला थेट स्पर्श करत दर्शन घेता येते. ही जरी प्रत्येक भाविकाला सुखावणारी गोष्ट असली, तरी या अशा रोजच्या हजारो हातांच्या स्पर्शातून मूर्तीची कणाकणाने झीज होत असते. ही सूक्ष्म रूपाने होणारी हानी सामान्यपणे लक्षात येत नाही. मात्र ती मोठ्या प्रमाणात झीज करणारी ठरते. सध्या विठ्ठल-रुख्मिणी मूर्तीच्या पायांच्या बोटांची यातून मोठ्या प्रमाणात झीज झालेली आहे. ही अशी झीज यापुढे होऊ नये म्हणून या मूर्तींच्या पावलांभोवती पारदर्शी स्वरूपाचे एखादे आवरण घालावे. ज्यायोगे त्याला हात लावत पदस्पर्श दर्शन घडेल. यातून भाविकांच्या भावनेचे आणि मूर्तीचे जतन होईल. विठ्ठलाच्या मूर्तीवर रोज होणारे अभिषेक, पूजा विधी उपचारांचे प्रमाण मर्यादित स्वरूपात ठेवत त्यामध्ये मूर्तीवर परिणाम करू शकतील अशा दूध, दही, मध, रंग यांचा वापर टाळावा. अगदी केवळ पाण्याचा वापर करतानाही ते पाणी प्रदूषित ठिकाणाहून आलेले नसावे. वज्रलेप करण्यापूर्वी अन्य ठिकाणी यशस्वी झालेल्या वज्रलेप पद्धतीचाही अभ्यास करत जतनाबाबत नेमकी दिशा ठरवावी आदी सूचना मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी केल्या आहेत. याशिवाय गर्भगृहातील वायुविजन चांगले ठेवणे, पुरेसा नैसर्गिक प्रकाश असणे, गाभाऱ्यात बसवलेली फरशी-संगमरवर काढून टाकणे, मूर्तीवरील प्रखर प्रकाश टाळणे, मूर्तीभोवती – गाभाऱ्यात सातत्याने केल्या जाणाऱ्या सजावटी कमी करणे, उष्णता वाढवणारे उदबत्ती-धूप यांचे धूर आणि दिव्यांच्या ज्वाला मंद ठेवणे अशा स्वरूपाच्या सूचना पुरातत्त्वीय अभ्यासकांकडून करण्यात आलेल्या आहेत. या सर्व सूचनांचा योग्य तो विचार करू असा सकारात्मक प्रतिसाद श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी देखील दिला आहे. या सर्व उपायांचा वेळीच अवलंब केला तर ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवोनिया ।।’ या संत तुकाराम महाराजांच्या शब्दातील या सावळ्या विठ्ठलाला त्याच्या ‘दर्शना’सह आपण जतन करू शकू!

abhijit.belhekar@expressindia.com